राजेश बोबडे
कृष्णनीतीमधील साम्यवादाचा सक्रिय पाठ सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘साधुपुरुषांच्या अंगी असलेले सद्गुण आपल्या अंगी उतरविण्याऐवजी त्यांच्या बाह्य आचरणाकडेच लक्ष देणाऱ्या भक्तांचा आज बुजबुजाट झाला आहे व समाजविघातक रुढींना कवटाळून बसण्यातच खरी भक्ती आहे, अशी त्यांची विचित्र भावना झाली आहे. यामुळे मनुष्याची उन्नती न होता अध:पतन होते. आजही भगवद्गीतेची उपासना बाह्य प्रकाराने करण्याचीच प्रवृत्ती आढळून येत आहे.’’
‘‘केवळ भव्य गीता- मंदिरे उभारल्याने गीतेची उपासना केल्याचे श्रेय मिळणार नाही. आधीच भारतात भरमसाट मंदिरे आहेत. त्यात आणखी नवीन मंदिरे बांधल्याने काय होणार? वास्तविक भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान लोकांच्या गळी कसे उतरेल, याचा आज विचार व आचार व्हायला हवा. गीताजयंती साजरी करून व केवळ गीतेच्या तत्त्वज्ञानाची स्तुती करूनही काम भागणार नाही. आज लोकांना केवळ स्तुती करण्याचीच सवय लागली आहे, पण ती गोष्ट कृतीत उतरविण्याचे कष्ट कोणीच घेत नाही. ‘बोलाची कढी बोलाचाच भात’ अशी आज स्थिती झाली आहे. पण याने समाज सुखी होणार नाही. बोलण्याचे दिवस संपले. स्वत: ती गोष्ट कृतीत उतरविली पाहिजे तरच लोकांवर त्याचा परिणाम होईल.’’
‘‘भगवान श्रीकृष्णाने जे तत्त्वज्ञान सांगितले ते प्रथम आपल्या जीवनात उतरविले. त्यांच्या काळी अन्यायाची परमावधी झाली होती. या अन्यायाचा बीमोड करावयाचा तर तो नुसत्या हडेलहप्पीपणाने होणार नाही. हे भगवान पुरेपूर जाणून होते. यासाठी त्यांनी प्रथम अन्यायाविरुद्ध असंतोष निर्माण केला. सुखवस्तू कुलात जन्मास आलेल्या या गोकुळीच्या राण्याने गुराख्यांना जवळ केले. तो त्यांच्याबरोबर वनात गाई चारावयास जाऊ लागला. मी तुमच्यापैकीच एक आहे ही वृत्ती त्याने गोपाळांत निर्माण केली. त्याच्याकरिता ते प्राण द्यावयास तयार झाले. आपल्या सोबत्यांनी गाई राखाव्यात, गाईची सेवा करावी व त्यांना दूध मात्र मिळू नये याची भगवानांना चीड आली. त्यांनी दूध- दही हक्काने द्यावयास सुरुवात केली. जो कष्ट करेल त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळालेच पाहिजे हा साम्यवादाचा सक्रिय पाठ आचरणात आणला. त्यांनी आपल्या गोपाळांना धष्टपुष्ट केले. या संघटनेचा सुगावा लागू नये म्हणून गाई चारण्याच्या मिषाने त्यांना यमुनेच्या तीरावर नेण्यात आले. त्या ठिकाणी अन्यायाच्या विरुद्ध लढण्यास प्रेरित करण्यात आले.’’
‘‘अन्यायी समाजरचना उलथवून पाडण्याचा आदेश देण्यात आला व हा असंतोषाचा वणवा चेतविल्यावर त्याची मशाल अर्जुनासारख्या वीराच्या हातात देण्यात आली. भगवान श्रीकृष्णांनी सामदामादी उपाय थकल्यानंतरच दंडय़ाचा उपयोग केला. अर्जुनाला त्यांनी नानापरीने समजावून सांगितले. पण दुर्योधन सत्तेच्या मदाने धुंद झाला होता. तो पांडवांना सुईच्या अग्रावर मावेल इतकीही जमीन देत नव्हता. तेव्हा या अन्यायाविरुद्ध युद्धाचे शिंग फुंकणे हाच आपला धर्म आहे हे तत्त्वज्ञान त्यांनी अर्जुनाच्या गळी उतरवले.