आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनतेची मजल नेत्यांची, राज्यकर्त्यांची घरे पेटविण्यापर्यंत गेली आहे. आरक्षण आंदोलनात याचा प्रत्यय येतो. याबाबतचा इशारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ७० वर्षांपूर्वी प्रथम सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळीच दिला होता. महाराज म्हणतात, ‘‘देशभक्त म्हणविणारे निवडणुकीच्या निमित्ताने खेडय़ांत घुसून तेथील जनतेला अनुकूल करून घेऊन एकदाचे निवडून आले की मग त्या जनतेला जरब दाखवणे, लुबाडणे हेच त्यांचे काम होते. जनतेची दखल घ्यायला कोणीच तयार होत नाही. अन्य सुशिक्षित लोकांना कारकुनी करण्यातच ब्रह्मानंद वाटत असल्याने ते खेडय़ाकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत. त्यामुळे काही ठरावीक बुवा, श्रीमंत व देशभक्त हे खेडय़ात हवा तो गोंधळ घालीत असले तरी सत्ताधीशांना त्याची चिंता नसते.’’
‘‘यामुळे कष्टाळू जनता कंगाल होईल किंवा अन्न-पाण्यापासून वंचित राहील, असे चुकूनही कोणी समजू नये. शेतकऱ्यांनी व मजुरांनी योग्य माहिती साधने वा शक्तीअभावी अन्नधान्न्याचं उत्पादन घेतले नाही तर आज संख्येने फुललेली शहरे घटकेत ओस पडतील. धान्यच नसले तर धनाढय़ांचे पैशांचे हंडे जागच्या जागी थंड होतील. सुशिक्षितांची शानशौकत कवडीमोल ठरेल, बुवांच्या ताना बंद पडतील आणि देशभक्तांचे डोळे पांढरे होतील. आपापल्या महालात स्वत:ला सुरक्षित व भाग्यवान समजणारे काळाबाजारवाले सुखी राहतील असे समजू नका. कष्टकऱ्यांच्या झोपडय़ा जळू लागल्या तर बंगल्यावर कौलेसुद्धा राहणार नाहीत, असा हा काळ आहे; आणि ही काळाची पावले विसरू नका. ज्याच्यावर एका प्रदेशाची वा देशाची जबाबदारी असेल अशा माणसाने अत्यंत नीतिवान, चारित्र्यवान, न्यायासाठी आग्रही असले पाहिजे. त्याने जनतेची निष्काम सेवा केली पाहिजे. ज्याच्या मनात राष्ट्रकुटुंबाची ओढ निर्माण झाली नसेल; ज्याची वासना आपल्या घर-गृहस्थीतून, मुला- बाळांतून निघाली नसेल, अशा वानराचे हाती सत्तेचे धुपाटणे देणे म्हणजे दुसऱ्याच्या घराला आग लावून आपली पोळी शेकण्यासारखेच आहे. शेवटी स्वराज्य कशासाठी, तर आम्ही सर्व सुखी होण्यासाठी; सर्व सुख कशासाठी, तर देशात कोणी उघडा, उपाशी, चोर राहू नये, कोणी व्यसनी, व्यभिचारी राहू नये याचसाठी ना? मग मोजमाप करता करता वर्षांमागून वर्षे दुरवस्थाच होत असेल तर, आपण त्यात सहभागी आहोत, हे कबूल केले पाहिजे. नाहीतर आपल्याने कोणाचे बरे होत नाही असे मानून अडवून ठेवलेली जागातरी सोडली पाहिजे. महाराज भजनात म्हणतात-
बिगडम् गयी शासन की रिती।
साम- दाम- दण्डन की नीती
चिंतित हूँ मैं इस बात पर,
आगे जमाने के लिए ।
अच्छा-बुरा निह सोचते,
ये सोचते गुट के लिए।।
राजेश बोबडे