अंजली चिपलकट्टी

QAnon (क्यूॲनॉन)बद्दल ऐकलं आहे का? ती म्हणे अमेरिकेतली एक कारस्थान ‘चळवळ’ होती. ट्रम्प यांच्या कडव्या अंध-समर्थकांनी २०१७ पासून तिला चालना देण्यास सुरुवात केली होती. हे अंध-समर्थक इतके अंध की त्यांनी २०२० मध्ये अमेरिकेत झालेल्या निवडणुकीतील ट्रम्प यांची हार मान्य करणं नाकारलं आणि चक्क लोकांना चिथावून अमेरिकेच्या कॅपिटॉल (लोकसभा)वर हल्ला केला! अमेरिकनांसाठी कारस्थान-कथा काही नवीन नाहीत. मात्र ट्रम्प यांना कारस्थान करून हरवलं जातंय या कारस्थान-कथेनं मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र आणलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना चिथावणी देऊन उघडपणे थेट हिंसेला प्रवृत्त करण्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी. ‘गार्डियन’ या वृत्तपत्रात २०१७ सालीच ‘आपण कॉन्स्पिरसी थिअरीच्या सुवर्णयुगात प्रवेश केला आहे की काय?’ अशा मथळ्याचा लेख प्रसिद्ध झाला होता. तो बहुधा भविष्यातल्या या घटनेचं सूतोवाच करणारा होता.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Pankaja Munde and Dhananjay Munde vs Suresh Dhas new controversy on political stage after elections
मुंडे बहीण-भाऊ विरुद्ध सुरेश धस, निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नवा वाद
Inquiry into cases in Beed Parbhani through retired judges Nagpur news
बीड, परभणीतील प्रकरणांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
Itishree, physical health, mental health , Itishree article ,
इतिश्री : ‘क्लोजर’ हाच अंतिम उपाय
Actor Subodh Bhave expressed his anger that Marathi movie are not getting screens
“आपल्याच राज्यात आपल्याला भीक मागवी लागतेय”, सुबोध भावे असं का म्हणाला? जाणून घ्या…
Asen Me Nasen Me Review
असेन मी नसेन मी!
Allu Arjun arrest, Pushpa 2 , Telangana Theater women Death ,
अशा दुर्घटनांना सेलिब्रिटींना जबाबदार धरायचे की नाही?

‘कॉन्स्पिरसी’ हे टॉम फिलिप्स व जॉन एलिज यांनी लिहिलेलं पुस्तक अमेरिका-युरोपमध्ये प्रभावी ठरलेल्या अशा अनेक कारस्थान-कथांचं सुरस वर्णन करतंच; पण त्याचा गाभ्याचा मुद्दा म्हणजे कोणत्या प्रकारची मानसिकता अशा कारस्थान-कथांना जन्म देते किंवा विश्वास ठेवण्यास भाग पाडते, हा आहे. अशा कारस्थान- कथांपासून सावध राहायचं असेल तर काय काळजी घ्यावी, याबद्दलही पुस्तकात बरीच चर्चा आहे. पण कट-कारस्थान कथा इतक्या मनोरंजक असतात की त्या गॉसिपपासून खरंच कोणाला स्वत:ला ‘वाचवायचं’ असतं का, हा प्रश्न मनात येत राहतो.

हेही वाचा >>> भूगोलाचा इतिहास : इतिहास घडवायचाय…? भूगोल शिका!

