आपण ढग रोजच बघतो, पण त्यांचे शास्त्रीयदृष्टय़ा चार मुख्य प्रकार आपल्याला माहीत असतात का?
धूम-धुआँरे, काजल कारे, हम ही बिकरारे बादल
मदन राज के बीर बहादुर, पावस के उड़ते फणिधर !
चमक झमकमय मंत्र वशीकर, छहर घहरमय विष सीकर
स्वर्ग सेतु-से इंद्रधनुषधर कामरूप घनश्याम अमर !
– सुमित्रानंदन पंत
चारच ओळी. पण त्यांच्यामधून ढगांबद्दलच्या कल्पना, काव्य, परंपरा, विज्ञान या सगळ्यांचे दर्शन कवीने घडवून आणले आहे. नानाविध आकारांचे व क्षणभंगुर वाटणारे ढग हा कल्पना, चित्रे, काव्य यांचा खास विषय. हजारो वर्षांपासून माणूस आकाश आणि त्यात स्वैर विहार करणाऱ्या ढगांकडे पाहात आला आहे. भारतात तर आकाशातील ढगाकडे पाहत पावसाची आळवणी करणे, हेच आपले पिढीजात प्राक्तन राहिले. पण युगानुयुगे ढगांकडे आतुरपणे पाहूनही ढग हा आपल्या अभ्यासाचा, शास्त्राचा विषय कधी झाला नाही. तसे पाचव्या सहाव्या शतकात वराहमिहिरांनी आपल्या बृहतसंहिता या ग्रंथात ढगांचे चार प्रकार सांगितले. त्यांची नावे आवर्तक, संवर्तक, पुष्कर आणि द्रोण. या पैकी कोणत्या प्रकारच्या ढगात सूर्यकिरणांकडून ‘गर्भधारणा’ झाल्यास किती पाऊस पडतो, हे सांगण्यासाठी त्यांनी हे प्रकार दिलेले आहेत. पण या प्रकारांचे नेमके व वस्तुनिष्ठ वर्णन मात्र नाही. ‘सूर्यकिरणांकडून गर्भधारणा होऊन पाऊस पडणे’ ही कवीकल्पना मुळात वाल्मीकींनी रामायणात वापरलेली होती.
अव्याहत यदृच्छ रूपे बदलणाऱ्या तरल ढगांना विज्ञानाच्या चौकटीत बसवणे म्हणजे वाफेला ओंजळीत धरण्याचा प्रयत्न. पण ती किमया करून दाखवली इंग्लंडचे ल्युक होवार्ड यांनी. त्यांनी सर्वप्रथम ढगांचे वर्गीकरण केले. केवळ हौस म्हणून केलेल्या अभ्यासातून एखादा माणूस शास्त्रात केवढी क्रांती घडवून आणू शकतो, याचे होवार्ड हे एक उदाहरण होते. त्यांचा जन्म २८ नोव्हेंबर १७७२ रोजी लंडनमध्ये झाला. बालपणासून त्यांना विज्ञानात रस आणि निसर्ग व हवामानशास्त्राचे आकर्षण होते. आपल्या घरात त्यांनी एक प्रयोगशाळाही उभी केली. काही काळ त्यांनी परागकणांवरही संशोधन केले. खरे तर त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय औषधीनिर्माण उद्याोगासाठी रसायने पुरवणे हा होता. पण त्यांचे लक्ष मात्र सदैव आकाशातील वारे, तापमान, पर्जन्य, ढग यांच्याकडे असे. विविध उपकरणांतून ते हवामानाच्या नोंदी घेत व त्यांचे विश्लेषण करीत. निष्ठेने एखादे व्रत पाळावे तशा त्यांनी ४० वर्षे नोंदी घेतल्या. आकाश, त्याचे रंगरूप, ढग त्यांचे रंग, आकार इ. ते सातत्याने नोंदवत होते. त्यांनी जी निरीक्षणे केली, वर्णने लिहिली, रेखाटने काढली, त्यातून हजारो वर्षे जे कुणाच्याच हाती लागले नाही, ते रहस्यसूत्र त्यांच्या हाती लागले. ते होते ढगांच्या वर्गीकरणाचे सूत्र. १८०३ मध्ये एका शोधनिबंधातून त्यांनी ढगांचे हे वर्गीकरण प्रकाशित केले. खरे तर त्याच सुमारास १८०२ मध्ये प्रसिद्ध उत्क्रांती शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनीही ढगांच्या वर्गीकरणाचा प्रयत्न केला होता. पण होवार्ड यांनी ढगांच्या प्रकारांना दिलेली लॅटिन भाषेतील समर्पक नावे, अचूक व वस्तुनिष्ठ वर्णन इ. कारणांमुळे होवार्ड यांचे वर्गीकरण मान्यताप्राप्त ठरले.
