राजेश बोबडे
स्वातंत्र्योतर काळातील प्रथम सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशातील राजकारणाविषयी व्यक्त केलेले विचार प्रचलित घटनाक्रमांचा विचार केल्यास आजही प्रासंगिक असल्याचे जाणवते. महाराज म्हणतात : खेडय़ापाडय़ातून माझ्या प्रवासात मला आतापासूनच या निवडणुकीचे व उखाळय़ापाखाळय़ा काढण्याचे भूत लोकांच्या अंगात संचारलेले दिसते. मी कित्येकांना विचारले- ‘काय हो! असे का चालले आहे हे?’ तेव्हा ते लोक गुणगुणात की, ‘आता इलेक्शन येणार आहे; व त्याचा हा ओनामा आहे’. मला हे ऐकून भारी किळस वाटू लागली आहे या इलेक्शनच्या पद्धतीची! उमेदवार, कैक रुपये खर्च करून मी निवडून यावे, असे म्हणतात. त्यांच्या अंगांत सेवा करण्याची रग आहे की सत्ता हातात घेऊन सूड उगविण्याची? की आणखी निवडणुकीला लागलेले पैसे शेकडो पटीने उपटण्याची ही पद्धती आहे हे काही कळत नाही व याकडे सरकारही कानाडोळा कसे करू शकते तेही समजत नाही. अहो! पैसे देऊन वा फंदफितुरीने का मोठेपणा विकत घेता येतो? आणि तसे नाही म्हणावे तर तो दिवसाढवळय़ा डोळय़ासमोर दिसतोही! या ‘इलेक्शनबाज’ लोकांतील किती लोक आहेत की ते निवडून आल्यावर लोकांचे हित पाहतात? मला तरी असे कमीच लोक दिसतात! काही लोकांचा तर हा व्यापारच झालेला दिसतो. त्यात उत्तम लोक नसतील असे माझे म्हणणे नाही.
परंतु पुष्कळदा त्यांना डांबूनच ठेवले जाते. ज्यांना त्याची कला साधली आहे असे वाईट लोकही युक्ती-प्रयुक्तीने निवडून येतात. निवडणुकी बंद करा असे माझे म्हणणे मुळीच नाही. पण, हे दंडुकेशाहीने व मन मानेल तसे पैसे खर्च करून निवडून येण्याचे मार्ग मात्र आता बंद झाले पाहिजेत. ज्या कोणाला उभे राहावयाचे असेल त्याने फक्त आपले नाव जाहीर करावे. मत मागताना उखाळय़ापाखळय़ा काढण्याची पद्धती बंद करण्यात यावी. निवडणुकीकरिता उभ्या असलेल्या व्यक्तीने जर काही लोकसेवा केली असेल, तरच ती व्यक्ती निवडून यावी, अथवा पुढे सेवा करण्याबद्दल लोकांना विश्वास असेल तरच तीस निवडून द्यावे, ‘मी तुमचा पुढारी वा राजा आहे’ हे दलाली-पद्धतीने सिद्ध करण्याचे दिवस आपल्या भारत देशातून आता घालविले पाहिजेत व खरे सेवक असतील तर त्यांना शोधून काढण्याची दृष्टी लोकांना आली पाहिजे. कोणी, कुणाची शिफारस करून वा पैसे देऊन किंवा जबरी करून जर निवडून येण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांच्यावर सरकारने नियंत्रण ठेवले पाहिजे. नाही तर पुन्हा काही वर्षे मागे जाण्याची पाळी येणार आहे. रामराज्य आणायचे तर या इलेक्शनला आता गटबाजीचे स्वरूप मुळीच राहू नये तर ते फक्त सेवेचेच रूप असावे. गावात मतमतांतर होणार नाही अशा तऱ्हेने उमेदवारांनी आपली बाजू जनतेपुढे ठेवावी.
महाराज ग्रामगीतेमध्ये लिहितात :
सत्तेसाठी हपापावे।
वाटेल तैसे पाप करावे।
जनशक्तीस पायी तुडवावे।
ऐसे चाले स्वार्थासाठी।।