स्वातंत्र्याच्या फलश्रुतीबाबत विवेचन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘भारताच्या बहुसंख्य जनतेत ही जाणीवच निर्माण झालेली नाही की, स्वातंत्र्य मिळालेल्या व त्यातही लोकशाही असलेल्या देशांतील जनतेवर कोणती जबाबदारी असते. हपापलेला भिकारी जसा देवभोळा दाता मिळाल्यावर दुसऱ्या कुणाचीही पर्वा न करता, हर्षवायूने वेडा झाल्याप्रमाणे कल्पनेत येईल तितके धनधान्य मागण्यास प्रवृत्त होतो, तद्वतच आपापले घर भरण्यासाठी आज आमच्या बुद्धीचे, शक्तीचे व युक्तीचे प्रदर्शन चाललेले दिसते. या स्वार्थाधतेमुळे माणसाला आज आपल्याशिवाय जगातील सर्व लोक अज्ञानी, युक्ती-बुद्धिहीन व दुर्बल आहेत असे वाटू लागले आहे आणि म्हणून तो शक्य तेवढी ओढाताण करून आपली खळगी भरत आहे. हे खिसे भरणे खालपासून वपर्यंत सर्रास सुरू असल्याचे शेकडो उदाहरणांनी दाखवता येईल.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘कोणत्याही काळात सगळेच लोक एका पातळीवर येत नसतात; तेव्हा काही बोटांवर मोजण्याइतके लोक यातून सुटले असणे स्वाभाविक आहे. परंतु त्यांचे उत्तम वर्तन हे एवढय़ा मोठय़ा प्रवाहात एखाद्या गवताच्या काडीइतके नगण्य आहे. वरवरच्या पदव्या, जाहिरातीचे फलक व गौरवाच्या ठोकळेबाज गोष्टी बाजूस सारून आणि सर्वाच्या मुखावरचे थोरपणाचे मुखवटे काढून टाकून, समाजाच्या अंतरंगाचे उघडय़ा-नागडय़ा वास्तव रूपात दर्शन घेतो, असे कोणी म्हणाले, तर विराटरूप पाहून घाबरलेल्या अर्जुनापेक्षाही त्याची स्थिती केविलवाणी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण समाजाला वरून कितीही शृंगारण्यात येत असले तरी, त्यांचे अंत:स्वरूप स्वार्थादिकांनी अत्यंत हीन व क्रूर करून सोडले आहे; आणि त्यात सारखी वाढच होत आहे.’’

‘‘राष्ट्राच्या पायाला सर्वत्र सुरुंग लागून समाजातून नैतिकता नाहीशी झाली आहे; एवढेच नव्हे तर, नैतिकतेविषयीचे प्रेमही संपून गेले आहे. मानवतेवरचा विश्वासच संपुष्टात आला आहे. ही स्थिती सर्वाधिक धोक्याची आहे. कोणताही समाज नैतिकतेशिवाय टिकू शकत नाही. आपली शक्तीयुक्ती इतरांना उन्नत करण्यासाठी उपयोगात आणण्याऐवजी, ती इतरांचा गैरफायदा घेण्यासाठीच जर सर्वच लोक योजू लागले तर, मोठा कठीण प्रसंग उत्पन्न होणार, हे साहजिक आहे. याची जबाबदारी कोणा एकावरच नसून, सरकारी अधिकारी, पुढारी, व्यापारी, जमीनदार, पंडित, लेखक, कलाकार, पहिलवान, गुंडलोक व धर्मपंथवाले उपदेशक हा सर्वच संच याला कारणीभूत आहे. या सर्वाच्या हृदयातून वैयक्तिक प्रतिष्ठा व धनाचा हव्यास निघून जाऊन तेथे सामाजिक विकासाची भावना जागृत झाली, तरच मिनिटागणिक जतनेचे दु:ख-दारिद्रय़ संपत जाऊन देशाचे भवितव्य उज्ज्वल होऊ लागेल आणि तेव्हाच स्वातंत्र्यलाभाच्या फलश्रुतीचे मोजमाप सुरू होईल. महाराज आपल्या लहरकी बरखा ग्रंथात म्हणतात-

बेछूट आया है जमाना, शासकों का पाप है।
ये तो भले मर जायेंगे, दुनिया को तो संताप है।

राजेश बोबडे

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintandhara when is freedom measured amy