अतुल सुलाखे
काम-क्रोधांस जिंकूनि । यत्नें चित्तास बांधिती
देखती ब्रह्म-निर्वाण । आत्म-ज्ञानी चहूंकडे
– गीताई
श्रीकृष्ण, महावीर, गौतम बुद्ध, शंकराचार्य, ज्ञानेश्वर आणि गांधीजी यांच्या तत्त्वज्ञानाचा विनोबांवर प्रभाव होता. तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत बोलायचे तर साम्ययोग, सत्यग्रण, करुणा, एकसमन्वय जगत्स्फूर्ती आणि सर्वोदय असा षट्कोन दिसतो. विनोबांचा सत्याग्रह विचार जैन दर्शनांमधून आला तर संपूर्ण भूदान यज्ञावर धम्मचक्रप्रवर्तनाचा पगडा होता. हे दार्शनिक चित्र लक्षात घेतल्याखेरीज विनोबांच्या कार्याची प्रेरणा आणि तिचे फलित ध्यानी येणार नाही.
यातील प्रत्येक विचार दुसऱ्याचा अभिन्न भाग आहे. विनोबांनी गीतेच्या साम्ययोगाला इतके पैलू पाडले की त्यांच्या कार्याचे वर्णन ‘साम्यचक्रप्रवर्तन’ या शब्दातच होऊ शकते. भूतदया ते समूहाला ब्रह्मापर्यंत घेऊन जाणे असा या प्रवर्तनाचा आवाका जाणवतो. या प्रवर्तनाच्या पूर्वी विनोबांचे पुरश्चरण सुरू होते. पुरश्चरण म्हणजे एखाद्या पवित्र मंत्राचे वारंवार स्मरण करणे. मननाचा आधार असेल तरच तारणारा अशी मंत्राची व्याख्याच आहे. एखादा मंत्री विनोबांच्या भेटीसाठी आला तर विनोबा म्हणत, ‘तुम्ही मंत्री म्हणवून घेता तुमचा असा मंत्र कोणता?’ कारण मंत्र देतो तो मंत्री असे त्यांचे मत होते. कोणताही मंत्री यावर निरुत्तर होणार हे उघडच होते.
गांधीजींना जे प्रश्न हाती घ्यायचे होते त्यात एक प्रश्न होता जमिनीचा. शेती आणि ग्रामोद्योग याखेरीज इथली बहुसंख्य जनता तगणार नाही हे उघडच होते. गांधीजी असते तर त्यांनी या प्रश्नाची सोडवणूक कशी केली असती याची आपण आज कल्पनाच करू शकतो. विनोबांनी जमिनीच्या प्रश्नावर उपाय शोधताना सत्य, प्रेम, करुणा आणि सन्मान्य उपजीविका यांचा आधार घेतला. गांधीजींनीही हेच केले असते. विनोबांनी सर्वोदय विचारांना नवे रूप दिले. त्या तत्त्वाची सगुण मांडणी केली आणि आपल्या कांचनमुक्तीच्या प्रयोगात ते रमले. विनोबांचे चिंतन नीटसे लक्षात न घेता त्यावर प्रतिक्रिया दिली जाते किंवा त्याची उपेक्षा केली जाते. उदाहरणार्थ शेती. विनोबांचा भौतिक प्रगतीला विरोध होता. विकास आणि तंत्रज्ञान यांच्याशी त्यांची फारकत होती. या मार्गाने गेलो तर नुकसान नक्की होणार अशी भूमिका घेत विनोबांचे विचार फोल आहेत हे ठसवण्याचा प्रयत्न होतो.
विनोबांचा विज्ञान तंत्रज्ञानाला विरोध नव्हता. फक्त त्याची लाभ-हानी कुणाच्या वाटय़ाला येणार हा त्यांचा प्रश्न होता. ठरावीक घटकांनाच त्याचा लाभ होणार असेल तर विनोबा विरोध करणार हे उघड होते. त्यांना अभिप्रेत असणारी समाजरचना समत्व, सत्य, प्रेम, करुणा आणि संयम यावर अधिष्ठित होती. कोणत्याही मार्गाने पण फायदाच व्हावा हा रस्ता निव्वळ नफेखोर भूमिका असणाऱ्यांनाही झेपत नाही मग समाजाचे भले व्हावे या तळमळीने काम करणाऱ्यांना तो निषिद्ध असतो आणि तसेच घडायला हवे.
उत्पादन वाढावे, प्रत्येकाला उत्पादक काम मिळावे, स्वयंपूर्णपणे ग्रामरचना हवी. समाज एकीने आणि नेकीने व्यवहार करणारा असावा या मांडणीमध्ये चुकीचे असे काही नाही. याखेरीज विनोबांच्यामुळे या मांडणीला प्रयोगांची जोडही मिळाली. विधायक समाजाचे स्वप्न पाहणाऱ्या कुणालाही हे सप्रयोग साम्यचक्रप्रवर्तन नाकारता येणार नाही.