पुस्तकात गेल्या ५०-१०० वर्षांतल्या ज्या ‘टॉप’च्या कॉन्स्पिरसी थिअरी दिल्या आहेत, त्यांची झलक पाहा- ‘इल्युमिनाटी’ नावाचा एक गुप्त गट जगभरात मोठे उत्पात घडवत असतो- फ्रेंच राज्यक्रांतीपासून, रशियाचे तुकडे पाडण्यापर्यंतचे मोठे कट ‘ते’ शिजवतात. करोनाची महासाथ ही ठरवून पसरवली गेली, लसीतून मायक्रोचिप्स शरीरात सोडून बिल गेट्सला जगावर ताबा मिळवायचा आहे, वर्ल्ड ट्रेंड सेंटर पाडण्यात अमेरिकी सरकारच गुंतलं होतं, हवामान बदल ही समस्या नाहीच, ते काही वैज्ञानिकांनी रचलेलं कुभांड आहे, चंद्रावर अमेरिकेने उतरवलेलं यान आणि मानवाचं पहिलं पाऊल वगैरे नाटक आहे, पृथ्वी खरंतर सपाट आहे पण कोणीतरी ठरवून आपल्याला फसवत आहे, जगात अनेक देशांत लोकशाही वरकरणी असली तरी जगाची सत्ता काही मोजक्याच लोकांच्या हाती आहे, प्रिन्सेस डायनाचा अपघाती मृत्यू ब्रिटिश इंटेलिजन्सने घडवून आणला, बराक ओबामा अमेरिकेत जन्मलेले नाहीतच, आपली सरकारं स्थलांतरित लोकांना झुकतं माप देऊन त्यांचा खरा आकडा लपवत आहेत, शेवटी ‘त्यांची’ संख्या वाढत जाऊन आपण अल्पसंख्य होणार आणि ‘ते’ आपल्या देशाचा कब्जा घेणार. केनडींचा खून एका माणसानं केला नसून अनेक राजकारणी आणि कॉर्पोरेट्ने रचलेला तो कट होता, उडत्या तबकड्यांतून एलियन येतात आणि आम्हाला दिसतात अशा अनेक अफवा/ कथांची रसभरीत वर्णनं यात आहेत. ‘एवढे लोक विश्वास ठेवतात म्हणजे त्यात काहीतरी खरं असणार’ आणि ‘कोणीच काही बोलत नाही म्हणजे खरं नसणार’ या दोन्ही विधानांतला फोलपणा जाणून घ्यायचा असेल, तर हे पुस्तक जरूर वाचायला हवं.

कारस्थान-कथा, अफवा रचण्यात आणि पसरवण्यात भारतही अव्वल स्थानावर आहे. इथं पसरवलेल्या अनेक अफवा/ कारस्थानांचा या पुस्तकात उल्लेख नसला तरी त्यांच्याशी असलेलं साधर्म्य पुस्तक वाचताना जाणवतं. २००० च्या नोटेत कशी चिप बसवली आहे, भारतात मुस्लिमांची संख्या वाढत जाऊन ते कसे देशावर कब्जा करतील, जॉर्ज सोरोस कसं भारतातल्या सरकारला अस्थिर करतोय, नोटबंदी करावी लागली कारण नोटा छापायचं यंत्र नेत्यानं पाकिस्तानला विकलं, सुशांत-सिंहच्या मृत्यूचं गूढ, सुभाषचंद्र बोस, लालबहादूर शास्त्री यांना कसं मारण्यात आलं… अशा कारस्थान-कथा हे आपले देशी नमुने.

मानसिकतेचा प्रश्न

पुस्तकात भारतातल्या १८५७ च्या बंडाचा उल्लेख आहे तो ‘कारस्थान’ म्हणून! ब्रिटिश साम्राज्यशाही विरुद्ध अनेक देशांत उत्स्फूर्तपणे केलेले उठाव (१७९८ मध्ये आयरिश लोकांचं बंड, १८४४ मध्ये झालेलं क्युबामधलं बंड, भारतातलं १८५७चं बंड वगैरे) म्हणजे बंडखोर लोकांनी केलेली कटकारस्थानं होती, असंच त्यावेळेला ब्रिटिश सरकारनं मानलं आणि खटले भरले, अन्याय्य कायदे केले. शोषण करणाऱ्या सत्तेविरुद्ध लोकांनी केलेल्या उठावाचं आधी पद्धतशीरपणे नियोजन केलेलं असो वा नसो त्याला कारस्थान कसं म्हणायचं? अलीकडे भारतात झालेलं ‘टूलकिट’ प्रकरण यानिमित्ताने आठवलं.

