अमृतांशु नेरुरकर ,‘चिप’-उद्योगात कार्यरत असलेले तज्ज्ञ.
तैवानला चीन गिळंकृत करू पाहतो तर अमेरिका लष्करी मदत देते, यातूनही ‘चिप’ या उत्पादनाचं महत्त्व उमगेल..
मानवाच्या राहणीमानावर तसेच उद्योगधंद्यांवर दूरगामी परिणाम करणारं आणि भू-राजकीय पटलावर उलथापालथ करू शकण्याची सर्वोच्च क्षमता असलेलं असं कोणतं उत्पादन गेल्या साठसत्तर वर्षांत तयार झालं? याचं उत्तर डिजिटल युगात वाढलेल्या पिढीसाठी संगणक, मोबाइल फोन, विजेवर चालणारी मोटार किंवा कोणतंही तत्सम उत्पादन असं असू शकेल. तर त्याआधीच्या पिढीसाठी ते रेडिओ, टेलिव्हिजन, टेप-रेकॉर्डर किंवा वॉकमनही असू शकेल. पण गेल्या अर्धशतकातील घटनांचं वस्तुनिष्ठ विश्लेषण केल्यास इंटिग्रेटेड सर्किट (आयसी) अर्थात सेमीकंडक्टर ‘चिप’ हे विसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाचं उत्पादन ठरतं. सेमीकंडक्टर किंवा ‘चिप’ या संकल्पनेच्या अधिक तपशिलात जाण्यापूर्वी तसंच या उद्योगाच्या इतिहासात डोकावून त्याच्या यशापयशाचं विश्लेषण करण्यापूर्वी, ‘चिप’मध्ये भू-राजकीय पटलावर उलथापालथ करू शकण्याची सर्वोच्च क्षमता’ कशी काय, याचा एक नमुना पाहाणं जास्त सयुक्तिक ठरेल. त्यामुळे जागतिक परिप्रेक्ष्यात सेमीकंडक्टर उद्योगाचं असलेलं अनन्यसाधारण महत्त्वही समजून घेता येईल.
अगदी गेल्या आठवडय़ात नववर्षांच्या पूर्वसंध्येला चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी आपल्या देशवासीयांना संबोधून केलेल्या भाषणातील दोन विधानं पाहा : (१) ‘तैवानचे चीनबरोबर एकीकरण होणे हे अपरिहार्य आहे.’ आणि (२) ‘चीनला तांत्रिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे.’ वरवर पाहता या दोन्ही विधानांत नावीन्य किंवा विशेष दखल घेण्यासारखं काही दिसत नसलं, तरीही आधीच मंदीसदृश वातावरणाने घेरलेल्या सेमीकंडक्टर चिप उद्योगाची काळजी वाढवायला ती पुरेशी ठरली.
गेल्या दोन दशकांत चीननं चिपच्या आयातीवर तेलाच्या आयातीपेक्षा अधिक खर्च केला आहे. एका अंदाजानुसार मागच्या पाच वर्षांतल्या प्रत्येक वर्षी चीननं तब्बल ३० हजार कोटी अमेरिकी डॉलरहून (२५ लाख कोटी रुपये!) अधिक रक्कम खर्च केली आहे. ही रक्कम सौदी अरेबियाकडून जगभरात केल्या जाणाऱ्या तेलनिर्यातीपेक्षा किंवा जर्मनीकडून केल्या जाणाऱ्या वाहनांच्या निर्यातीपेक्षाही किती तरी अधिक आहे. यावरून एवढं सहज समजतं की, चीनची तंत्रज्ञानाची भूक ही ऊर्जेच्या भुकेपेक्षाही कित्येक पटींनी जास्त आहे.
आजघडीला तंत्रज्ञानाधिष्ठित जवळपास प्रत्येक क्षेत्रात चीननं अमेरिकेच्या तोडीस तोड मुसंडी मारलेली आहे. विदाविज्ञान, कृत्रिम प्रज्ञा, समाज माध्यमं, गेमिंग, वस्तुजाल, क्लाऊड तंत्रज्ञान, ई-कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक युद्धनीती – डिजिटल युगाचं असं कोणतंच अंग नाही ज्यात चीनने आघाडी घेतली नसेल. गूगल, फेसबुक, नेटफ्लिक्स, इन्स्टाग्राम अशा त्या त्या डिजिटल क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या प्रतिकृती (बायदू, टेन्सन्ट, अलीबाबा इत्यादी) चीनने अगोदरच तयार केल्या आहेत. किंबहुना डिजिटल क्षेत्रातील प्रत्येक आघाडीवर चीन आज बऱ्याच प्रमाणात स्वयंपूर्ण आहे. असं असताना जिनपिंग महाशयांना चीनला तांत्रिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण करण्याची पुनरुक्ती का करायला लागली?
