भारतीय संस्कृतीतील प्रथा, परंपरा व रूढी यांचाच नीट अर्थ लावून त्यांना शुद्ध व मानवोपयोगी करण्यासाठी, श्रीगुरुदेव सेवा मंडळाचा जन्म झाला असे सांगून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘श्रीगुरुदेव सेवा मंडळात सर्व धर्म, पंथ व संप्रदाय यामधील उत्तमोत्तम गोष्टी घेतल्या. यात मानवी जीवनास आवश्यक व उपयुक्त गोष्टी संपूर्णत: समाविष्ट केल्या आहेत. एकाच तत्त्वाच्या विकासाने – मग ते कितीही उच्च व उदात्त असो- राष्ट्राचा उत्कर्ष होत नसतो. म्हणून अशी तत्त्वे सुंदर रीतीने संघटित करून हे सेवामंडळ काढण्यात आले. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे तत्त्वज्ञान नवीन गोष्टी निर्माण करण्यासाठी नसून मानवी जीवनाच्या लोप पावलेल्या अनेक आवश्यक गोष्टींना ऊर्जितावस्था आणण्यासाठीच आहे. लोकांपुढे जीवनातील व्यवहारामागील तात्त्विकता मांडून अनावश्यक रूढी व परंपरा पूर्णपणे काढून टाकणे यासाठी श्रीगुरुदेव सेवा मंडळाचा जन्म झाला आहे. जुन्याची दुरुस्ती करावी, कळत नसेल ते तात्पुरती बाजूला सारावे.’’
महाराज म्हणतात, ‘‘काय भगवान श्रीकृष्णांना नवीन तत्त्वांचे प्रतिपादन करणे शक्य नव्हते? नवीन तत्त्वे ते निर्माण करू शकत नव्हते? त्यांना जुनी व परंपरागत तत्त्वे मांडण्याचे काही कारण नव्हते पण तेही भगवद्गीतेत म्हणतात, की ‘परंपरागत तत्त्वज्ञानच मी तुला सांगतो,’ तर याचा अर्थ असाच ना की मी जे परंपरेतून शिकलो त्याचे शुद्ध आणि तात्त्विक स्वरूप तुला सांगत आहे. म्हणजेच जुन्या परंपरेतील तत्त्वांना उजाळा देण्याचे कार्यच महापुरुष करतात. म्हणूनच आम्हालाही नवीन काही निर्माण करण्याची गरजच वाटत नाही. आज संस्था म्हटली की ती राजकीयच असली पाहिजे असे समजले जाते. परंतु वास्तविक राजकीय नसेल ती संस्थाच नव्हे, हे म्हणणे चूक आहे. सर्वानीच स्वातंत्र्य मिळविण्याचा ठेका घेतला तर ते पचविण्याची शक्ती कोणी निर्माण करावी?’’
‘‘भारतीय संस्कृतीचे कार्य फक्त एवढेच नाही की परस्परांत कलह करावेत आणि त्यांचे निवारण करत बसावे. संस्कृती म्हणजे शत्रुत्व नष्ट करून बंधुत्वाचे संस्कार निर्माण करण्याची पद्धत, अर्थात त्यात तेज हवेच. शक्तीही हवी. परंतु तेवढेच तिचे जीवित कार्य नव्हे. ते एक शासनाचे साधन म्हणून तो (भारतीय मनुष्य) जवळ ठेवील. दुष्टातल्या ही दुष्टास शक्य तो शहाणे करायचा प्रयत्न करू व सर्व प्रयत्न करूनही तो ऐकत नसेल तर आम्ही त्याला शासन करू. आपल्यावर नष्ट होण्याचा प्रसंग मात्र येऊ देणार नाही. कारण त्यामुळे न्यायाचे सिंहासनच खाली ओढले जाईल. परंतु गुंडांचे शासन हा आमचा धंदा नव्हे. उलट झगडण्याचा प्रसंग न येऊ देता समदर्शित्वाने वागण्याचे जे ज्ञान तेच अध्यात्म ज्ञान. परंतु आज दोहोंचीही प्रवृत्ती बिघडली आहे. राजकारण म्हणजे स्वार्थासाठी दडपशाही आणि अध्यात्माचा अर्थ डोळे निष्क्रिय होणे असा काढला जातो. आम्हास जगातील प्रत्येक वस्तूचे संशोधन व उन्नती हवी आहे. पण मानवी जीवन नष्ट करून नव्हे.
राजेश बोबडे