योगेंद्र यादव
समाजात द्वेष, विखार निर्माण करणारे ‘भारत जोडो यात्रे’मुळे बदलतील अशी अपेक्षा नाही, पण त्यांच्या अशा प्रचाराला बळी पडणारा सामान्य माणूस प्रेमाच्या आवाहनाला प्रतिसाद देतो आहे, हे महत्त्वाचे आहे.
‘भारत जोडो यात्रे’ने जातीय रोष कमी झाला की असे काही झाले, असे वाटणे हा भाबडा आशावाद आहे, हा प्रश्न मी थोडासा घाबरतच विचारतो आहे. मी नेहमीच आकडेवारी, ठोस माहिती यावर अवलंबून राहणारा माणूस आहे. मी आजवर अनेक प्रश्नांवरील दाव्यांसाठी ठोस पुरावे मागितले आहेत. पण माझ्या या वरील प्रश्नाच्या उत्तरादाखल तसे कोणतेही ठोस पुरावे, निदान इतक्या कमी वेळात तरी देता येणार नाहीत. तरीही हा प्रश्न विचारला पाहिजे कारण तो ज्या विषयाशी संबंधित आहे, त्याची व्याप्ती खरोखर तेवढी मोठी आहे. ‘भारत जोडो यात्रे’ने अगदी किरकोळ प्रमाणात धार्मिक तणाव कमी केला असेल, तरी तिला पाठिंबा देण्यासाठी आणि ती साजरी करण्यासाठी ते सर्वात मोठे कारण असू शकते. ज्या काळात राजकारणाकडे ‘वाईट’ म्हणूनच बघितले जाते आणि ते तसेच समोर येते, त्या काळातील राजकारणाच्या सर्जनशील क्षमतेबद्दलची ही गोष्ट महत्त्वाचीच ठरते.
मला नेमके काय म्हणायचे आहे, ते मी आता तुम्हाला नीट सांगतो. मी फक्त एक प्रश्न विचारतो आहे, अंतिम उत्तर देत नाहीये. सामाजिक शास्त्रात म्हणतात त्याप्रमाणे, हे ज्याची चाचणी घ्यायची आहे असे माझे एक गृहीतक आहे. त्याशिवाय, मी धार्मिकतेशी संबंधित दंगली, हिंसाचार आणि द्वेषयुक्त गुन्हे यांसारख्या संघटित किंवा पूर्वनियोजित गुन्ह्यांबद्दल बोलत नाही. ही कृत्ये, द्वेषाच्या राजकारणाचा भाग असलेल्या समूहांकडून केली जात असतील तर ‘भारत जोडो यात्रा’ त्याला विरोध करू इच्छिते.
मला त्यांच्यामध्ये अचानक हृदयपरिवर्तन होणे आणि तेही ‘भारत जोडो यात्रे’तून होणे अजिबात अपेक्षित नाही. मला सुप्त वैर आणि अविश्वास, शिवीगाळ, अपमान, शेजाऱ्यांमधील वादविवाद अशा रोजच्या जगण्यातील जातीय तणावात जास्त रस आहे. या यात्रेमुळे धार्मिक कट्टरतेमधील सर्वसामान्यांचा सहभाग कमी झाला आहे का, यात मला रस आहे. हे केवळ ‘भारत जोडो यात्रेच्या’ प्रवासाचा समावेश असलेल्या क्षेत्रांपुरते मर्यादित नाही. माझे गृहीतक असे आहे की यात्रेचा संदेश जिथे जिथे पोहोचला आहे तिथे तिथे स्थानिक जातीय तणाव कमी झाला आहे.