याचं कारण चीनच्या वाढत्या ‘चिप’आयातीत दडलेलं आहे. वर उल्लेखलेल्या कोणत्याही डिजिटल क्षेत्रात आघाडी घ्यायची तर त्याचा पाया भक्कम असणं गरजेचं आहे, ज्यासाठी अत्याधुनिक चिप तंत्रज्ञान हाताशी असणं अनिवार्य आहे. दुर्दैवानं या आघाडीवर चीन अजून अमेरिका वा इतर पूर्व आशियाई देशांपेक्षा बराच मागे आहे. केवळ चिपचं उत्पादनच नाही तर त्यासाठी लागणारा कच्चा माल, कारखान्यातील उपकरणं तसेच चिपचं डिझाइन करण्यासाठी लागणारी सॉफ्टवेअर, या सर्वासाठी चीनचं परावलंबित्व आजही डोळय़ात भरण्यासारखं आहे. डोनाल्ड ट्रम्पसाहेबांच्या कारकीर्दीत अमेरिकेशी सुरू झालेल्या व्यापारयुद्धात चिनी नेतृत्वाला या उणिवेची प्रकर्षांनं जाणीव झाली.
गेलं जवळपास दशकभर देशांतर्गत चिपनिर्मिती उद्योगांवर अनुदानाची खैरात करून, करकपात, आयातशुल्क असे इतर आर्थिक उपाय वापरून व चिपनिर्मिती तंत्रज्ञान मिळवण्यासाठी साम दाम दंड भेद अशा सर्व मार्गाचा सर्रास वापर करून चीननं या क्षेत्रात आपला जम बसविण्याचा चंग बांधला आहे. काही ठरावीक प्रकारच्या चिपनिर्मितीमध्ये (उदा. ‘मेमरी चिप’) चीननं लक्षणीय प्रगती केली असली तरी डिजिटल क्षेत्रासाठी अत्यावश्यक अशा चिपनिर्मितीत (उदा. ‘लॉजिक चिप’) चीन अद्याप किमान पाच वर्ष तरी मागे आहे.
तेलाबाबतीत चीन स्वयंपूर्ण नसला तरीही तेलाची आयात चीनला मित्रदेशांकरवी करता येते. पण सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या आयातीसाठी (कच्चा माल, उपकरणं, सॉफ्टवेअर किंवा अत्याधुनिक चिप) मात्र चीनला त्याच्या भू-राजकीय प्रतिस्पध्र्यावर अवलंबून राहावं लागतं. अमेरिका (चिप उपकरणं, सॉफ्टवेअर व संगणक / सव्र्हर चिप), जपान, दक्षिण कोरिया (मेमरी चिप) व तैवान (मोबाइल फोन, दुचाकी / चारचाकी व इतर स्मार्ट डिजिटल उपकरणं यांत वापरली जाणारी ‘मायक्रोप्रोसेसर’ अथवा ‘लॉजिक चिप’) यांपैकी एकाही देशाशी चीनचे मित्रत्वाचे संबंध नाहीत. त्याचबरोबर या देशांमधल्या कंपन्यांकडून आयात केलेल्या चिपचा वापर या देशांतर्फे चीनची टेहळणी करण्यासाठी तर होत नसेल ना अशी शंका चीनच्या संशयग्रस्त नेतृत्वाला सतत सतावत असते. अशा वेळेला चिप डिझाइन व निर्मिती क्षेत्रात चीनचा स्वयंपूर्णतेचा ध्यास व त्यासाठी वाटेल तो मार्ग चोखाळण्याची चिनी नेतृत्वाची मानसिकता यात नवल वाटण्यासारखं असं काही नाही.
हा ‘वाटेल तो’ मार्ग म्हणजे?
चिनी महासत्तेला तैवानसारख्या एका बेटवजा पिटुकल्या देशाला आपल्या अमलाखाली आणावंसं वाटण्यामागेही सेमीकंडक्टर उद्योगाच्या मक्तेदारीची अभिलाषाच कारणीभूत आहे. संगणक, सव्र्हर, डेटा सेंटर, मोबाइल फोन, वस्तुजालातली डिजिटल उपकरणं, कृत्रिम प्रज्ञा व्यवस्थापन अशा सर्व गोष्टींच्या कार्यक्षम वापरासाठी ज्या ‘लॉजिक चिप’ची गरज असते त्याच्या निर्मितीत तैवानचा वाटा तब्बल ४५ टक्के आहे! अत्याधुनिक आणि तांत्रिकदृष्टय़ा अग्रगण्य अशा चिपनिर्मितीत तर तैवानची जवळपास मक्तेदारी (९० टक्क्यांपेक्षा अधिक बाजारहिस्सा) आहे.
महाराष्ट्राच्या तुलनेत केवळ १० टक्के क्षेत्रफळ असलेल्या तैवानची चिपनिर्मिती क्षेत्रातील ही गरुडझेप कल्पनातीत असली तरीही तैवानची भौगोलिकदृष्टय़ा चीनशी असलेली जवळीक ही संपूर्ण सेमीकंडक्टरच्या पुरवठा- साखळीसाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे. मागील दोन-तीन वर्षांत दक्षिण चिनी समुद्रात तैवानच्या सामुद्रधुनीत चीनच्या नियमितपणे चालणाऱ्या लष्करी कवायती ही या धोक्याची एक चुणूक आहे. तैवानमध्ये कार्यरत असलेला चिपनिर्मितीचा केवळ एक कारखाना निसर्ग अथवा मानवनिर्मित कारणांमुळे तात्पुरता जरी बंद पडला तरी त्यामुळे चिपवर अवलंबून असणाऱ्या उद्योगांचं (म्हणजे कमीअधिक प्रमाणात जवळपास सर्वच उद्योगधंदे!) अपरिमित नुकसान होईल. म्हणूनच एका बाजूला तैवानला गिळंकृत करू पाहणारा चीन तर दुसऱ्या बाजूला चिपनिर्मिती क्षेत्रात अमेरिकी कंपन्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी असूनही तैवानला लष्करी मदत देऊन वाचवू पाहणारी अमेरिका, अशा या दोन जागतिक महासत्तांमधल्या भविष्यातील संघर्षांचं मूळ कारण हे चिप पुरवठा साखळीचे अधिकाधिक नियंत्रण हेच असेल हे नि:संशय!
या लेखातली चिनी राष्ट्राध्यक्षांची विधानं ही केवळ वानगीदाखल दिली आहेत. त्यांच्या विश्लेषणातून एक बाब मात्र निश्चितपणे सामोरी येते ती म्हणजे सेमीकंडक्टर चिप उद्योगाचं जागतिक परिप्रेक्ष्यात तांत्रिक, आर्थिक, सामरिक आणि भू-राजकीय दृष्टिकोनातून असलेलं अनन्यसाधारण महत्त्व! म्हणूनच विसाव्या तसेच एकविसाव्या शतकात जागतिक अर्थकारण आणि समाजकारणावर सर्वाधिक प्रभाव चिप उद्योगाचा पडला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
असो. पुढल्या लेखापासून आपण या चिप-चरित्राचा श्रीगणेशा, चिप या संकल्पनेला अधिक विस्तारानं समजून घेऊन करणार आहोत. इंटिग्रेटेड सर्किट किंवा आयसी म्हणजे नक्की काय, त्याला सेमीकंडक्टर (अर्धसंवाहक) असं का म्हटलं जातं, चिपसंदर्भातील शब्दकोशात ‘ट्रान्झिस्टर’चं महत्त्व काय, चिपचे विविध प्रकार कोणते, चिप डिझाइन करण्याच्या आरेखन पद्धती कशा, चिपचं उत्पादन कोणकोणत्या पद्धतीनं होतं, त्यासाठीच्या प्रक्रिया कोणत्या, चिपनिर्मिती कारखाना कसा काम करतो अशा चिपबाबतीतल्या विविध गोष्टी तपशीलवार जाणून घ्यायचा प्रयत्न करू.
आजची चिप ही सिलिकॉन किंवा जर्मेनियम अशा धातूंपासून (खरं तर हे पूर्णत: धातू नाहीत, त्यांना धातूसदृश किंवा मेटलॉइड असं संबोधलं जातं.) बनत असली तरी चिपच्या शोधापूर्वीही गणकयंत्रांची निर्मिती होत होती. चिपशिवाय ती गणनयंत्रं कशी काम करत? अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरच्या कॅलिफोर्निया राज्याचा काही भाग ‘द सिलिकॉन व्हॅली’ कसा बनला? या क्षेत्राच्या सुरुवातीच्या जडणघडणीत कोणी योगदान दिलं? चिपचा पूर्वेतिहास समजून घेताना आपण या आणि अशाच तत्सम प्रश्नांचं सखोल विश्लेषण करू. या सर्वातून चिपनिर्मितीची तात्त्विक व वैचारिक बैठक पक्की होण्यासाठी निश्चित मदत होईल.
amrutaunshu@gmail. com