राजेश बोबडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जीवनात काही तरी मिळविण्यासाठी काही जण उपासना करतात. त्यातील चांगल्या व वाईट पद्धतीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी उपासना मार्ग सांगताना परखड शब्दांत आपले विचार मांडले. महाराज म्हणतात, व्यवहारात जी खऱ्या मित्रत्वाची पद्धती तीच उपासना मार्गात उपासनेची पद्धती असते. फरक कुठे असेल तर तो फक्त खऱ्या आणि खोटय़ा पद्धतीतच असतो. व्यवहारात बेगडी मित्रता अशी असते की आपल्या स्वार्थाच्या मोहास्तव मनात नसतानाही एखाद्याशी मित्रत्व दाखवून त्यांच्या जवळून काही तरी लुबाडावयाचे असते आणि ते हाती गवसताच मनुष्य त्या मित्राशी तुटकपणाने किंवा शत्रुभावानेसुद्धा वागू लागतो. त्याप्रमाणेच उपासना मार्गातही काही लोकांचे वागणे अगदी असेच ‘बेगडी’ असते.
काही स्वार्थी भक्त असे विचार करतात की, ‘मला अमुक एक गोष्ट माझ्या आरामाकरिता विषयसुखाकरिता हवी आहे आणि ती प्रयत्नाने तर मी मिळवू शकत नाही. सर्व समर्थ देव मात्र ही इच्छा सहज पुरवील’ म्हणूनच ते देवाचे नाव घेऊन, पायापोटी लागून, काय वाटेल ती भक्ती दाखवून ‘तू तरी एवढी गोष्ट कर, माझी आवडती वस्तू मला दे’ म्हणून उपासना करीत असतात. सुदैवाने ती वस्तू मिळाल्यास त्या वस्तूच्या प्रेमात देवाची उपासना लगेच नाहीशी होते, आणि न मिळाली तर देव फोडण्यापर्यंत पाळी येते. असे प्रकार व्यवहारात तसेच उपासना मार्गातही विशेषत्वाने घडत असलेले दिसून येतात. तेव्हा संसारात खरे मित्रत्व सर्वच माणसांना कळत नाही किंवा सर्वत्र आढळत नाही. तसेच खरी उपासना म्हणजे काय हेही सर्वाना कळणे कठीण असते असेच म्हणावे लागते. या मित्रत्वाच्या दोन्ही मार्गाचा शेवट मनाच्या निर्विषय व निर्लोभ वृत्तीतच करावयाचा असल्यामुळे त्यांच्या पद्धतीतही साम्य असणारच.
खरा मित्र आपल्या मित्राचा इहलोकांत विकास व्हावा म्हणून धडपडत असतो. ‘त्याला शील व तेजस्विता कशी लाभेल आणि त्याची प्रत्येक कृती आम्हा परस्परांना पोषक होऊन आम्ही आमरण आत्मीयतेने कसे राहू’ या उद्देशाने शुद्ध स्वार्थाना न जुमानता त्यास मदत करूनही उच्च ध्येय व दुर्दम्य धाडस ठेवून पुढे जातो आणि जाण्याचा जरी प्रसंग आला तरी फंदफितुरीने दुष्टांच्या हातून, आपली बांधली गेलेली पवित्र प्रेम-गाठ तोडली जाऊ नये याची अहोरात्र काळजी घेत असतो. खरे मित्रत्व हेच असून, हेच जगात अमरत्व प्राप्त करू शकते आणि हीच पद्धती व हाच मार्ग पुढे ईश्वराच्या उपासनेत कारणीभूत होऊ शकतो. ‘खरे मित्रत्व’ अंगी आणले की ‘खरा उपासक’ होण्यास वेळ लागत नाही. महाराज आपल्या भजनातही हाच संदेश देताना म्हणतात
मित्रा! कर मैत्री त्याची ।
जो सत्यविण शब्द न बोले
सहजहि कोणासी ।
तुकडय़ादास म्हणे तू तरशिल,
कीर्ती जरी गासी ।।
rajesh772@gmail.com