काळाच्या गणिताचा काही भाग आपण पाहिला. केवढा तो क्लिष्ट प्रकार! पण गणना एवढी किचकट का असावी? तसं पाहता गणना म्हणजे नुसतं एकापुढे एक आकडे मोजत जाणं. काळाची गणनाही अशीच करता येईल?
म्हणजे समजा बाकी कोणत्या भानगडीत न पडता आपण फक्त दिवस मोजू लागलो, तर? आजपासूनच सुरुवात करू. आज पहिला दिवस, उद्या दुसरा, परवा तिसरा, २८ तारखेला २८ वा. मग मार्च महिना वगैरे भानगड नाही. सरळ २९ वा दिवस. असं करत राहायचं. ३१ डिसेंबरला ३३४ वा दिवस असेल. त्याचा पुढचा ३३५ वा दिवस! असं करत गेलो तर? जमेल का? शक्य होईल का?
असं मोजायला काहीच हरकत नाही. कारण काळ अनंत आहे तशा संख्याही अनंतच आहेत! दिवस सरत राहतील आणि संख्या अधिकाधिक मोठी होत राहील. काहीच अडचण नाही.
पण याचा उपयोग काय? हे असं मोजून ना महिना लक्षात येईल, ना तारीख. २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन, १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन वगैरे गोष्टी या कालगणनेत संभवतच नाहीत! १ फेब्रुवारीला शनिवार आहे म्हणजे ८, १५ आणि २२ फेब्रुवारीलासुद्धा शनिवार असणार वगैरे गोष्टींना या कालगणनेत काही जागाच नाही. किंवा जुलै महिना असेल तेव्हा धोधो पाऊस पडत असेल वगैरे विचारसुद्धा संभवत नाही. मग डिसेंबरमध्ये गोव्याची ट्रिप प्लान कशी करायची?
तेव्हा, अशी सोपी कालगणना शक्य असली तरी या कालगणनेचा व्यवहारात काही उपयोग नाही. तस्मात, अशी एखादी कालगणना वापरात असणं केवळ अशक्य. पण अशा पद्धतीच्या एक नाही, दोन कालगणना अस्तित्वात आहेत आणि त्या लोक वापरतात. अर्थात, काही विशिष्ट कारणांकरिता.
त्यातली पहिली कालगणना आहे ‘जूलियन दिवस कालगणना’. ही कालगणनेची कल्पना जोसेफ स्कॅलिजर या फ्रेंच-इटालियन (म्हणजे इटालियन पालकांच्या पोटी फ्रान्समध्ये जन्मलेल्या) विद्वानाने सन १५८३ मध्ये मांडली.
कालगणनेची कल्पना जोसेफ नावाच्या व्यक्तीची आणि नाव मात्र ‘जूलियन दिवस’! असं का? याचा आणि त्या जूलियस सीझरचा काही संबंध आहे का? आहे. पण अप्रत्यक्षरीत्या! जोसेफ स्कॅलिजर यांच्या पित्याचं नाव होतं जूलियस सीझर स्कॅलिजर. तेव्हा, पित्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ जोसेफ महाशयांनी या कालगणनेला ‘जूलियन दिवस’ असं नाव दिलं. असो.
या कालगणनेत ख्रिास्तपूर्व ४७१४ या वर्षातला २४ नोव्हेंबर हा दिवस शून्यावा दिवस मानतात. आणि त्याच्यापुढे सरळ दिवस मोजतात. त्या हिशेबाने आजचा दिवस हा ‘दिवस क्रमांक २४६०७०७’ असेल! अर्थात, नंतर लोकांच्या असं लक्षात आलं की एवढी सात आकडी संख्या लक्षात ठेवण्यापेक्षा ६०७०७ अशी सुटसुटीत पाच आकडी संख्या लक्षात ठेवणं सोपं. त्यामुळे या किंचित बदललेल्या रूपातदेखील ही कालगणना वापरतात.
या कालगणनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे दोन दिवसांमधलं अंतर चटकन सांगता येतं! उदाहरणार्थ, ‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्याला किती दिवस झाले’ याचं उत्तर आपली नेहमीची कालगणना वापरून काढणं मोठं अवघड. पण हेच १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस क्रमांक २४३२४१२ होता एवढं कळलं की स्वातंत्र्य मिळाल्याला २८२९५ दिवस झाले हे क्षणार्धात सांगता येतं! खगोलशास्त्रात या कालगणनेचा पुष्कळ वापर करतात. त्याखेरीज ती संगणक क्षेत्रातदेखील वापरतात.
आता गंमत बघा. १६व्या शतकात दिवस मोजणं शक्य होतं. त्या शतकात एकापुढे एक दिवस मोजणाऱ्या कालगणनेची कल्पना मांडण्यात आली. २०व्या शतकापर्यंत तंत्रज्ञानात चांगलीच क्रांती झाली होती. दिवसच काय, आपण तास, मिनिटं आणि अगदी सेकंदसुद्धा बिनचूकपणे मोजू लागलो होतो. मग या काळात नुसते सेकंद मोजणारी कालगणना अस्तित्वात आली. या कालगणनेला ‘युनिक्स वेळ’ असं म्हणतात. ही कालगणना १ जानेवारी १९७० च्या मध्यरात्री ००:००:०० पासून किती सेकंद झाले हे मोजते. त्यानुसार आज सकाळी १० वाजताची वेळ होती ‘१७३८३८४२०० सेकंद’! साधं, सोपं, सरळ. अर्थातच, ही कालगणना आधी युनिक्स या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये वापरण्यात आली आणि तिची उपयुक्तता लक्षात आल्यावर विंडोज, अॅपल, वगैरे ऑपरेटिंग सिस्टीम्स मध्येसुद्धा या कालगणनेचा वापर सुरू झाला. वरवर पाहता तुमचा संगणक जरी तुम्हाला १ फेब्रुवारी २०२५ वगैरे सांगत असला तरी आतमध्ये तो ही कालगणना वापरतो आहे हे लक्षात ठेवा!