राजेश बोबडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजाची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी ज्ञानेश्वरी, रामायण, भगवद्गीता हे ग्रंथ महापुरुषांना त्या त्या वेळी लिहावे लागले. कौरव व पांडव हे समोरासमोर युद्ध करत असताना भगवद्गीतेचा उदय झाला परंतु सध्याचा काळ बुद्धिभेद करून युद्ध जिंकण्याचा आहे. ‘पंचायतका राज चलेगा, गाव में गुंडे नही होंगे’ असा संदेश देऊन ‘पंचायत राज’ ही संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनीच १९५०मध्ये देशाला सर्वप्रथम दिली. म्हणूनच ग्रामगीतेला आधुनिक भारताची आचारसंहिता व युगग्रंथ संबोधले जाते.

ग्रामगीता नव्हे पारायणासी।

वाचता वाट दावी जनासि।

आजच्या युगाची संजीवनी बुटी।

मानतो आम्ही ग्रामगीता।।

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : मधुप पांडेय

असे महाराज म्हणतात. १९५३ मध्ये पंढरपूर येथे चंद्रभागेच्या तीरावर महाराज ध्यानस्थ बसले असताना त्यांना ग्रामगीता लेखनाची प्रेरणा मिळाली. ग्रामगीतेत आध्यात्मिक विवेचनासोबतच लोकांना ग्रामकुटुंब, जीवनसंस्कार, ग्रामनिर्माण कला, प्रार्थना व विश्वधर्म, दलितसेवा इत्यादी ४१ अध्यायांतून कृतिशील जीवनाचे धडे देण्यात आले आहेत. म्हणूनच महाराज ‘‘अध्यात्म और विज्ञान के संयोगसे सब हो।’’ असे म्हणतात. महाराजांनी १९५५ मध्ये गीता जयंतीला ग्रामगीता भारतीयांना अर्पण केली. तेव्हा देश स्वतंत्र होऊन जेमतेम आठ वर्षे झाली होती. प्रचंड गरिबी, शिक्षणाचा अभाव, स्पृश्यास्पृश्यता, इ. कारणांनी जनता हवालदिल झाल्याचे महाराजांचे निरीक्षण होते.‘‘गाव हा विश्वाचा नकाशा। गावावरून देशाची परीक्षा।’’ म्हणण्यामागे वसुधैव कुटुंबकम् भावना होती. देशाला स्वातंत्र्य तर मिळाले परंतु प्रदीर्घ पारतंत्र्यामुळे मानसिकता मात्र गुलामीची होती. तिचे उच्चाटन करून देशाचा अभ्युदय करण्यासाठी ग्रामगीता जीवनाच्या साराने ओतप्रोत आहे. ग्रामगीतेच्या अपर्णपत्रिकेत महाराज म्हणतात,

तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो।

सकळांचे लक्ष तुजकडे वळो।

मानवतेचे तेज झळझळो।

विश्वामाजी या योगे।

म्हणोनि तुजचि करितो अर्पण।

तू विश्वाचे अधिष्ठान।।

राष्ट्राच्या अभ्युदयासाठी ग्रामगीता अंत्यत महत्त्वाची असून देशातील प्रत्येक गावात हा ग्रंथ वाचला जाणे आवश्यक असल्याने सरकारने सर्व भाषांत हा ग्रंथ अनुवादित करून वितरित करावा, अशी मागणी १९५६च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री डॉ. सी. डी. देशमुख यांनी केली होती, परंतु प्रत्येक सरकारने याकडे दुर्लक्षच केले. महाराजांच्या ग्रामगीतेसह, ‘गुरुदेव’ मासिक आणि अन्य ग्रंथसंपदेचे संपादन व संकलन करण्याचे अमूल्य कार्य जनसारस्वतकार सुदाम सावरकर यांनी केले. तर ग्रामगीतेचे निरूपण ग्रामगीताचार्य रामकृष्ण बेलूरकर यांनी केले. ग्रामगीता निर्मितीबद्दल महाराज लिहितात-

गीता बोधिली अर्जुनाला।

ग्रामगीता ही सर्व ग्रामाला।

राहू नये कोणी मागासला।

म्हणोनि बोलला देव माझा॥

rajesh772@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Concept of panchayat raj by rashtrasant tukdoji maharaj in 1950 zws