मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अतिशय संघर्षाच्या परिस्थितीतून वाटचाल करत असताना केरळमधील मरियम अलेक्झांडर बेबी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. ‘कॉम्रेड बेबी’ म्हणून डाव्या वर्तुळात ओळखला जाणारा हा नेता राष्ट्रीय पातळीवर तसा विशेष प्रसिद्ध नाही. पक्षासमोर एकाच वेळी राजकीय आणि संघटनात्मक समस्या उभ्या असताना बेबी यांच्यासमोरील आव्हानांचा आढावा घेतला जाणे अगदी स्वाभाविक आहे. पण त्यापूर्वी त्यांची थोडक्यात माहिती घेणे योग्य ठरेल.

पक्षाच्या केंद्रीय समितीतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये गणना होणारे ७१ वर्षीय बेबी केरळमधील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. माकपच्या सर्वोच्च पदावर पोहोचणारा पहिला अल्पसंख्याक नेता म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाईल. केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील प्राक्कुलममधील पी. ए. अलेक्झांडर आणि लिली अलेक्झांडर या दाम्पत्याच्या पोटी ५ एप्रिल १९५४ रोजी बेबी यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण राहत्या गावीच झाले. शालेय विद्यार्थी असतानाच त्यांना राजकारणाची आवड लागली आणि ते ‘केरळ स्टुडंट्स फेडरेशन’ या संघटनेत सहभागी झाले. पुढे ही संघटना ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ (एसएफआय) मध्ये विलीन झाली. महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी पक्षाच्या विविध सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. मात्र या धामधुमीत त्यांनी आपले पदवी शिक्षण पूर्ण केले नाही. ‘एसएफआय’ आणि ‘डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया’मधील विविध पदांवर बेबी यांनी काम केले.

बेबी १९८६ ते १९९८ या कालावधीत दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी २००६ मध्ये केरळमधील कुंडारा मतदारसंघातून निवडणूक लढवली. सलग १० वर्षे आमदार म्हणून काम करताना त्यांच्याकडे २००६ ते २०११पर्यंत केरळच्या शिक्षणमंत्रीपदाचीही जबाबदारी होती. केरळमध्ये आरोग्य आणि शिक्षण या दोन क्षेत्रांना सरकारी पातळीवर दिले जाणारे महत्त्व पाहता बेबी यांच्या कर्तबगारीवर पक्षाने मोठा विश्वास टाकला होता हे दिसून येते. माकपमध्ये निर्णय घेण्याचे सर्वाधिकार असणाऱ्या पॉलिट ब्यूरोचे ते २०१२ पासून सदस्य आहेत. २०१४ मध्ये त्यांनी कोल्लममधून रिव्होल्यूशनरी सोशालिस्ट पार्टीच्या एन. के. प्रेमचंद्रन यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला.

केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. केरळमध्ये सत्ता राखणे आणि पश्चिम बंगालमध्ये गेलेला जनाधार परत मिळवणे ही बेबी यांच्यासमोरील मुख्य आव्हाने आहेत. दुसरीकडे, ‘इंडिया’ आघाडीचा मुख्य घटक पक्ष असलेल्या काँग्रेसशी संबंध सुरळीत राखणेही पक्षासाठी महत्त्वाचे आहे. बेबी हे पक्षामध्ये संवाद-कौशल्यासाठी ओळखले जातात. पक्षाचे मावळते सरचिटणीस सीताराम येचुरी पक्के मार्क्सवादी असले तरी काँग्रेससारख्या इतर पक्षांबरोबर समान मुद्द्यांवर संवाद साधण्यासाठी, प्रसंगी तडजोड करण्यासाठी आवश्यक असलेली लवचीकता त्यांच्याकडे होती. हा वारसा बेबीदेखील पुढे नेतील, असे मानले जाते. देशभरात संघटना मजबूत करणे, विचारसरणीचा प्रसार, तरुणांना आकर्षित करणे, मध्यमवर्गीयांपर्यंत पोहोचणे ही कामे प्रचंड अवघड आहेत. जगाप्रमाणेच भारतातही उजव्या राजकारणाची घोडदौड सुरू असताना बेबी यांच्या नेतृत्वाखालील माकप याचा कसा सामना करतो हे पाहणे रोचक ठरणार आहे.