पुस्तकात कॉन्स्पिरसी थिअरीवर विश्वास ठेवण्यामागच्या विशिष्ट मानसिकतेवर जागोजागी भाष्य केलं आहे. त्यातले कळीचे मुद्दे –

(१) आजूबाजूला जे घडतं त्याला कोणीतरी कारणीभूत आहेच, असं मानण्याची वृत्ती. अर्थपूर्ण पॅटर्न शोधण्याची माणसाची वृत्ती ही खरंतर माणसाच्या बुद्धिमत्तेची मोठी खूण. ती तारतम्यानं वापरली तर त्यातून कुतूहल, विज्ञान जन्मतं. याचा अतिरेक होऊन त्यात भीती मिसळली की गडबड होते. झुडुपांच्या पानांच्या नक्षीत वाघाचा चेहेरा दिसणं, कोणीतरी आपला पाठलाग करतंय असा भास होणं असे भीतीचे संकेत मिळणारी माणसं संशयग्रस्त (पेरेनॉइड) असतात. त्यांना संबंध नसलेल्या गोष्टींमध्येही काहीतरी संबंध दिसतो, याला ‘अॅपोफेनिया’ असं म्हणतात. तशी वृत्ती असलेले आपले पूर्वज धोक्यापासून वाचले असतील म्हणून ती वृत्ती उत्क्रांतीत टिकून राहिली. सतत पॅटर्न दिसणं, शोधणं याचं ‘ऑब्सेशन’ असण्याचा पुढचा मजेशीर टप्पा म्हणजे तो पॅटर्न कोणीतरी ठरवून घडवला आहे, असं वाटणं. याला मायकेल शर्मर ‘एजंटीसिटी’ म्हणतो! पॅटर्नमागे काहीतरी सुप्त हेतू किंवा कार्यकारणभाव आहे, असं काहींना सहजपणे वाटतं. याला ‘थिअरी ऑफ माईंड’ कारणीभूत असते. माणसाला जशा भावभावना, ध्येयं असतात तसंच निसर्गातल्या पावसाला, वाऱ्याला, झाडांना, इतर प्राण्यांनाही असतात; त्यामुळे ते ठरवून काही गोष्टी करतात असं वाटणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्सुनामी, वादळ रोगांच्या साथी म्हणजे निसर्गाचा/ देवाचा कोप कारण माणसांचा पापाचा घडा भरलाय वगैरे. अज्ञात शक्तीवर कर्तेपण सोपवलं की एक प्रकारची सुरक्षितता मिळते.

अलीकडे विज्ञानातल्या शोधांमुळे अशा आपत्तींमागची कारणं समजली. आता दोष देवाला देता येत नसेल तर कर्ता कोण असा प्रश्न तयार होतो. ती अनिश्चितता टाळण्यासाठी नवीन एजंट हवा! जे वाईट चाललंय त्याला कोणीतरी कर्ता हवा, असं वाटतं. मग ‘आपण’ आणि ‘ते’ पैकी ‘ते’ गटाकडे संशयग्रस्त दृष्टीने बघणं आपोआप सुरू होतं. (तबलिगींनी साथ पसरवली ही अफवा आठवते ना?) संकट-काळात कारस्थान-कथा जास्त प्रमाणात पसरतात कारण लोक संशयग्रस्त झालेले असतात. खरं तर मोठ्या संकटाच्या निमित्ताने (उदा.- कोविड) आरोग्य अव्यवस्था, सामाजिक विषमता, गरिबी, स्थलांतरितांविषयी बेपर्वाई/ तिरस्कार, या समाजाला पडलेल्या भेगांचं जे दर्शन होतं, त्या भेगा बुजवण्याकडे आपला कल असला पाहिजे. पण कारस्थान-कथा ते विसरण्यास भाग पाडतात, म्हणून निकम्मे सत्ताधारी नेहमी कारस्थान-कथांचा वापर करतात आणि आपण त्यात गुंतून पडतो.

(२) माणसाच्या मेंदूमध्ये काही शॉर्टकट्स (कॉग्निटिव्ह बायस) असतात. त्यापैकी कन्फर्मेशन, हिंडसाइट बायस आणि प्रपोर्शनॅलिटी बायस इथं ‘ओव्हरटाइम’ करतात. हिंडसाइट बायस असणारी माणसं इतिहास उलटा वाचतात- म्हणजे घटनाक्रम उलटा केला की ती घटना घडणं कसं क्रमप्राप्तच होतं असं त्यांना वाटतं. मग ते इतकं ‘प्रेडिक्टेबल’ होतं तर ते टाळता आलं असतं. तरीपण टाळलं नाही म्हणजेच ते कोणीतरी घडवलं, कारस्थान केलं अशी विचारांची साखळी त्यांच्या मनात तयार होते. प्रपोर्शनॅलिटी बायस म्हणजे जितकी मोठी गोष्ट घडली त्याचं कारणही तेवढं मोठंच असणार. सोव्हिएट रशियाचे तुकडे होणं म्हणजे काही खाऊ नाही! एवढ्या मोठ्या घटनेमागे मोठीच संघटना कार्यरत असली पाहिजे!