हेही वाचा >>> अन्यथा : पिकासो, रशीद खान आणि संस्कृती ! स्पेनचे धडे : १
होवार्ड यांनी ढगांचे मुख्य तीन प्रकार पाडले. थर असलेले स्तरित किंवा stratus clouds, ढिगाऱ्यासारखे संचयी किंवा Cumulus clouds आणि दोऱ्यासारखे तंतुमेघ किंवा cirrus clouds. या तीन मूळ प्रकारांच्या मधल्या अवस्थांनाही त्यांनी स्तरित तंतुमेघ, संचयी तंतुमेघ इ. नावे देऊन त्यांचे वर्ग पाडले. होवार्ड यांच्या निबंधात ढगांची अनेक रेखाटने व रंगीत चित्रेही होती. पुढेही त्यांनी बरेच हवामानशास्त्रीय संशोधन केले. ‘शहरी हवामानशास्त्र’ या शास्त्रशाखेचे ते प्रवर्तक मानले जातात. १८३७ मध्ये हवामानशास्त्रावरील पहिले पाठ्यपुस्तक त्यांच्याच नावे आहे. २१ मार्च १८६४ रोजी वयाच्या ९२ वर्षी त्यांचा मृत्यू झाला. पण तोपर्यंत ते ‘ढगांचे पितामह’ आणि ‘हवामानशास्त्राचे जनक’ म्हणून अमर झाले होते. त्यांच्यामुळे वातावरणाकडे बघण्याची जगाची दृष्टीच बदलून गेली. प्रसिद्ध जर्मन कवी गटे यांनी तर होवार्ड यांच्यावर कविता लिहिली होती. इंग्रज कवी शेली आणि जॉन रस्किन यांच्या लेखनावरही होवार्ड यांच्या कार्याचा प्रभाव होता.
पुढे अनेक मेघचित्रक ( cloud atlas) प्रकाशित होऊ लागले. तसेच ढगांच्या काही नव्या प्रकारांची भरही पडत गेली. १८७९ मध्ये स्वीडनच्या हिल्डेब्रँन यांनी १६ छायाचित्रांचा मेघचित्रक प्रकाशित केला. १८९६ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय मेघचित्रक फ्रेंच, जर्मन व इंग्रजीत प्रकाशित करण्यात आला. यानंतर १९१०, १९३२, १९३९ असे नवनवे क्लाऊड अॅटलास प्रकाशित झाले. १९३९ च्या अॅटलासमध्ये जमिनीवरून तसेच विमानातून घेतलेली १०१ छायाचित्रे आणि १७४ आकृत्या होत्या. १९५१ मध्ये ‘जागतिक हवामान शास्त्र संघटना’ ही अधिकृत संस्था स्थापन झाली. तिच्या प्रयत्नांतून १९५६ मध्ये दोन खंडातील मेघचित्रक प्रकाशित झाला. तो अजूनही प्रमाण मानला जातो. त्यात सुधारणा करून क्लाऊड अॅटलासच्या अद्यायावत आवृत्त्या प्रकाशित होत असतात.
सोबतच्या आकृतीत ढगांचे विविध प्रकार दर्शवले आहेत. सध्या ढगांचे चार मुख्य प्रकार मानले जातात. १. स्तरित मेघ ( stratus cloud) हे ढग एकावर एक रचलेल्या पाट्या किंवा रुंद पट्ट्यांच्या ढिगासारखे दिसतात. ते पांढऱ्या रंगांचे असून त्यांची लांबी कित्येक कि.मी. पण उंची मात्र कमी असते. २. राशीमेघ (Cumulus clouds) हे अनियमित आकाराच्या प्रचंड ढिगासारखे किंवा राशीसारखे दिसतात. त्यांचे आकारमान वाढत जाते व आकारही बदलतो. ते कित्येक कि. मी. लांब, रुंद आणि उंच असतात. त्यांच्यातील जलकणांच्या प्रमाणानुसार त्यांचा गडदपणा वाढतो. जलबिंदूंचे प्रमाण अधिक असल्यास ते काळे दिसतात. ३. तंतुमेघ (Cirrus cloud) हे ढग उंचावर असून ते तंतू किंवा केसांच्या बटांसारखे दिसतात. त्यांच्यात हिमकणांचे प्रमाण जास्त असल्याने ते पांढरे दिसतात. ४. वृष्टीमेघ ( Nimbus clouds) हे ढग ओथंबलेले असून त्यांचे बाह्यरूप राशीमेघासारखे असते. पण वृष्टीमेघांचा रंग काळा असून ते वेगाने आकार बदलतात. यांच्यातून हमखास वृष्टी होते.
हे ढगांचे चार मूळ प्रकार. पण आपणास आकाशात प्रत्यक्ष दिसतात ते यातील दोन प्रकारांची सरमिसळ होऊन तयार झालेले मिश्र ढग असतात. उदाहरणार्थ तंतुराशी मेघ, स्तरित राशीमेघ, स्तरित वृष्टीमेघ इ. ढग जमिनीपासून ते किती उंचीवर आहेत यानुसार या प्रकारांची विभागणी निम्न मेघ, मध्यमोच्च मेघ व उच्च मेघ अशी करण्यात आली आहे.
ढगांचे असे सर्व प्रकार व वैशिष्ट्ये हे आपल्या कृषिप्रधान देशातल्या आबालवृद्धांना माहिती असणे आवश्यक आहे. पण दुर्दैवाने ही माहिती मराठीत तर फारच कमी ठिकाणी उपलब्ध आहे. आपली शेती व आयुष्यच पावसावर अवलंबून आहे. आणि ढग हेच त्याचे वाहक आणि सर्वार्थाने जीवनाधार आहेत. ढगात माणसाने हत्ती, राक्षसापासून ते भूछत्रापर्यंत असंख्य आकार पाहिले. आपणा भारतीयांना हवे ते देणारा कल्पवृक्षही त्या ढगातच दडलेला आहे. फक्त तो पाहण्यासाठी शास्त्रीय दृष्टी असावी लागते एवढेच.
lkkulkarni@gmail.com
लेखक भूगोलाचे अभ्यासक आणि निवृत्त शिक्षक आहेत.