दिल्लीतील काँग्रेसचं अकबर रोडवरील मुख्यालय सहा-आठ महिने गजबजलेलं पाहायला मिळतंय. आधी लोकसभा निवडणुकीसाठी आणि आता महाराष्ट्र-झारखंडच्या विधानसभा निवडणुकीमुळं. तसं तर हरियाणाच्या निवडणुकीच्या वेळीही मुख्यालयाच्या आवारात कार्यकर्त्यांची वर्दळ होती. बाकी कधी मुख्यालयात गेलात तर फारसं कोणी दिसत नाही. नेते नसतात, प्रवक्तेही नसतात. हायकमांड येणार असतील तर सगळे अचानक कठून तरी गोळा होतात. असो. आत्ता दोन राज्यांच्या उमेदवारांच्या याद्या तयार करण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे इच्छुकांनी आवार भरून गेलं होतं. अनेकांना उमेदवारी मिळवण्यात रुची होती असं नाही पण, नेत्याबरोबर उपस्थित असलं पाहिजे असं हाडाच्या कार्यकर्त्याला वाटत असतं. नेते आतमध्ये बैठकीत गुंतलेले असतात, हे कार्यकर्ते बाहेर निवांत असतात. त्यांना इच्छुकांचे फोन घ्यावे लागतात. आतमध्ये काय चाललंय त्यांना माहितीही नसतं. पण, ते फोनवर सांगतात, आत चर्चा सुरू आहे. यादीत तुझंच नाव पहिलं आहे. चिंता करू नको, तुला उमेदवारी मिळणार. बैठक संपली की सांगतो तुला. थोड्या वेळाने फोन कर… बैठक संपते, नेते निघून जातात, कार्यकर्तेही जातात. उमेदवारीचं काय झालं कुणालाच काही कळत नाही. अशी ही धमाल काही दिवस काँग्रेसच्या मुख्यालयात पाहायला मिळत आहे. एक-दोन दिवस मुख्यालय पुन्हा शांत होईल. दिवाळी आली, नंतर निवडणुकीच्या प्रचारासाठी सगळे मतदारसंघात जातील. काँग्रेसचं मुख्यालय बैठं आणि विस्तारलेलं आहे. पूर्वी भाजपचं अशोका रोडवरील मुख्यालयही असंच होतं. पण, आता ते दीनदयाळ उपाध्याय मार्गावर चौकोनी इमारतीत गेलं आहे. तिथं अशी गर्दी पाहायला मिळत नाही. निवडणूक असो वा नसो वातावरणाचा आनंद घेता येत नाही. काँग्रेसचंही मुख्यालय नव्या ठिकाणी जाणार आहे. तिथली इमारत पूर्ण होत आली असून तीही पाच-सहा मजल्यांची असेल. मग, कदाचित काँग्रेसच्या मुख्यालयातील वातावरण भाजपच्या मुख्यालयासारखं होईल असं दिसतंय. पक्षाचं कार्यालय नेते-कार्यकर्ते, सामान्य लोकांनी भरलेलं असेल तर त्याची मजा वेगळीच असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा