ग्रामजयंतीचा मथितार्थ स्पष्ट करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘जयंतीची रूढी नसावी! लोकांनी माझी जयंती साजरी करण्याचा आग्रह केला, तेव्हा मी म्हणालो, ‘तुम्ही सर्व अन्य कोणाच्याही जयंतीप्रमाणे माझाही वाढदिवस साजरा करू इच्छिता, ही तुमची श्रद्धा आहे. पण आजपर्यंत लोकांनी रूढी म्हणूनच हे केले आहे.
ज्याची जयंती आपण साजरी करतो त्याच्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी आपण तयार झालो पाहिजे. आज देशात संकटाचा काळ आहे. जातीजातींत फूट पडत आहे. अशा वेळी विचारवंत व्यक्तीला स्वस्थ राहवत नाही. म्हणूनच देशाचे राष्ट्रपती (तत्कालीन) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. ज्या देशाचे शिक्षक उत्तम त्याच देशाचे विद्यार्थी उत्तम, हाच त्यांचा मुख्य हेतू होता. देशाचा भविष्यकाळ हा बालकांवर अवलंबून आहे. त्यांच्या जोपासनेकडे सुरुवातीपासूनच लक्ष वेधले जावे म्हणून नेहरूजींची जयंती ‘बालदिन’ म्हणून साजरी केली जाऊ लागली. शेतीमातीत काम करणाऱ्या श्रमिकांची प्रतिष्ठा वाढावी, भूमी ही कसणाऱ्यांच्याच पदरी पडावी, म्हणून विनोबाजींची जयंती ‘भू-जयंती’ म्हणून साजरी केली जाते. आज खेडय़ांची अवस्था बिकट आहे. रूढी व जातींनी सगळा गोंधळ घातला आहे. त्यांचा पुन्हा जीर्णोद्धार व्हावा म्हणून माझी जयंती ‘ग्रामजयंती’ म्हणून साजरी केली जावी. ग्रामोत्थानाच्या कार्यात प्रत्येकाने स्वत:ला झोकून द्यावे.
ज्या ज्या वेळी ज्याची उपयुक्तता वाटली त्या वेळी तसे सण प्रत्येक संस्कृतीत आणि धर्मात साजरे केले गेले. दसरा, दिवाळी इत्यादी सणांमागेही असेच औचित्य आहे. म्हणून आजही एका नवीन सणाची गरज आहे. तो सण म्हणजे ‘ग्रामजयंती’. आपले गाव नंदनवन व्हावे, गावाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जावेत, यासाठी ही ग्रामजयंती आहे. ‘इलेक्शनबाजी’ने गावांना अगदीच गोंधळून टाकले आहे. खेडय़ात पूर्वी हे वारे नव्हते. न्यायालयात वकील परस्परांशी वाद घालतात आणि बाहेर आल्याबरोबर हॉटेलात जाऊन चहापान, भोजन करतात. पण खेडय़ातील माणसांमध्ये मात्र वाद झाले की ते वर्षांनुवर्षे शमतच नाहीत. हा दोष खेडय़ांचा नाही. खेडय़ांतील नेत्यांचा आहे. त्यांनी ही कोंबडे लढविण्याची प्रथा तर सुरू केली. पण ती शांत करण्याचे कार्य त्यांना साधता आले नाही.’’
महाराज म्हणतात, ‘‘एप्रिल महिना ग्रामजयंती मास पाळून ग्रामोन्नतीचा कार्यक्रम तयार करा. दसऱ्याला कोणी निमंत्रण देत नाही, त्याप्रमाणे एप्रिल महिन्यात सर्वाचे लक्ष ग्रामावर केंद्रित झाले पाहिजे. ग्रामविकासाची कामे सुरू झाली पाहिजेत. समानता प्रस्थापित झाली पाहिजे परस्परांच्या अडचणी समजावून घेऊन त्या सहाकार्याने सोडविल्या पाहिजेत. त्यासाठी ग्रामजंयती हा सण झाला पाहिजे. तरच तुम्ही माझी जयंती साजरी केली, असे मी मानेन.’’
राजेश बोबडे