जग दुर्जनांमुळे नव्हे तर सात्त्विकतेचे पांघरूण घेणाऱ्या लोकांनी आपल्यामध्ये दुबळेपणा वाढविल्यामुळे बिघडले आहे. हे दुबळेपण घालविण्यासाठी, शत्रुराष्ट्राच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी गुरुकुंज आश्रमसह देशात ठिकठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कुस्तीगिरांच्या स्पर्धा, व्यायाम, लाठीकाठी प्रशिक्षणाचे वर्ग भरविले. यामध्ये पुरुषच नव्हे तर स्त्रियांनाही प्रशिक्षण दिले.
श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या शाखांच्या वतीने हे सर्व पारंपरिक प्रशिक्षण आजही दिले जाते. व्यायामाच्या महत्त्वाविषयी महाराज म्हणतात, ‘‘किती तरी लोकांचा असा गैरसमज आहे की, व्यायाम हा काही ठरावीक लोकांकरिताच आहे. माणसाने कवायत करून धष्टपुष्ट होणे किंवा लाठीकाठी फिरवणे हे गुंड मनोवृत्तीचे लक्षण आहे. अशा कोत्या विचारांच्या लोकांना मला सांगावयाचे आहे की, बाबांनो, तुमची अशी मनोवृत्ती करून देणाऱ्यांचा तुम्हाला लुटण्याचा विचार आहे, तुमच्या दुबळेपणाचा फायदा घेण्याचाच मानस आहे. निदान त्यांना तसा अनुचित फायदा आजपर्यंत घेता आला हे उघडच आहे. प्रत्येक मनुष्याचा शरीर निरोगी व बलवान ठेवणे हा जन्मसिद्ध हक्क आहे. निसर्गसिद्ध धर्म आहे. मानवी शरीर बलिष्ठ, ओजस्वी, आरोग्यसंपन्न व नेहमी सेवेस तत्पर नसेल तर त्याला जीवनाचा आनंद अनुभवता येणार नाही. जगात जिवंत राहण्याचाही अधिकार राहणार नाही. दुर्बल व कर्महीन माणसावर प्रेम करण्यासाठी ही सृष्टी नटलेली नाही. बलहीन माणसाचा व्यवहार हा पोरखेळ ठरतो आणि त्याचा परमार्थ हा मनाचे मनोरे बनून हवेत विरून जातो. सर्व बाबतीत पराधीनता व पंगूपणाच त्याच्या वाटय़ास येऊन त्याचे जीवन निराशा व चिंतेच्या भाराखाली दबून जाते.’’
‘‘खरे पाहता अशा निर्बल मनुष्याची गणना मनुष्यातच करायला नको; कारण अशा लोकांच्या खोगीरभरतीमुळेच राष्ट्राचा नाश होत आला आहे. दुबळेपण म्हणजे संकटांना आव्हान, शत्रूंना निमंत्रण व दुर्जनांना उत्तेजन, हा इतिहासाचा सिद्धांत आहे. देशात अशा आळशी, कर्महीन, बुद्धिशून्य व हतबल लोकांचा सुकाळ झाल्यामुळेच त्यांचा देशाभिमान दुबळा आणि संस्कृतीचा प्रवाह नष्ट भ्रष्ट होत आहे. दुष्ट दुर्जनांपेक्षा सात्त्विकतेचे पांघरूण घेणाऱ्यांनीच आपल्यामध्ये दुबळेपणा वाढविला. त्यामुळेच हा घात झाला आहे. गुंड प्रबळ झाले असे नाही; पण सज्जन समाज दुर्बल झाला, त्यामुळे बाकीच्या काही मोजक्या लोकांतील शक्ती ही घमेंडीचे व गुंडगिरीचे रूप घेऊ लागली. या पापाचे जबाबदार गुंडाइतकेच सर्व दुबळे सात्त्विक लोक आहेत हे विसरता येत नाही. व्यक्तीचे दुबळेपण ही राष्ट्रनाशाची खिंड आहे- महान् देशद्रोह आहे, हे सर्वानी लक्षात घेतले पाहिजे.’’
‘‘आमच्या लोकांत शब्दज्ञान कमी नाही, परंतु बलाच्या अभावी तशी कृती त्यांच्याकडून होत नाही. याचा परिणाम असा झाला आहे की, एखाद्या आजारी माणसाच्या डोळय़ांदेखत घरात चोर शिरून त्याने माल लांबवावा परंतु हे सर्व कळूनही त्याला काहीच करता येऊ नये. मग असल्या पोकळ ज्ञानाचा उपयोग काय?’’
राजेश बोबडे