मुंबई-बंगळूरु महामार्गावरील पुणे ते कोल्हापूर हा प्रवास म्हणजे एखादे दिव्य पार पाडण्यापेक्षा कमी नाही. आपण पृथ्वीवरील एखाद्या रस्त्यावरून जात आहोत, की चंद्रावरून, असा प्रश्न पडावा, अशी या रस्त्याची अवस्था. उड्डाणपूल, रुंदीकरणाची कामे वर्षानुवर्षे सुरूच आहेत आणि त्याला पर्यायी सेवा रस्त्यांची पावसाने नुसती चाळण झाली आहे. हा प्रवास करणे म्हणजे स्वत:ची फरपट करून घेणे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने या महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल आंदोलन केले. खरे तर अशी आंदोलनेही या रस्त्याला आताशा नवीन नाहीत. मुद्दा असा आहे, की समस्या कितीही जोरकसपणे लावून धरली, तरी उपयोग काहीच होत नाही. आज आंदोलन करणारे उद्या सत्तेत गेले, की सत्तेतून पायउतार झालेले नव्या सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करतात आणि प्रश्न जागेवरच राहतो. त्याचे उत्तरही काही फार अनोखे नाही. रस्त्यांची कामे करणारे कंत्राटदार सर्वपक्षीय राजकीय हितसंबंध जपणारे असतात, हे त्या प्रश्नाचे उत्तर आता नागरिकांनाही माहीत झाले आहे. प्रश्न आहे तो किती काळ सामान्य माणसाने हे सगळे सहन करायचे, हा. बरे, हा प्रश्न काही एकाच महामार्गापुरता मर्यादित आहे असे नाही. मुंबई-गोवा महामार्गाची तर गेली काही वर्षे फक्त दुरवस्थाच आहे! हा रस्ता चांगला कधी होता, हेच आता आठवावे लागेल. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील काही महामार्गांचा अपवाद हा फक्त नियम सिद्ध करण्यापुरता. रस्त्यांच्या या दुरवस्थेची पुन्हा चर्चा करण्याचे निमित्त ठरले आहे, ते मुंबई-बेंगळूरु महामार्गाबाबत साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिलेल्या एका आश्वासनाचे आणि ठाण्यात एका युवतीचा खड्ड्यांमुळे जीव गेल्याच्या बातमीचे. रस्ते कसे असावेत, त्यासाठी जे काही साहित्य वापरायचे आहे, त्याचे कशाचे कशावर किती थर असावेत, कुठे किती उंची असावी, अशी मानके इंडियन रोड काँग्रेससारख्या संस्थांनी तयार केलेली आहेत. बरे, ती काही कुठे गोपनीय वगैरे ठेवलेली नाहीत. ती सर्वांसाठी खुली आहेत. मात्र, त्यांचा वापर करून रस्ते चांगले ठेवण्याची ना राजकीय इच्छाशक्ती आहे, ना कोणत्या यंत्रणेला त्याची काही पडली आहे. बरे, रस्ते असे आहेत, तरी टोल का घेता, हा प्रश्न विचारायचीही सोय नाही. त्यासाठी करारांचे दायित्व, परदेशातील व्यवस्था वगैरे माहिती तोंडावर फेकली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा