मोदींच्या (!) गुजरातमध्ये काँग्रेसने अधिवेशन घेण्याचे ठरवल्यामुळे अहमदाबादमधील दोन दिवसांच्या बैठकांची उत्सुकता वाढत गेली होती. काँग्रेस आता काहीतरी नवा निर्णय घेणार असे वाटू लागले होते. त्याआधी काँग्रेसने तीन दिवस देशभरातील साडेसातशे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना दिल्लीत बोलावले होते. या सगळ्यांनी जिवाची दिल्ली केली होती. या जिल्हाध्यक्षांच्या हाती अधिवेशनात काहीतरी पडेल अशी आशा वाटू लागली होती. या जिल्हाध्यक्षांचा उल्लेख नेत्यांनी जरूर केला. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी आवर्जून म्हणाले की, जिल्हाध्यक्षांना व्यापक अधिकार दिले जातील, जिल्हा काँग्रेस म्हणजे पक्षाचा पाया आहे वगैरे. हा सगळा प्रयोग कार्यरत कसा होणार हा खरा प्रश्न आहे. अशा अधिवेशनांमध्ये राजकीय, सामाजिक आणि आर्थिक ठराव होतातच, त्यातून कार्यकर्त्यांना आणि लोकांना फारसे काही मिळत नाही. या वेळीही तसेच झाले असे म्हणता येईल. हे अधिवेशन होण्याआधी राहुल गांधी गुजरातमध्ये येऊन म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये संघाचे पाठीराखे काम करत आहेत. त्यांना पक्षातून काढून टाकले पाहिजे. अधिवेशनात याबद्दल वरिष्ठ नेत्यांपैकी कोणी चकार शब्द काढला नाही. राहुल गांधीही त्यावर बोलले नाहीत. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीला जमलेल्या सुमारे दोन हजार नेते-पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काहींनी मात्र या कथित संघाच्या समर्थकांचा उल्लेख केला. त्यांचे म्हणणे होते की, कोणी संघाचे समर्थक असतील तर असू द्या. आम्ही संघवाले नाही. आम्ही पक्षासाठी निष्ठेने काम करतो तर आम्हाला पदे द्या, निर्णयाचे अधिकार द्या, पक्ष आम्ही वाढवतो, आम्ही भाजपविरोधात उभे राहतो, आम्ही मोदींना आव्हान देतो! काही नेत्यांनी खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधींच्या समोर धडाक्यात बोलायला सुरुवात केली होती. पण हा विरोधाचा आवाज हळूहळू कमी होत गेला. त्यामागील कारण काय समजले नाही. मग, भाजप व संघाविरोधात आक्रमक बोलणारे कन्हैयाकुमार, इम्रान प्रतापगढी वगैरे नेते राहुल गांधींना आवडेल असे भाषण करत गेले. इम्रान प्रतापगढींची शेरोशायरी सोनिया गांधींना पसंत पडल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते.
अधिवेशनामध्ये काँग्रेसचे दोन गट अप्रत्यक्षपणे समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. कन्हैयाकुमार वगैरेंचा राहुल गांधी निष्ठावानांचा गट संघ-भाजपला उठता-बसता लाखोली वाहिलीच पाहिजे अशा आविर्भावात बोलताना दिसत होता, तर शशी थरूर यांच्यासारखा मध्यममार्गाने जाऊ पाहणारा गट सतत मोदींना शिव्या घालून काही होणार नाही असे म्हणत होता. काँग्रेसने आता काहीतरी वेगळे केले पाहिजे. काँग्रेसला १९-२१ टक्के मते पडतात, या टक्केवारीत वाढ झाल्याशिवाय काँग्रेसला भाजपचा पराभव करता येणार नाही. त्यासाठी तरुण काय म्हणत आहेत हे पाहा, असे शशी थरूर म्हणत होते. पण त्यांना काँग्रेसमध्ये मोदींचे समर्थक म्हणून हिणवले जात आहे. ते राहुल गांधींच्या निष्ठावानांच्या वर्तुळात बसत नाहीत.