(३) घटनांचा अर्थ लावताना नसलेली माहिती कल्पनेनं भरून काढणारी, बातमी ‘आपण’ इतरांना सांगितली यात स्वत:चं महत्त्व वाढण्याची सुप्त इच्छा असणारी काहीशी एकटी, तणावग्रस्त माणसं कारस्थान-कथा रचण्यात आणि पसरवण्यात आघाडीवर असतात.

जगात अनेक राजकीय, कॉर्पोरेट कटकारस्थानं खरोखरीच झालेली आहेत/ होत असतात. स्नोडेन आणि असांजेसारखे बडे व्हिसल-ब्लोअर, ५० वर्षानंतर जी सरकारी गुप्त कागदपत्रं उघड होतात किंवा माहितीचा अधिकार यातून सरकारी आकडेवारी, स्ट्रॅटेजी, कोणतं युद्ध कसं पेटलं, हेरगिरी, कट कसे रचले गेले याबद्दल माहिती मिळते. काही माणसं सत्य खणून काढण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत असतात. यावर अनेक सिनेमेही बनवले गेले. कदाचित याचमुळे कारस्थान-कथांवर विश्वास ठेवणं वाढलं असावं.

अलीकडच्या काळात मात्र कारस्थान-कथांची जातकुळी बदलली आहे. मानव-विज्ञान सांगतं, की उत्क्रांतीच्या टोळीअवस्थेच्या टप्प्यावर गप्पा-गोष्टी, गॉसिप, अफवा हे सामान्य माणसांनी टोळीच्या म्होरक्यानं केलेल्या अन्यायाविरुद्ध वापरायचं हत्यार होतं. अशा म्होरक्याविरुद्धच्या कुजबुजीचं रूपांतर कथांमध्ये होत असे. टोळीतल्या लोकांचा असंतोष वाढत जाऊन ते नेत्याला हुसकावून लावत. इतका वचक या सामान्यांच्या अन्याय-कथांचा असे. आता मात्र काहीशी उलटी स्थिती आहे. जे सामान्यांचं बचावाचं अस्त्र होतं ते सत्ताधाऱ्यांनी शस्त्र म्हणून वापरण्यास सुरुवात केली. सध्या आपण सामोरे जातोय ते उघडपणे सत्ताधारीच प्रोपगंडातून पसरवत असलेल्या खोट्या कारस्थान-कथांना. तेव्हा बहुसंख्य निष्ठावान जनताच या कारस्थानात सामील झालेली असते. उदा- ट्रम्पने मेक्सिकन घुसखोर हा ‘स्ट्रॉ-मॅन’ उभा करून अमेरिकन रिपब्लिकन लोकांना वेड लावलं. सद्दाम हुसेनविरुद्ध ‘वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन’चा प्रोपगंडा करून बुशने इराक बेचिराख करून टाकलं आणि सर्व जग पाहात राहिलं. भारतातही बाबरी मशीद पाडली गेली, गुजरातेत दंगली भडकावल्या गेल्या त्या प्रोपगंडातून. ‘क्यूअॅनॉन’ची भीती अमेरिकी लोकशाहीवादी लोकांना वाटते ती याच कारणासाठी. लोकांना गोंधळात टाकण्यासाठी सत्ताधारीच विविध प्रकारच्या कारस्थान-कथा रचून त्या लोकांमध्ये सोडून देतात. त्यांच्या चर्चा लोक करत राहतात आणि रोजच्या जगण्याशी संबंधित अन्याय्य-गोष्टी मागे पडतात.