सौम्य ते मजबूत पाठिंबा
माझे सह-प्रवासी, एकता परिषदेचे पुष्पराग यांनी सर्वप्रथम मला या गृहीतकाबद्दल सतर्क केले. साधारणपणे नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा काळ होता. आम्ही नुकताच मध्य प्रदेशातील एका मोठय़ा गावात (की एक छोटे शहर?) यात्रेचा टप्पा संपवला होता. पुष्पराग यांनी स्थानिक गावकऱ्यांशी झालेल्या त्यांच्या संभाषणाबद्दल आम्हाला सांगितले. ते काही मुस्लीम कुटुंबांशी बोलेले होते. या कुटुंबांनी त्याआधीदेखील ‘भारत जोडो यात्रे’बद्दल ऐकले होते. यात्रेच्या बातम्या येऊ लागल्या तेव्हापासून त्यांच्या गावातील जातीय तणाव कमी होत गेला, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्यापैकी एकजण पुष्पराग यांना म्हणाला: ‘‘आता थोडं शांत -निवांत जाणवायला लागलं आहे.’’ इतर ठिकाणीही अशाच प्रतिक्रिया ऐकल्याचे त्यांनी सांगितले.
माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. कारण अनेकदा असे होते की, एखादी चांगली गोष्ट कळते तेव्हा आम्ही कार्यकर्ते भाबडेपणाने तिच्यावर सहज विश्वास ठेवतो आणि नंतर आमची फसगत होते. मी हे सगळे एका मित्राच्या कानावर घातले तेव्हा त्याने मला सांगितले की, ‘भारत जोडो यात्रा’ ज्या राज्यातून नुकतीच पुढे गेली होती, त्या राज्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडूनही त्याने हेच ऐकले होते. त्या राज्याच्या गुप्तचर अहवालात त्या राज्यातील धार्मिक तणावाच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. परंतु त्यांनी मला याबद्दल मी लगेच लिहू नये असा सल्लाही दिला, कारण यामुळे द्वेषाच्या राजकारणापासून फायदा उठवणारे यातून अस्वस्थ होऊन काही तरी प्रतिक्रिया देऊ शकतात, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. हे काही प्रमाणात खरेही आहे. यात्रेच्या यशानंतर कर्नाटकात द्वेषयुक्त मोहिमांमध्ये वाढ झाल्याचे माझ्या काही मित्रांनी मला सांगितले आहे. तेव्हापासून मी वेगवेगळय़ा राज्यांतील वेगवेगळय़ा सरकारमधील अनेक मित्रांशी संपर्क साधून माहिती घेतो आहे. तेथील प्रतिसाद माझ्या गृहीतकानुसार सौम्य ते मजबूत पािठबा असाच आहे. द्वेषयुक्त गुन्ह्यांमध्ये तसेच माध्यमांमधून चालणाऱ्या विखारी प्रचारमोहिमांमध्ये नाटय़मय घट झालेली नाही, हे खरे आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे, द्वेषाची निर्मिती करणारे त्यांच्या या कामापासून परावृत्त होतील अशी माझी अपेक्षाच नाही. तर ‘भारत जोडो यात्रे’चा एरवी द्वेषयुक्त, विखारी प्रचाराला बळी पडणाऱ्या सामान्य माणसावर काय परिणाम होतो आहे हे बघण्यात मला स्वारस्य आहे.
म्हणून, मला हे गृहीतक संभाव्य समाजशास्त्रज्ञांसमोर मांडायचे आहे. यादरम्यान, मी जातीय वृत्तीमध्ये थोडाफार तरी बदल झाला आहे अथवा नाही याबद्दल देशव्यापी जनमत चाचण्या काय मांडताहेत हे समजून घेण्यासाठी त्यांच्या पुढच्या फेऱ्यांची वाट पाहतो आहे. किंवा या यात्रेचा निवडणुकांच्या पलीकडे जाणारा काही परिणाम होतो आहे का हे सांगणाऱ्या काही अभ्यास, विश्लेषण, संशोधन यांची वाट पाहतो आहे.
