गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या एका राजाने आपल्या संस्थानात नवे संविधान लागू केले.. हा प्रयोग अविश्वसनीय आणि लक्षवेधी होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या भारताच्या संविधानासाठी तेव्हा मांडले जात असलेले वेगवेगळे मसुदे लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. मात्र नव्या संविधानासाठीचे प्रयत्न केवळ पुस्तकी नव्हते. काही ठिकाणी प्रत्यक्ष संविधान लागू करण्याचे प्रयोग झाले.

ब्रिटिश काळात भारत दोन भागांत विभागला होता: ब्रिटिश भारत आणि संस्थाने. अनेक संस्थानांमध्ये राजेशाही होती. काही संस्थानांमध्ये वेगळे प्रयोग झाले. त्यापैकीच एक औंधचे. इतर संस्थानांच्या तुलनेत ते छोटे म्हणजे ७२ खेडय़ांचे होते. ही खेडी सलग नव्हती. ती सांगली, सातारा, सोलापूर आणि विजापूर जिल्ह्यात विभागलेली होती. कऱ्हाडला असलेली गादी इंग्रजांच्या ताब्यामुळे औंधला गेली.

या संस्थानाचे शेवटचे राजे होते भवानराव पंतप्रतिनिधी. ते महात्मा गांधींच्या विचारांनी भारावलेले होते. स्वयंपूर्ण खेडे आणि स्वराज्य या कल्पना प्रत्यक्षात आणल्या पाहिजेत, असे त्यांचे मत होते. लोकांची सत्ता स्थापित करायची तर आपण गांधींचा सल्ला घेतला पाहिजे असा सल्ला मॉरिस फ्रीडमन यांनी त्यांना दिला. फ्रीडमन हे भवानरावांचे पुत्र आप्पासाहेब यांचे मित्र. फ्रीडमन यांच्या सल्ल्यानुसार भवानरावांनी वध्र्यामध्ये गांधींची भेट घेतली. स्वराज्य या विचाराविषयी चर्चा झाली. त्यानुसार १९३८ साली भवानराव पंतप्रतिनिधींनी सत्तेचा त्याग केला आणि लोकांची सत्ता स्थापन करण्याची घोषणा केली. २१ जानेवारी १९३९ रोजी त्यांनी औंध संस्थानाचे नवे संविधान लागू केले.

भवानराव आधीपासूनच स्वातंत्र्य चळवळीशी जोडलेले असल्याने राजासारखे जगणे त्यांना नामंजूर होते. त्यामुळेच १९१७ पासून त्यांनी औंध संस्थानांमधील गावांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना केली होती.  औंधचे संविधान लागू झाल्यावर फ्रीडमन यांनी गावोगावी जाऊन लोकांसाठी कार्यालये स्थापन केली. स्वतंत्रतापूर येथे मुक्त तुरुंग स्थापन केला. आरोपींना मुक्त तुरुंगात राहून स्वसंयमाने स्वत:त बदल घडवून आणणे त्यांना अपेक्षित होते. या नव्या संविधानानुसार सर्व लोकांना मतदानाचा हक्क देण्यात आला मात्र साक्षर लोकांना मतदानाचा हक्क देण्यात यावा असे गांधींनी ‘हरिजन’मध्ये लिहिले. त्यामुळे भवानरावांनी औंध संस्थानातील निरक्षरता कमी करण्यासाठी २० हून अधिक शाळांची स्थापना केली. संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण समान व मोफत असेल, अशी तरतूद केली. पंचायत राज व्यवस्थेचा अनोखा प्रयोग या संस्थानात सुरू झाला. ग्रामस्वराज्य आणि सामाजिक एकता यांवर आधारलेले संविधान लागू झाले. संस्थानात निवडणुका झाल्या आणि आप्पा पंत हे नवे पंतप्रधान झाले. पुढे १९४३ मध्ये रामाप्पा बिद्री पंतप्रधान झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औंध संस्थान स्वतंत्र भारतात सामील झाले. छोटे संस्थान असले तरी त्यांनी राबवलेला प्रयोग अनोखा होता म्हणूनच पं. नेहरू हा प्रयोग पाहण्यासाठी औंध संस्थानात आले होते. शिवाय ‘चले जाव’ चळवळ आणि प्रतिसरकार स्थापना यामध्ये सक्रिय असणाऱ्या क्रांतिकाऱ्यांना या संस्थानाची मदत झाली होती.

इंदिरा रॉदरमंड यांनी ‘औंध एक्सपरिमेंट’ नावाचे पुस्तक लिहीत गांधीवादी संविधान तळागाळापासून लोकशाही स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. आप्पा पंतांनी तर ‘मुलुखावेगळा राजा’ असे पुस्तकच भवानराव पंतप्रतिनिधींविषयी लिहिले. भवानराव हे अनेक अर्थानी मुलुखावेगळे होते.  सर्वाना योगा, सूर्यनमस्कार करायला लावून शारीरिक आरोग्य तंदुरुस्त ठेवायला सांगणारे बहुआयामी भवानराव १९३५ साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते. येनकेनप्रकारेण सत्ताप्राप्तीचे प्रयत्न होतानाच्या काळात, सत्तेचा त्याग करत गांधीवादी संविधान राबवण्याचा भवानरावांचा प्रयत्न आजही अविश्वसनीय वाटावा असाच, मात्र नवा मार्ग दाखवू शकेल इतका लक्षवेधी आहे!

डॉ. श्रीरंजन आवटे 

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Constituent consciousness constitution of india divided into two parts during the british period amy
Show comments