कोणत्याही विवेकी व्यक्तीचे मनुस्मृतीला समर्थन असू शकत नाही. डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती नाकारली आणि काय स्वीकारायचे हेही सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या परंपरेत संविधानाची मुळं आहेत हे खरं असलं तरीही परंपरेत साऱ्याच बाबी प्रागतिक नाहीत. भारतीय संविधान अस्तित्वात येण्यापूर्वी आणि ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी सामाजिक व्यवहार परंपरेनुसार होत होते. या परंपरेला धर्मशास्त्राचे अधिष्ठान होते.

असाच हिंदू धर्मातील महत्त्वाचा एक ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. वसाहतवादी इंग्रजांनी तो हिंदूंचा कायदा-ग्रंथ म्हणून मान्य केला. पण ‘न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति’ अर्थात स्त्रियांना स्वातंत्र्य देताच कामा नये, असे हा ग्रंथ सांगत होता.स्त्रीने बालपणामध्ये वडिलांच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे, तरुणपणामध्ये पतीला आदर्श मानले पाहिजे आणि म्हातारपणी मुलांच्या धाकात राहिले पाहिजे. शूद्रांना गुलाम केले पाहिजे आणि त्यांची पात्रता ही गुलाम बनण्याची कशी आहे, हे या ग्रंथात सांगितले होते. त्याचे नैतिक समर्थन करण्याचा प्रयत्न केला होता. या ग्रंथातील गुन्हे आणि शिक्षा याबाबतचा आठवा अध्याय आक्षेपार्ह आहे. या अध्यायात एकाच गुन्ह्याकरता वर्णानुसार वेगवेगळय़ा शिक्षा सांगितल्याआहेत. स्त्री आणि शूद्रांच्या कानात शिसे ओतण्यासारख्या भयंकर क्रूर शिक्षांचाही उल्लेख आहे. 

कोणत्याही विवेकी आणि सुजाण व्यक्तीचे या ग्रंथाला समर्थन असू शकत नाही. स्वाभाविकच बाबासाहेबांचाही या ग्रंथाला विरोध होता. ‘रिडल्स इन हिंदूुइझम’ या ग्रंथात बाबासाहेबांनी ‘मनूज मॅडनेस’ असे एक प्रकरण लिहिले आहे. यात त्यांनी मनुस्मृतीची चिकित्सा केली आहे. बाराव्या खंडातही मनुस्मृती ही भूतकाळातील बाब नसून वर्तमानात मनुस्मृतीचे भूत कसे मानगुटीवर बसले आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.बाबासाहेब ज्यांना आपले गुरू मानत त्या महात्मा फुले यांनी एकोणिसाव्या शतकातच म्हटले होते, ‘जाळून टाकावा। मनुग्रंथ॥’ (महात्मा फुले समग्र वाङ्मय, महाराष्ट्र शासन, १९९१, पृ.५५१)  महात्मा फुले यांनी जे सांगितले ते बाबासाहेब आंबेडकरांनी कृतीत आणले. २५ डिसेंबर १९२७ रोजी महाडच्या परिषदेत त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले. 

बाबासाहेब आंबेडकर किती ग्रंथप्रेमी होते, याचे असंख्य पुरावे त्यांच्या चरित्रांमधून मिळतात. तरीही त्यांनी एक पुस्तक का जाळले असावे? वर उल्लेखल्याप्रमाणे मनुस्मृतीचा प्रतिवाद त्यांनी आधीच केलेला होता. मग पुस्तक जाळण्याची आवश्यकता होती का? आ. ह. साळुंखे यांचे ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’ हे पुस्तक वाचल्यावर मनुस्मृती दहनाची आवश्यकता अधिक तीव्रतेने पटते.बौद्धिक युक्तिवाद करूनही बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली कारण ती विषमतेची विषवल्ली रुजवणारी होती नि ती माणसाला माणूसच मानत नव्हती. अशा वेळी स्वच्छ, स्पष्ट, ठोस आणि प्रतीकात्मक संदेश देण्याकरता बाबासाहेबांनी ही कृती केली. त्यांनी केवळ मनुस्मृती नाकारली नाही तर काय स्वीकारायचे हेदेखील सांगितले.

मनुस्मृती हे विघातक संविधान जाळले आणि निळय़ा आभाळाला गवसणी घालणारे विधायक संविधान स्वीकारले. अशी दुहेरी आणि मौलिक भूमिका निभावण्याची ऐतिहासिक कामगिरी बाबासाहेबांनी पार पाडली. मनुस्मृती जाळताना बापूसाहेब सहस्रबुद्धे बाबासाहेबांसोबत होते तर संविधान निर्मितीत बाबासाहेब नेहरूंसोबत होते, हा काव्यात्म न्याय घडतो तेव्हाच शंतनू कांबळेसारख्या कवींना जातीपातीच्या बेडय़ा झुगारून देत ‘समतेचे पैंजण खणकावत येणाऱ्या’ पहाटेचे वेध लागतात.

डॉ. श्रीरंजन आवटे 

poetshriranjan@gmail. Com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Constitution dr babasheb ambedkar manusmriti is one of the most important scriptures in hinduism amy
Show comments