राहुल गांधींच्या हाती पक्षाची सर्व सूत्रे देण्याचा प्रयत्न अधिवेशनामधून झाल्याचे दिसले. तसे पक्षाचे निर्णय राहुल गांधीच घेतात. पण, त्यांना सोनिया गांधींचे निष्ठावान पक्षाचा ताबा घेऊ देत नाहीत. ही पूर्वीची खंत इथेही दिसली असे म्हणता येऊ शकेल. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, राहुल गांधी पक्षासाठी कष्ट करत आहेत. त्यांच्याकडे बघा. ज्यांना काम करायचे नसेल त्यांनी निवृत्त झाले पाहिजे… खरगे म्हणाले तेव्हा व्यासपीठावर अनेक ज्येष्ठ नेते बसलेले होते. त्यातील काही नेत्यांच्या सत्तालालसेमुळे काँग्रेसला अलीकडच्या काळात विधानसभेच्या निवडणुकांत पराभव पत्करावा लागला होता. यापैकी अनेक नेते सोनिया निष्ठावान होते. त्यांना राहुल गांधी पसंत नाहीत, ते राहुल गांधींचे ऐकत नाहीत, त्यांना राहुल गांधींची जरब वाटत नाही. या नेत्यांना हात लावण्याचे धाडस राहुल गांधींनीही दाखवलेले नाही. हे नेते काम करत नाहीत असे नव्हे; पण ते राहुल गांधींच्या आवाक्यात नाहीत. काही खरोखरच काम करत नाहीत, त्यांचा पक्षाला फायदा होत नाही. पण, त्यांची निष्ठा सोनिया गांधींना वाहिलेली असल्याने त्यांचे कोणी काही करू शकत नाही. त्यामुळे खरगे म्हणतात तसे, कोण निवृत्त होणार माहीत नाही!
राहुल गांधींचे अलीकडे वेगवेगळे व्हिडीओ समाजमाध्यमांवरून व्हायरल करण्याचा प्रयत्न काँग्रेस करताना दिसतो. त्यातून ते देशातील सर्वसामान्य लोकांना भेटतात, त्यांची सुख-दु:खं जाणून घेतात असे दिसते. राहुल गांधी लोकांना आपुलकीने भेटतात हे खरे. लोकही त्यांच्याशी आपलेपणाने गप्पा मारतात हे ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळाले होते. त्यामुळे लोकांत राहुल गांधींबद्दल आत्मीयता निर्माण झालेली आहे. भाजपने त्यांच्याविरोधात कितीही प्रचार केला तरी ही बाब नाकारता येत नाही. पण राहुल गांधी आठवड्यातील दोन दिवस काम करतात आणि तीन दिवस सुट्टीवर जातात ही प्रतिमा काही केल्या बदलत नाही हेही मान्य केले पाहिजे. अहमदाबादमध्ये दोन दिवसांचे अधिवेशन संपल्या-संपल्या ते राजस्थानला रणथम्बोरला वाघ बघायला निघून गेले. ही सुट्टीच झाली. इकडे अधिवेशन संपले, तिकडे राहुल गांधी राजस्थानला श्रमपरिहार करायला निघून गेले. अधिवेशनात कार्यकर्त्यांना काम करण्याची तंबी द्यायची, पण नेते सतत सुट्टीवर जात असतील तर कार्यकर्ते तरी काय करणार हा प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांना पडत नसावा असे दिसते.
