डॉ. श्रीरंजन आवटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संविधान निर्मितीसाठी अधिक वेळ लागला, अशी टीका होते. मात्र मानवी इतिहासातील सर्वाधिक हिंसक कालखंडाच्या पार्श्वभूमीवर झालेले हे कार्य विशेष महत्त्वाचे होते.

संविधान सभा स्थापन झाली डिसेंबर १९४६ मध्ये आणि तिने संविधान निर्मितीचे काम पूर्ण केले नोव्हेंबर १९४९ मध्ये. साधारण तीन वर्षांमध्ये कामकाज पूर्ण झाले. संविधान सभेने संविधान निर्मितीसाठी अधिक वेळ घेतला, अशी टीका केली जाते. मुळात संविधान सभेच्या काळाची पार्श्वभूमी नीट लक्षात घेतली पाहिजे.

विसाव्या शतकात जगभरात लोकशाही प्रस्थापित झाली. त्याचप्रमाणे मानवी इतिहासातील सर्वाधिक हिंसा जगाने अनुभवली. विशेषतः १९३० आणि १९४० चे दशक हे कायापालट घडवणारे होते. जपानच्या लष्करशाहीने हाहाकार निर्माण केला होता. मुसोलिनीच्या नेतृत्वातील इटलीने आक्रमक हिंसक पवित्रा घेतला होता. जर्मनीमध्ये हिटलरने ज्यूंचा संहार केला होता. नाझी जर्मनीने १९४१ ते १९४५ या काळात सुमारे ६० लाख ज्यूंची हत्या करत वंशविच्छेद करण्याचा भयंकर प्रयत्न केला होता. या सूत्रबद्ध हिंसेला ‘होलोकॉस्ट’ असे संबोधले जाते. दुसरीकडे स्टॅलिनच्या नेतृत्वातील रशियामध्येही मोठ्या प्रमाणात हिंसा घडत होती. १९४५ मध्ये अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा नागासकी येथे बॉम्बहल्ले केले तेव्हा या हल्ल्यांतही प्रचंड प्रमाणावर जीवितहानी झाली होती. त्यातून दुसरे महायुद्ध थांबले खरे; पण जग अजून हा धक्का पचवत होते.

हेही वाचा >>> चतु:सूत्र : इंडिया अर्थात भारत!

ब्रिटिशही या धक्क्यातून सावरले नव्हते. त्यामुळे १९४६ ला संविधान सभेची स्थापना झाली तेव्हा अवघे जग हिंसेच्या सावटाखाली होते. महायुद्धातल्या गुन्ह्यांबाबतची ‘न्युरेनबर्ग ट्रायल’ सुरू होती. ब्रिटिशांच्या सहभागामुळे महायुद्धाची झळ भारतीयांपर्यंत पोहोचली होती. हजारो भारतीय सैनिकांना लढावे लागले होते आणि मरण पत्करावे लागले होते. या साऱ्या पटलावर संविधान सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हाच देशाच्या फाळणीची चिन्हे दिसू लागली होती.

देशाची फाळणी झाली तेव्हा लाखो लोक मारले गेले. दंगली उसळल्या. जगाच्या इतिहासातील रक्तरंजित आणि शोकात्म असा हा काळ होता. भारतासाठी ‘होलोकॉस्ट’च्या तीव्रतेची ही घटना होती. ऑगस्ट १९४७ मध्ये फाळणी झाली तर जानेवारी १९४८ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या झाली. त्यानंतर पुन्हा दंगली झाल्या आणि सामाजिक सौहार्द बिघडले. हे सारे सुरू असताना संविधान सभेचे कामकाज सुरू होते!

दुसरीकडे स्वातंत्र्य मिळत असताना देशातील केवळ १५ टक्के लोक साक्षर होते आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात होती. रोजगार तर मोठी गोष्ट, सर्वांना खायला मिळू शकेल एवढी अन्ननिर्मिती करण्याचे आव्हान देशासमोर होते. देशाचे उत्पन्न अत्यल्प होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर देशाला स्वयंपूर्ण करण्याचे आव्हान होते.

हेही वाचा >>> संविधानभान : संविधान सभेचे वैचारिक रिंगण

तिसरीकडे संस्थानांना भारतात सामील करून घ्यायचा मोठा प्रश्न होता. काही संस्थानांनी भारतात सामील होण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्याशी संवादी राहात, प्रसंगी बळाचा वापर करत त्यांना जोडून घेणे भाग होते. प्रादेशिक अस्मितांना सांभाळून घेत आणि त्याच वेळी देशाची एकात्मता टिकवत हे कठीण काम करायचे होते.

थोडक्यात, संविधानसभेच्या सभागृहाच्या खिडकीच्या बाहेर आभाळ असे काळवंडून गेले होते. सामाजिक ऐक्य, आर्थिक स्वावलंबित्व आणि राजकीय स्थैर्य अशा तीनही प्रतलांवर भीषण अवस्था असताना संविधान सभा एकत्र येऊन भारतासाठी भविष्याचे आरेखन करत होती. त्यात भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या देशासाठी संविधान निर्मिती करणे हे प्रचंड अवघड होते. त्यामुळे अशा उलथापालथीच्या काळात संविधान सभेने संविधानाची निर्मिती केली हे केवळ आश्चर्य आहे!

फ्रॅन्कफर्ट स्कूलचा विचारवंत थिओडोर अडोर्नो म्हणाला होता, ‘होलोकॉस्ट’नंतर कविता लिहिली जाऊ शकत नाही! भारतातही फाळणी आणि गांधीहत्येनंतर अशीच विदारक अवस्था होती मात्र भारताच्या संविधानसभेने सामूहिक कविता लिहिलीः भारताचे संविधान! poetshriranjan@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Constituent assembly draft for making of constitution of india zws
Show comments