भारतीय परंपरेतील कला-वैविध्य, उत्सवप्रियता, सामाजिक- सांस्कृतिक जिवंतपणा बव्हंशी रंगातूनच अभिव्यक्त होत असतो. रंगांचा देश म्हणूनच जगात भारताची ओळख आहे. भारतीय संस्कृतीतील रंगांचा वापर हा केवळ सजावटीसाठी नव्हे, तर धार्मिक, राजकीय प्रतीक म्हणून आजही होताना दिसतो. या रंगनिर्मिती उद्योगात पहिली भारतीय कंपनी एशियन पेंट्सला मात्र त्या काळी सात ब्रिटिश कंपन्यांशी स्पर्धा करूनच स्थान निर्माण करता आले. १९४२ साली स्थापित एशियन पेंट्सने काही दशकांपूर्वी केवळ आत्मनिर्भर वाटचाल सुरू केली इतकेच नाही तर ती जगातील १८ देशांच्या बाजारपेठांत दमदार स्थान कमावणारी सर्वात मोठी भारतीय बहुराष्ट्रीय रंग निर्माता कंपनीही बनली. हे शक्य झाले रंग उद्योगाचे अग्रदूत म्हणून लौकिक कमावणाऱ्या अश्विन सूर्यकांत दाणी यांच्या कामगिरी आणि कर्तबगारीने. या कंपनीत तब्बल साडेपाच दशके कारकीर्द राहिलेले तिचे माजी अध्यक्ष दाणी यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी या जगाचा गुरुवारी निरोप घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> आरोग्याचे डोही : व्यायाम नव्हे; उत्सव!

उद्योजकीय यश हा कुणा खास नशीबवानांचा विशेषाधिकार नसतो, तर उपलब्ध संधींचा लाभ आणि अंगी असलेल्या गुण, संसाधनांचा कसबी वापर करून ते साधता येते. अश्विन दाणी यांनी हे पुरेपूर सिद्ध करून दाखविले. वडिलांनी अन्य तीन भागीदारांसह स्थापित केलेल्या उद्योगात दाणी यांनी पाऊल टाकले तरी, कंपनीत नेतृत्वस्थान मिळविण्याआधी त्यांनी विविध जबाबदाऱ्यांसह एक एक शिडी चढत जाणारा प्रवास केला. शिवाय या व्यवसायात प्रवेशापूर्वी आवश्यक ते प्रगत शिक्षण, प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले आणि अमेरिकेतील शिक्षणानंतर काही काळ तेथील कंपनीत उमेदवारीही त्यांनी केली. या पूर्वपीठिकेमुळेच पुढे नेतृत्वपदी येताच कंपनीच्या वाढीच्या उन्नत कक्षा त्यांना खुल्या करता आल्या.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : अमेरिकेच्या ‘मध्यस्थी’नंतर.

उद्योगातील तीव्र स्पर्धेला टक्कर देत, एशियन पेंट्सचा कायापालट त्यांनी घडवला. ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन अंगीकारून निरंतर नावीन्यतेची कास धरल्यामुळेच हे शक्य झाले. खुद्द दाणी म्हणत असत की, रंगांच्या व्यवसायात असणाऱ्यांना एकसुरी, एकमार्गी वाट धरता येत नाही, त्यांनी स्वाभाविकच नावीन्य अंगीकारणे, बदलत्या आवडनिवडींबाबत संवेदनशील असण्याशिवाय गत्यंतरच नाही. यातूनच त्यांनी एशियन पेंट्समध्ये संशोधन व विकास विभाग कार्यान्वित केला आणि नफ्यातील लक्षणीय हिस्सा त्यावर खर्ची पडेल हेही पाहिले. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे, अनेक अनोखी उत्पादने बाजारात आली. भारतात पहिल्यांदाच संगणकीकृत रंग जुळणीचा अवलंब केला गेला. मध्यमवर्गीय कुटुंबातच नव्हे तर रंग उद्योगाला ग्रामीण बाजारपेठेत ग्राहक पाया यातून निर्माण करता आला. नियमित योगाभ्यासावर भर असलेले, चित्रकलेत विशेष रुची असणारे दाणी यांनी जबाबदार उद्योजकतेला अधोरेखित करणाऱ्या सामाजिक आणि पर्यावरणीय कल्याणासाठी पुढाकार घेणाऱ्या उपक्रमांचीही रुजुवात केली. एशियन पेंट्सवर बिगर-कार्यकारी संचालक म्हणून सध्या काम करत असलेला तीन मुलांमधील धाकटय़ा मलव याच्या माध्यमातून त्यांनी उद्योजकीय वारशाचा प्रश्न सोडवला आहे. चिरस्थायी मूल्य निर्माण करणाऱ्या उद्योजकीय क्षमतांचा त्यांनी निर्माण केलेला वारसा खूप मोठा असून, तो भारताच्या उद्योग क्षेत्राची कायम साथ निभावेल.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Co founder of asian paints ashwin dani life journey zws