खरगेंच्या समारोपाच्या भाषणाआधी राहुल गांधींचे भाषण झाले. त्यांनी संघ-भाजपवर टीकेचा भडिमार केला. ते म्हणाले की, राजस्थानमधील विधानसभेतील विरोधी पक्षनेते टिकाराम जुली देवळात जाऊन आल्यावर भाजपच्या लोकांनी देऊळ ‘शुद्ध’ केले. भाजपच्या जातिवादावर बोलताना राहुल गांधींनी तीन-चार वेळा जुलींचे नाव घेतले. जुली कुठे आहेत, त्यांना व्यासपीठावर बोलवा, असे राहुल गांधी म्हणत होते. मग धावाधाव झाली, जुलींचा शोध सुरू झाला. पण राहुल गांधींचे भाषण होईपर्यंत जुली सापडलेच नाहीत. नंतर कळले की ते अधिवेशनाच्या ठिकाणावरून केव्हाच निघून गेले होते. राहुल गांधी अधिवेशन संपल्यावर जयपूरला जाणार होते, तिथून ते रणथम्बोरला रवाना होणार होते. जयपूरला राहुल गांधींच्या स्वागताच्या तयारीसाठी जुली आधीच जयपूरला गेले; त्यामुळे ते व्यासपीठावर आलेच नाहीत. राहुल गांधींच्या सुट्टीची तयारी अधिवेशन सुरू असतानाच होत होती असे दिसते. काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काय झाले यापेक्षा राहुल गांधी सुट्टीवर गेले, याचे भांडवल करायला भाजपला नवी संधी मिळाली. मोदी-शहा दिवसातील १८ तास काम करतात असे सांगितले जाते. म्हणजे नेमके काय करतात हे कोणालाही माहीत नाही. अनेकदा या १८ तासांमध्ये मोदींचा बराच वेळ भाषणे देण्यात जातो असे पाहायला मिळाले. काही असो, भाजपने मोदी-शहा कार्यरत असल्याची प्रतिमा तरी बनवली आहे, राहुल गांधींची प्रतिमा ‘सुट्टीवर जाणारे राजकारणी’ अशी भाजपने करून ठेवली आहे, ती बदलण्याची कदाचित गरज काँग्रेसला भासत नसावी असे दिसते.
भाजप हा पक्ष ‘केडर’वर अवलंबून असतो म्हणजे गावा-गावात पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय असतात, त्यांच्या माध्यमातून भाजप आपली धोरणे राबवतो. काँग्रेस कधीच केडरवाला पक्ष नव्हता. लोकांच्या पाठिंब्यावर काँग्रेस निवडून येत असे. या पक्षाचे अस्तित्वही लोकांच्या भरवशावर अवलंबून असते. अजूनही देशातील १९-२१ टक्के लोकांना काँग्रेस जिवंत राहिला पाहिजे असे वाटते, हे लोक इमानेइतबारे काँग्रेसला मते देतात. दहा वर्षांपूर्वीपर्यंत लोकांना काँग्रेस सत्तेवर यावा असे वाटत होते, त्यानंतर त्यांनी भाजपला पसंत केले. भाजपच सत्तेवर राहिला पाहिजे असे त्यांना वाटू लागले. काँग्रेस सत्तेवर यावा असे पुन्हा लोकांना वाटेपर्यंत काँग्रेसला बहुधा वाट पाहावी लागेल. आत्ता तरी लोकांना काँग्रेसकडे सत्ता द्यावी असे वाटत नसावे. अन्यथा २०२४ मध्येच त्यांनी केंद्रात सत्ता बदल केला असता. काँग्रेसही लोकांच्या भरवशावर असल्यामुळे कदाचित नेत्यांना सुट्टी घेण्याची चैन परवडत असावी. महाराष्ट्र, दिल्लीमध्ये पराभव झाल्यानंतर मतदारयादीतील घोळ वगैरे मुद्दे काँग्रेसने हाती घेतले आहेत. पण पुढे काय करणार असे काँग्रेसच्या केंद्रीय नेत्याला विचारल्यावर, ‘हे तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारले पाहिजे’, असे त्यांनी दिलेले उत्तर काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या नेत्यांचा ‘उत्साह’ काय प्रतीचा आहे, हे दाखवून देते. त्यामुळे अहमदाबादमधील अधिवेशनानंतर काँग्रेसमध्ये कोणते बदल होतील हे यथावकाश कळेल एवढेच म्हणता येऊ शकेल.
mahesh.sarlashkar@expressindia.com
© The Indian Express (P) Ltd