मानवमुक्तीसाठी समता व बंधुता महत्त्वाची मानणारे बुद्ध, संतपरंपरा यांच्या विचारांशी संविधानाची नाळ जुळलेली आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘माझ्या साऱ्या तत्त्वज्ञानाचा सारांश तीन शब्दांत आहे : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. लोक म्हणतात ही मूल्ये मी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली आहेत. लोक काहीही म्हणोत; मी मात्र ही तत्त्वे माझ्या गुरूकडून, गौतम बुद्धाकडून घेतली आहेत.’’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे सुप्रसिद्ध विधान आहे.

याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांचा फ्रेंच राज्यक्रांतीला किंवा पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातून विचार स्वीकारण्याला विरोध होता, अशातला भाग नव्हे. बाबासाहेब बुद्धाचे बोट पकडून भारतीय परंपरेसोबत असणारी नाळ घट्ट करत होते.

‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’सारखा ग्रंथ जेव्हा पं. नेहरू लिहित होते तेव्हा इथली बहुविध परंपरा समजून घेण्याचा तो एक मनोज्ञ प्रयत्न होता. भविष्याचं बांधकाम करण्याच्या दृष्टीने इतिहासाकडं पाहत असताना नेहरूंना तीन बाबी अधिक महत्त्वाच्या वाटल्या : लोकशाहीच्या अधिष्ठानावर आधारलेला समाज, सामाजिक एकोपा, एकतेच्या अखंड सांस्कृतिक सभ्यतेचा प्रवाह. या तिन्ही बाबी ऐतिहासिक परंपरेत शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

महात्मा गांधींनी तर भारतीय परंपरा पूर्णत: आत्मसात केली होती. ‘वैष्णव जन तो तेणे कहिए’पासून ते ‘रघुपति राघव राजाराम’ आवडणाऱ्या गांधींनी भारतीय परंपरेची नस पकडली होती. म्हणूनच तर त्यांच्या आश्रमात सर्व धर्माची प्रार्थना व्हायची आणि सगळय़ा धर्माची प्रार्थना म्हणत असताना गांधींनी देव, दैव, कर्मकांड या साऱ्याला फाटा दिला होता.

थोडक्यात, स्वातंत्र्य चळवळ आणि संविधान निर्मिती प्रक्रिया यामध्ये अग्रभागी असलेले लोक भारतीय परंपरेचा गंभीरपणे विचार करत होते.

भारतीय संविधान हे जरी वसाहतवादाच्या काळात तयार झालेले असले तरी त्याची पाळंमुळं भारताच्या प्राचीन परंपरेत दिसतात. समतेची मूल्ये बौद्ध परंपरेत दिसतात. बुद्धाचा भिख्खू संघ ही लोकशाही तत्त्वांनुसार चालणारी संस्था होती. गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्या मांडणीतून अिहसेचे आणि सहभावाचे महत्त्व ध्यानात येते. चार्वाकाने सांगितलेले तत्त्वज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित करते. वैदिक संहितांमध्ये समतेचे मूल्य नसले तरी ‘सभा’, ‘समिती’ यांसारख्या रचना अस्तित्वात होत्या. त्याहून महत्त्वाची म्हणजे बाराव्या शतकात बसवण्णांनी सांगितलेली ‘अनुभवमंटप’ ही रचना! अनुभवमंटप ही सार्वजनिक मंथनासाठीची जागा होती. त्या काळातील छोटीशी संसद. याचे नियम हे आपल्याला आजही अचंबित करतील असे होते. ‘सर्वजण समान आहेत’ इथपासून ते आंतरजातीय विवाह आणि आंतरजातीय भोजनास प्राधान्य दिले पाहिजे, इथवर सारे समताधिष्ठित नियम. पुढे सोळाव्या शतकात तर तुकोबा सांगतात:

‘‘ विष्णूमय जग। वैष्णवांचा धर्म।।

भेदाभेद भ्रम। अमंगळ।। ’’

भक्ती परंपरेतील मीरा रामाचे आणि कृष्णाचे महात्म्य गातानाच प्रेमाची महती सांगते आणि सुफी परंपरेतला ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती सांगतो खुदाच्या दोस्तानं पृथ्वीसारखं उदार असलं पाहिजे आणि कबीर तर बाजाराच्या मधोमध उभा राहून ‘ढाई आखर प्रेम के’ सांगत सर्वाच्या कल्याणाची मागणी करतो.

रूढार्थाने कुणी याला संविधानाची मुळं आहेत, असं मानणार नाही; पण या सगळय़ा परंपरेच्या मुशीतच आपलं सामूहिक मानस घडलं आहे. झाड उंच वाढत जातं; पण त्याची मुळं अशी खोल खोल चहूबाजूंनी पसरलेली असतात.

डॉ. श्रीरंजन आवटे 

poetshriranjan@gmail. Com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Constitution indian traditions the french revolution babasaheb ambedkardiscovery of india book amy
Show comments