द्वेषाच्या काळात प्रेम
कोणतेही चांगले गृहीतक दोन घटकांमधील नाते सूचित करण्यावर थांबत नाही. आपल्याला अशा नात्याची अपेक्षा का असते, हेदेखील त्याने सांगितले पाहिजे. माझे मत असे आहे की ‘भारत जोडो यात्रे’ने धार्मिक कट्टरता कमी झाल्याचे दिसते, ते तिने जातीयवादाचा मुकाबला करण्यासाठी काही सक्रिय शक्ती निर्माण केली आहे, वगैरे कारणांमुळे नाही. त्यासाठी देशव्यापी प्रभाव नोंदवण्यासाठी या यात्रेने पार केलेले क्षेत्र खूपच लहान आहेत. यात्रेने त्या त्या भागात कोणत्याही संघर्षांत प्रभावीपणे हस्तक्षेप करू शकणारे स्वयंसेवक दलही अद्याप तयार केलेले नाही. यात्रेकडे काय आहे, तर ती का सुरू आहे याबद्दलचा सर्वत्र पसरलेला एक साधा संदेश.. ‘भारत जोडो’ एकतेचे आवाहन करते. द्वेषाच्या राजकारणाविरुद्ध राहुल गांधींची स्पष्ट भूमिका, विरोधी पक्षातील मुख्य प्रवाहातील बहुतांश राजकीय नेत्यांनी एकत्रित किंवा धोरणात्मक मौन बाळगल्यामुळे झालेला एक ताजातवाना बदल, यामुळे प्रेम या विषयावर अचानक बोलले जाऊ लागले आहे. ‘‘मी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडण्यासाठी आलो आहे’’सारखी वाक्ये आपण कल्पना केली असेल, त्यापेक्षा जास्त लक्षात राहणारी आहेत.
प्रेमही संसर्गजन्यच
‘भारत जोडो यात्रा’ ईशान्य दिल्ली ओलांडत असताना मी विचार करत होतो. जाफराबाद मेट्रो स्टेशन ते शिव विहार या परिसरातून आम्ही निघालो होतो. हा तोच परिसर आहे, जिथे २०२० मध्ये धार्मिक कत्तल झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून या धार्मिक दंगलीत दुभंगल्या गेलेल्या लोकांनी आमचे स्वागत केले. त्यांच्या पार्श्वभूमीवर मला ऐकू येत होत्या..‘‘सारे जहाँ से अच्छा..’’आणि ‘‘मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना..’’ (धर्म तुम्हाला द्वेष शिकवत नाही) या ओळी. अश्रू ढाळणारा मी एकटाच नव्हतो. गैर-मुस्लिमांची मते मोठय़ा प्रमाणात मिळवण्याचा मार्ग काँग्रेसने शोधला तरच मुस्लीम मतदार पक्षाकडे परत येण्याचा अंदाज राजकीय निरीक्षकांनी त्वरित वर्तवला. पण मी आणखी वेगळय़ाच कारणासाठी त्यांचे चेहरे वाचण्याचा प्रयत्न करत होतो. तिथे स्थानिक हिंदूंची उपस्थिती लक्षणीय होती. पण मुस्लिमांची संख्या मोठी होती आणि त्यांचा उत्साहदेखील उठून दिसत होता. यात्रा त्यांच्या परिसरात होती आणि तिथे त्यांची बहुसंख्या होती हे त्यामागचे कारण होते, की ही अशी यात्रा होती की जिच्यामुळे त्यांना घाबरण्याचे किंवा कसलीही काळजी करण्याचे काहीच कारण नव्हते? की ही माझी नुसतीच कल्पना होती?
मला फैज अहमद फैज यांची प्रसिद्ध ओळ सतत आठवत राहते.. ‘‘खून के धब्बे धुलेंगे कितनी बरसातों के बाद’’. न्यायाच्या अगदी आभास असेल तरी रक्ताचे डाग धुता येतील का? फक्त शब्दांनी रक्त शुद्ध करता येते का? पण रक्ताचे डाग द्वेषातून जन्माला आलेले असतील, तो द्वेष शब्दांतून जन्माला आलेला असेल, तर मग उलट शब्दांपासून सुरुवात का होऊ शकत नाही? की तो फक्त भाबडा आशावाद आहे? जे काही असेल ते असो, कोणी तरी माझे गृहीतक खोटे ठरवण्यापूर्वी मला त्या क्षणाचा आनंद घ्यायचा आहे.
लेखक ‘जय किसान आंदोलन’ आणि ‘स्वराज इंडिया’चे संस्थापक आहेत.
yyopinion@gmail.com