डॉ. उज्ज्वला दळवी
आजाराबद्दल, शस्त्रक्रियेबद्दल व्यवस्थित माहिती घेऊनच ‘जाणीवपूर्वक संमती’ देणं ही रुग्णाची कायदेशीर जबाबदारी आणि संरक्षक ढालही आहे..
‘‘थायरॉईडचं ऑपरेशन झालं आणि हिचा आवाजच गेला! तसं होऊ शकतं, असं म्हणे त्या संमतीच्या कागदात सांगितलंय! त्या कागदातली डॉक्टरी, इंग्रजी भाषा आम्हाला कशी समजणार? नर्सने सही करायला सांगितली म्हणून आम्ही केली. डॉक्टरांची कातडी बचावायाचा तो कट होता,’’ बाळाभाऊ तावातावाने बोलत होते.
त्या कागदाचं पूर्ण नाव असतं, ‘जाणीवपूर्वक संमती’. कुठलीही शस्त्रक्रिया, दुर्बिणीतून केलेली तपासणी आणि कापाकापी, कर्करोगावरचे जालीम उपचार आणि इतरही अनेक इलाज जाणीवपूर्वक संमतीशिवाय करणं बेकायदा असतं. त्या कागदावर सही करण्यापूर्वी त्या डॉक्टरी-इंग्रजी मजकुराच्या प्रत्येक अक्षराचा अर्थ डॉक्टरांकडून व्यवस्थित समजावून घेऊन त्यानंतरच तशी संमती द्यायची असते. काही ठिकाणी तो कागदावरचा मजकूर रुग्णाच्या, सोप्या भाषेतच छापलेला असतो. त्याविषयीची खात्रीलायक माहिती आता आंतरजालावरही मिळते; पण बहुतेक लोक त्या वेळी, ‘आम्हाला त्यातलं काय कळतंय? डॉक्टर म्हणतील ते खरं,’ अशी आळशी, भित्री पळवाट निवडतात. ‘निर्णय डॉक्टरांचाच’ असं म्हटलं की नंतर काही झालं तरी दोषही डॉक्टरांनाच देता येईल अशीही अपेक्षा असते. आतापर्यंत निर्णय डॉक्टरच घेत होते. ‘जाणीवपूर्वक संमती’ ही संकल्पनाच अलीकडची आहे. पेशंटला काही कळत नाही. त्याला आजारपणाची माहिती द्यायची काहीही गरज नाही, असंच सुश्रुत-संहितेत, सिद्ध-युनानी-अरबी वैद्यकात, हिपोक्रेटसच्या तत्त्वांत, सगळीकडे सांगितलेलं आहे. पण ‘जर शल्यक्रियेने फायदा होण्याची खात्री नसली किंवा एखादवेळी गंभीर दुष्परिणामांची शक्यता असेल, तर मात्र रुग्णाला त्याची पूर्वकल्पना द्यायलाच हवी,’ असं सुश्रुत-चरक-संहिता सांगतात. ‘शल्यक्रियेदरम्यान मृत्यू होण्याचा संभव असेल तर त्याची पूर्वसूचना देणं आवश्यक आहे. तशी न देणाऱ्या शल्यविशारदाला मृत्युदंड द्यावा,’ असं कौटिलीय अर्थशास्त्राचं मत आहे. राजेमहाराजांवर उपचार करताना मात्र जगभरात सगळीकडे त्यांची परवानगी घेतली जात होती. पण सर्वसामान्यपणे डॉक्टर नावाच्या देवमाणसाने सर्वार्थाने रुग्णाच्या भल्याचंच चिंतावं आणि त्याची बापासारखी काळजी घ्यावी अशी समाजाची, रुग्णाची आणि स्वत:कडून खुद्द डॉक्टरांचीही पूर्वापार अपेक्षा होती.
जनसामान्यांच्या मनात डॉक्टरचं सैतानरूप ठसवलं ते हिटलरच्या हस्तकांनी. त्यांनी प्रयोगांच्या नावाखाली हतबल ज्यूंवर अनन्वित अत्याचार केले. पाश्चात्त्य प्रजा डॉक्टरांविषयी साशंक झाली. परवानगीविना केलेल्या शस्त्रक्रियांसाठी लोकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तसे खटले गाजले.
१९५१ साली हेन्रिएटा लॅक्स या स्त्रीच्या गर्भाशयातून डॉक्टरांनी परवानगीशिवाय नमुन्याचे तुकडे मिळवले. त्यांच्यातून संशोधकांना कर्करोगाच्या अमर पेशी मिळाल्या. जगभरातल्या शास्त्रज्ञांनी त्या पेशी अनेक वर्ष अनेक प्रकारच्या संशोधनांसाठी वापरल्या. कित्येक औषध कंपन्यांनी त्यांच्या जोरावर उदंड नफा मिळवला. लॅक्स कुटुंबाला कुणकुण लागल्यावर त्यांनी भरलेल्या खटल्याचा ’डंका तिहीं लोकीं’ दुमदुमला. १९५७ साली एका अमेरिकन माणसाच्या महारोहिणीचा अंतर्भेदी (इव्हेजिव्ह) तपास झाल्यावर त्याच्या पायांतली शक्ती गेली. त्या दुष्परिणामाची त्याला पूर्वसूचना दिली नव्हती. त्या खटल्यानंतर अमेरिकेत ‘जाणीवपूर्वक संमती’ ही डॉक्टरांची कायदेशीर जबाबदारी झाली.
काही ठिकाणी उपचार थांबवतानाही संमती लागते. यंत्राने दिला जाणारा कृत्रिम श्वासोच्छ्वास थांबवण्यापूर्वी जवळच्या नातेवाईकांकडून तशा कागदावर सही लागते. संमतीचा अधिकार अति ताणताही येत नाही. साथ भडकलेली असताना लस घ्यायला संमती न देणं किंवा क्षयासारख्या सांसर्गिक आजारावर उपचार घेण्यास नकार देणं हे पाश्चात्त्य देशांत काही वेळा बेकायदा ठरवलं गेलं आहे.
भारतात त्यासाठी अद्याप स्पष्ट नियम नाहीत. काही महत्त्वाच्या न्यायनिवाडय़ांच्या आधाराने न्यायदान चालतं. जेव्हा रुग्णाच्या जिवावर बेततं तेव्हा त्याच्या परवानगीची वाट न बघता सर्व उपाय करावे लागतात. त्या वेळीसुद्धा रुग्णाने आवर्जून परवानगी नाकारली तर त्या नाकारण्याची कागदोपत्री नोंद जबाबदार माणसांच्या साक्षीने करून घेणं ही भारतीय कायद्यानुसार डॉक्टरची जबाबदारी असते. लहान मुलांना, बुद्धिभ्रष्ट किंवा मानसिक आजार असलेल्यांना जाणीवपूर्वक संमती द्यायची क्षमता नसते. त्यांच्यासाठी जवळच्या सक्षम नातेवाईकाची किंवा वैद्यकीय किंवा सरकारी अधिकाऱ्यांची संमती चालू शकते.
आजाराबद्दल, शस्त्रक्रियेबद्दल आधीच व्यवस्थित माहिती देणं ही डॉक्टरांची आणि ती माहिती समजून घेऊन नंतरच ‘जाणीवपूर्वक संमती’ देणं ही रुग्णाची कायदेशीर जबाबदारी आणि संरक्षक ढालही आहे. म्हणून डॉक्टरांची एक अपॉइंटमेंट केवळ त्या माहितीसाठी असावी. त्याने पुढचे अनंत गैरसमज टळतात. त्या भेटीत मुख्य पाच गोष्टी समजून घ्याव्यात-
१) आजाराचं नेमकं स्वरूप ,
२) त्यावर उपाय म्हणून योजलेल्या शस्त्रक्रियेने किंवा जालीम औषधांनी नेमकी कशी सुधारणा होईल?
३) त्या शस्त्रक्रियेचे, औषधाचे फायदेतोटे काय? ४) त्या उपायांना काही पर्याय आहेत का?
५) प्रत्येक पर्यायाचे फायदेतोटे काय?
कधीकधी सांगितलेल्या उपायापेक्षा वेगळाच पर्याय आपल्याला अधिक आवडतो. मग त्याच्याविषयी डॉक्टरांशी चर्चा करावी. डॉक्टरांनी निवडलेल्या पर्यायामागची त्यांची कारणं समजावून घ्यावीत. डॉक्टर-रुग्ण दोघांनाही पटणारी, सोयीची योग्य पद्धत निवडायला त्या चर्चेचा फार उपयोग होतो.
काही डॉक्टरांकडे सोपं करून सांगायची हातोटी असते. काही जण तर चित्रं, पत्रकं, व्हिडीओ दाखवून, रुग्णाच्या भाषेत शंका दूर करतात. काही निष्णात, सज्जन डॉक्टरांना मास्तरकी अजिबात जमत नाही. त्यांच्याकडून माहिती खणून मिळवावी लागते. मोठा आजार, शस्त्रक्रिया, मोठा खर्च यांच्या विचाराने सैरभैर झालेला रुग्ण क्वचितच उत्तम विद्यार्थी असतो. ‘हे ऑपरेशन झालं की बरं वाटेल ना?’ हा एकच प्रश्न तो पुन:पुन्हा विचारतो आणि डॉक्टर काही सांगोत, होकारार्थी उत्तर धरून चालतो. संभाव्य दुष्परिणाम शंभर वेळा सांगितले तरी त्याला ऐकूच येत नाहीत.
म्हणूनच त्या महत्त्वाच्या मुलाखतीच्या वेळी रुग्णासोबत एक मध्यस्थ हवा. परिणामांशी भावनिक गुंतवणूक नसलेला आणि डॉक्टर सांगतील ते समजू शकणारा असा मध्यस्थ. रुग्णाच्या मनात आलेले आणि न आलेलेसुद्धा सगळे बारीकसारीक प्रश्न त्याने विचारून घ्यावेत. जे काही दुष्परिणाम त्या कागदात लिहिलेले असतात त्यांची शक्यता किती टक्के आहे? संबंधित रुग्णालयात तशा किती शस्त्रक्रिया होतात? या सर्जनने आतापर्यंत तशा किती शस्त्रक्रिया केल्या आहेत आणि त्याचा हातगुण कसा आहे? ही माहिती त्या कागदावर नसते. पण ते मुलाखतीत विचारता येतात. इतर ठिकाणांहूनही माहिती काढता येते.
ते नीट समजलेलं सगळं त्या जाणकाराने नंतर सावकाश, वेगवेगळय़ा पद्धतीने आणि पुन:पुन्हा रुग्णाला समजावून सांगावं. पूर्वी ते काम फॅमिली डॉक्टर नावाचा देवमाणूस बिनबोभाट करत असे. आता मध्यमवर्गीयांच्या नात्यात एखादा तरी डॉक्टर असतोच. त्याची मदत घेणं उत्तम. तशी सांगोपांग माहिती जाणून घेऊन मगच त्या ‘जाणीवपूर्वक संमती’च्या कागदावर सही करावी किंवा करू नये.
शरयूताईंना माहितीतले दुष्परिणामच ऐकू आले. ‘इतके भयानक परिणाम होणार असतील तर नकोच ते ऑपरेशन! हे आहे तसंच सहन करणं बरं!’ म्हणून त्यांनी गर्भाशयाचा कर्करोग शेवटपर्यंत पोटात बाळगला आणि मृत्यू पत्करला! ती शस्त्रक्रिया केलीच नाही तर काय होईल हे व्यवस्थित समजल्यावरही जर रुग्णाला ती नको असेल तर त्या इच्छेला मान देणं हे डॉक्टरचं कर्तव्य असतं. कधीकधी संमती दिल्यानंतरही रुग्णाचं मन कच खातं. सही दिल्यानंतरही ‘शस्त्रक्रिया नको’ म्हणायचा किंवा जालीम उपचार थांबवायचा पूर्ण अधिकार रुग्णाला असतो. पण तो नकारही जाणीवपूर्वकच असायला हवा. त्याच्यामागे औदासीन्य, भ्रम, बुद्धिभ्रंश वगैरेंपैकी काही कारण नाही ना, याची डॉक्टरला खात्री पटायला हवी. तशी पटल्यावर मात्र त्या नकारावर आत्महत्येचा शिक्का बसत नाही. त्या निर्णयापोटी मृत्यू आला तर तो कायदेशीररीत्या नैसर्गिक मृत्यू ठरतो.
संमती द्यायची की नाही ते संपूर्ण माहिती मिळाल्यावर जाणीवपूर्वकच ठरवावं. लग्नासाठी होकार देताना सगळी बारीकसारीक माहिती काढल्याशिवाय पुढे जायचं नाही आणि एकदा होकार दिला की मग मात्र साखरेची सालं काढायची नाहीत असा नियम आयुष्य सुखाचं करतो. शल्यक्रियेला, जालीम उपचारांना संमती देतानाही तोच नियम अनुसरला, तर आरोग्याबाबतचे कित्येक घोटाळे आपोआप निस्तरले जातील.
लेखिका वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त आहेत.
ujjwalahd9@gmail.com