माणसाची खासियत अशी की त्याचं वर्तन हे जनुकांच्या तुलनेत सांस्कृतिक पर्यावरणावर जास्त अवलंबून असतं. मेंदूची लवचीकता हा त्यांच्यातला दुवा असतो. प्रोपगंडामधून जे अवास्तव सांस्कृतिक पर्यावरण घडवलं जातं, ते मेंदू खरं मानतो आणि स्वत:चं वर्तन त्यानुसार बदलतो. अशा माहितीचा सततचा मारा आणि आपले पूर्वग्रह याची गोळी इतकी जालीम काम करते, की माणसं मग स्वत:च त्या प्रोपगंडात उडी घेतात.

लिबरल की कॉन्झर्व्हेटिव्ह- यापैकी कोण जास्त कट-कारस्थानं रचणारे किंवा विश्वास ठेवणारे असतात? यात तीन मुद्दे मांडता येतील (१) कारस्थान-कथा दोघांनाही आवडतात. मात्र कॉन्झर्व्हेटिव्ह लोकांची संख्या आणि विश्वासाचं प्रमाण लिबरल लोकांपेक्षा जास्त असतं. (२) गेल्या १० वर्षांत कारस्थान-कथांवर (विशेषत: राजकीय हेतूने प्रेरित) विश्वास ठेवण्याचं कॉन्झर्व्हेटिव्ह लोकांचं प्रमाण वाढलं आहे. (३) लोकशाही मार्गानं निवडून आलेले मात्र हुकूमशाही वृत्तीचे नेते सत्ता राखण्यासाठी खऱ्या कट-कारस्थानांचा आणि प्रोपगंडा-कथांचा उपयोग करतात. अशा नेत्यांनी पसरवलेल्या अफवा आणि प्रोपगंडावर विश्वास ठेवण्याचा कल कॉन्झर्व्हेटिव्ह लोकांमध्ये जास्त असतो. विशेषत: कॉन्झर्व्हेटिव्ह एलिट लोकांचं प्रमाण जास्त असतं!

पुस्तकात असं एक वाक्य आहे, ‘‘ (प्रगत) लोकशाही देशांत हुकूमशाही प्रवृत्तीचे नेते लोकांसमोर दाखवण्यापुरते ‘पपेट’ विरोधी नेते उभे करतात आणि खोटी चर्चासत्रे घडवून आणतात, कारण शेवटी लोकशाही आहे ना! ’’भारतात तर इतकं करायचीही गरज नाही कारण विरोधक नसलेच पाहिजेत अशा प्रकारचं नॅरेटिव्ह जनतेने अलीकडे स्वीकारलं आहे. सर्व माध्यमं सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात असणं, यात गडबड आहे याची जाणीव पुस्तकातून झिरपत राहते. टीम हार्डफोर्ड या अर्थतज्ज्ञानं एक उपाय सुचवला आहे. एखादी बातमी, अफवा ऐकताना तुमच्या मनात काय भावना येतात याकडे लक्ष द्या- जर तुमच्या मनात भीती, द्वेष, तिरस्कार या भावना उत्पन्न होत असतील तर आधी सावध व्हा. कशासाठी? कारण भावना आपल्या सारासार विवेकावर स्वार होतात. बातमी खरी की खोटी हे तपासण्याची इच्छा आणि धार कमी होते. कारस्थान-कथा, फेक न्यूज, फालतू बातम्या यांचा उद्देश लोकांपर्यंत जाणाऱ्या माहितीतला ‘नॉईज’ वाढवणं असा असतो. एकदा का प्रचंड प्रमाणातल्या बातम्या अवतीभवती जमल्या की खरं आणि खोटं यांच्यातल्या रेषा पुसट होत जातात. त्याऐवजी चटपटीत बातम्या लक्ष वेधून घेतात. अशा बातम्या आपलं लक्ष चक्क चोरतात आणि समाजातल्या खऱ्या समस्यांवरचं लक्ष विचलित होतं. सत्ता टिकवण्यासाठी लोकांच्या भावनांवर प्रभाव पाडणं सहज शक्य होतं आणि लोकशाही मूल्यांची घसरण होते. कारस्थान-कथांच्या फोडणीसकट सावध इशारे देणारं पुस्तक वाचण्यासाठी शुभेच्छा!

कॉन्स्पिरसी…

लेखक : टॉम फिलिप्स व जॉन एलीज

प्रकाशक : हॅचेट

पृष्ठे : ३५० ; किंमत : ५९९ रु.

Story img Loader