राजेश बोबडे

उपासना मार्गात खरे मित्रत्व व खऱ्या उपासनेतील भेद लक्षात आणून देत असतानाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रश्न करतात की, ‘ज्याला जगात खरे मित्रत्व आचरता येत नाही किंवा कळत नाही, त्याला उपासना कशी असते हे तरी कसे कळणार? कारण व्यावहारिक मित्रत्व संपादणे किंवा व्यवहारात खऱ्या मित्रत्वाने वागता येणे हेच त्या उपासनेचे पूर्व स्वरूप होय. जेव्हा व्यवहारात व्यक्ती परस्परांचे पूर्ण हित करण्यास अपुरे पडून आपले उच्च ध्येय साधण्यास असमर्थ ठरतात, तेव्हा व्यावहारिक मित्रापेक्षाही ज्यात अधिक दैवीशक्ती आहे आणि जो आत्मीयतेने आपल्यावर अवलंबित पुरुषाचा स्वीकार करू शकतो व आपल्या स्थितप्रज्ञतेच्या मार्गाचा धडा देऊन, त्यात शांती प्राप्त करून देणाऱ्या त्याच्याच प्रयत्नांत, त्याच्याच मेहनतीत भर घालतो अशा थोर विभूतीशी हे मित्रत्वाचे नाते मनुष्यास जोडावे लागते. आपल्या कमालीच्या सहनशीलतेने त्यांना प्रसन्न करून घेऊन- जी गोष्ट बाह्यांगाने साधू शकत नाही, तिच्या प्राप्तीसाठी आपण मला मदत करून आपल्यात घ्या, अशी विनंती करावी लागते. त्या थोर पुरुषाचे ठायी आपले मित्रत्व लीन करावे लागते, यासच सत्समागम म्हणतात. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर आत्मीयतेने प्रेम करून तेथील दैवीशक्तीची अनन्यगतीने मित्रता साधावी लागते, त्यालाच उपासना असे म्हणत असतात. ही व्यवहारदृष्टी अध्यात्मशक्तीशी समन्वय साधून स्थितप्रज्ञता प्राप्त करून देते.’

महाराज म्हणतात, ‘हा मार्ग ज्याला लाभतो त्याला संप्रदायाची आणि लहानसहान देवतांची आवश्यकता पडत नाही. कारण तो मानव्यशास्त्र पद्धतीने वर येणारा असल्यामुळे कोणत्याही संपत्तीची त्याला जरुरी नसते. हे तो आपल्या चिकित्सक बुद्धीने ओळखून पुढे सरकत असतो. मानवाच्या क्षुद्र वासनांची तृप्ती करून देणाऱ्या इतर देवतांची त्याला काय गरज? कोणी म्हणेल, ‘आपण तर बाकीच्या देवतांना महत्त्वच दिले नाही?’ त्यावर मी असेच उत्तर देईन की, – मला माझ्या मार्गात यांची आवश्यकताच भासली नाही, असे महाराज स्पष्ट करतात.

‘ज्यांना सूक्ष्म व्यवहार कळत नाहीत ते पुरुष आंधळेपणाने कोणत्याही मांत्रिकाकडे जातात, अशी स्थिती होऊन आर्त पण अज्ञानी असे लोक वाटेल तिकडे धडपडत असतात आणि कित्येक स्वार्थ साधूंनी मग ते कोणत्याही धर्म व संप्रदायाचे असोत, लावलेल्या  जाळय़ात साध्यप्रचीतीच्या आशेने जाऊन अडकतात. बहुधा लोकांना फसविण्यासाठीच अनेक विविध एकांगी मार्ग कित्येक लोकांनी मांडले असल्याचेही दिसून येते. वास्तविक ज्यांना आपला उद्धार करून घ्यावयाचा आहे त्यांनी असल्या आडवाटांच्या भडकपणास महत्त्व न देता एका जगच्चालक प्रभूलाच शरण जावे हेच उत्तम, असे सांगत महाराज ग्रामगीतेत सावध करताना म्हणतात

संत बिमारी बसविती। मग बुवांचेही का प्राण जाती?

जगी कोणीच ना मरती। ऐसे का होऊ नये।। संताचा मंत्र कानी पडे। उघडती मोक्षाची कवाडे। मग ऐसे का न घडे। सर्व लोकी सर्रास?

Story img Loader