‘हे विश्वचि माझे घर’ असे ज्ञानदेव सांगत होते, तेव्हा आफ्रिकेतील एक राजा मौखिक संविधानातून वैश्विक मानवतेला साद घालत होता..
‘‘आम्ही हे जाहीर करतो की, प्रत्येकाचं जीवन हे समान दर्जाचं आहे. कोणी मोठा नाही किंवा कोणी लहान नाही. प्रत्येकाला जगण्याचा समान अधिकार आहे.’’
‘‘आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. पूर्वजांचा आदर राखला पाहिजे. कुटुंबीयांची काळजी घेतली पाहिजे.’’
‘‘कोणाचाही विश्वासघात करता कामा नये. तुम्ही दिलेलं वचन पूर्ण केलं पाहिजे.’’
‘‘विद्वानांचा, स्त्रियांचा आणि मातांचा आदर केला पाहिजे.’’
‘‘गुलामीची प्रथा चुकीची आहे. कोणालाही मनुष्यमात्राहून कमी दर्जाची वागणूक देणे गैर आहे. आता इथून पुढे कोणीही कोणाला गुलाम म्हणून विकणार नाही.’’
‘‘अहंकाराने वागणे हे दुबळयाचे लक्षण आहे, नम्रतेने वागणे हेच शूरतेचे लक्षण आहे.’’
हेही वाचा >>> संविधानभान: देशाचा स्वप्ननकाशा
असे एक-दोन नव्हे तर तब्बल ४४ नियम, आदेश घालून दिले गेले होते सुमारे ८०० वर्षांपूर्वी. पश्चिम आफ्रिकेतल्या आजच्या माली देशातील मांदेन साम्राज्याच्या घोषणापत्रातील हा मजकूर. इसवी सन १२३५ मध्ये मांदेन साम्राज्याचा राजा सुनंदैता कैटा याने क्रिना येथील युद्ध जिंकल्यानंतर हे घोषणापत्र जाहीर केले.
या घोषणापत्रात काही नियम, आदेश आहेत तर काही ठिकाणी नैतिक वर्तनाचा सल्ला आहे. सुनंदैता कैटा हा राजा कवी होता. त्याने लिहिलेलं काव्य ‘सुनंदैताचे महाकाव्य’ म्हणून सुप्रसिद्ध आहे.
आफ्रिकेतल्या आदिवासी भागात सुरुवातीला मौखिक परंपरेतून तयार झालेलं हे संविधान! दरवर्षी या भागातील कुरुकन फुगा येथे आदिवासी आणि स्थानिक जमत, हे घोषणापत्र आपल्याला मंजूर आहे आणि यानुसार वागलं पाहिजे, याची आठवण करून देतात.
वर्षांनुवर्षे सुरू असलेल्या या मौखिक परंपरेकडे १९६० च्या दशकापासून अभ्यासकांचे लक्ष गेले. १९९८ मध्ये या मौखिक परंपरेतून आलेल्या घोषणापत्राचा त्यांच्या बोलीभाषेतून इंग्रजी, फ्रेंच आणि इतर भाषांमध्ये अनुवाद झाला. २००९ साली संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) या घोषणापत्राला अमूर्त वारसा म्हणून मान्यता दिली. युनेस्कोने या मांदेनच्या जाहीरनाम्याला ‘मानवतेचा सांस्कृतिक दस्तावेज’ म्हटले आहे.
जगातले पहिले संविधान कोणते, याविषयी बराच वाद आहे. १२१५ सालच्या इंग्लंडच्या ‘मॅग्ना कार्टा’ पासून ते अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यापर्यंत अनेक संविधानं ही सर्वात जुनी आहेत, पहिली आहेत, असे दावे-प्रतिदावे आहेत; मात्र आफ्रिकेतल्या आदिवासींच्या संविधानाचं व्यवच्छेदक वैशिष्टय असं, की ते मौखिक परंपरेतून जतन झालं आहे.
या मांदेनच्या जाहीरनाम्यात परस्परांविषयीचा आदरभाव आहे, मैत्र आहे. मुख्य म्हणजे माणसाला माणूस म्हणून वागणूक दिली पाहिजे, असे मूलभूत विधान यात केले आहे. हा जगण्याचा मानवी हक्क या संविधानाने मान्य केला.
साधारण तेराव्या शतकातच ज्ञानदेव जेव्हा ‘हे विश्वचि माझे घर’ असे सांगत होते, तेव्हा कुणी सुनंदैता कैटा नावाचा राजा अशा संविधानातून वैश्विक मानवतेला साद घालत होता. जशी तुकारामाची गाथा इंद्रायणीत अनेकदा बुडवूनही तरली, अगदी तसेच मांदेनचे घोषणापत्रही हुकूमशाहीच्या, अधिकारशाहीच्या विखारी हवेत विरून गेले नाही. ते टिकले, तगले. एक मेक्सिकन म्हण आहे: त्यांनी आम्हाला पुरण्याचा, गाडून टाकण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना ठाऊक नव्हते की आम्ही बिया आहोत!
poetshriranjan@gmail.com