एकत्र राहणाऱ्या लोकांसाठी समान नियम असणे अपरिहार्य, अन्यथा अनागोंदी निर्माण होऊ शकते. ही शक्यता टाळणे, हेच संविधानाचे उद्दिष्ट..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संविधानाने नियतीच्या कराराला अर्थ दिला हे अगदीच खरे; मात्र मुळात संविधान हवे कशाला आणि संविधान आहे काय? हे अगदीच प्राथमिक आणि मूलभूत प्रश्न आहेत.

आपल्याकडे क्रिकेट हा अतिशय लोकप्रिय खेळ आहे. अगदी मैदान उपलब्ध नसले तरी गल्लीमध्येही या ना त्या प्रकारे क्रिकेट खेळले जाते. अशा वेळी खूप वेगवेगळे, गमतीदार नियम केले जातात. उदाहरणार्थ, ‘एक टप्पा आऊट’ किंवा शेजारच्या घराला बॉल लागला तर चौकार, असे अगदी आपण आपल्या सोयीचे नियम करतो आणि मस्त खेळतो. हे नियम केले नाहीत तर काय होईल ?

सगळय़ांना आनंदाने खेळता येणार नाही. भांडणं होणार. कुणाला बॅटिंग मिळणार नाही तर कुणाला बॉलिंग. सगळय़ांना खेळताना आनंद घेता यावा म्हणून आपण काही नियम ठरवतो जेणेकरून खेळात सूत्रबद्धता राहील. नियमन करता येईल.

जी गोष्ट खेळाबाबत आहे, तीच समाजाबाबत आहे. कोटय़वधी लोक एकत्र राहतात तेव्हा काही नियम, अटी ठरवून देण्याची आवश्यकता असते. असे नियम केले नाहीत तर अनागोंदी निर्माण होऊ शकते. गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे समाजामध्ये सूत्रबद्धता राहावी, नीट नियमन करता यावे आणि सर्वानाच गुण्यागोविंदाने राहता यावे, यासाठी संविधानाची आवश्यकता असते आणि आहे.

संविधान हा शब्दच मुळी तयार झाला आहे दोन पदांपासून. सम्+विधान = संविधान. सम म्हणजे सम्यक, संतुलित, निर्दोष. विधानमधील धा हा धातू आहे तर वि हा उपसर्ग. एखाद्या गोष्टीची मांडणी करणे, नियम, कायदा अशा अर्थाने विधान शब्द आला आहे.

सम्यक हा शब्द बौद्ध तत्त्वज्ञानात अनेकदा वापरला जातो. सम्यकचा सोपा अर्थ ‘मधला मार्ग’ असे सांगितले जाते. मधला मार्ग म्हणजे तडजोड किंवा समन्वय अशा अर्थाने नव्हे. सम्यक म्हणजे संतुलित, योग्य. त्यामुळे सर्वासाठी न्याय्य असे नियम आणि कायदे असणारा दस्तावेज, असा अर्थ येथे अभिप्रेत आहे.

थोडक्यात, जिथं सर्वासाठी समान, संतुलित विधान केलं जाईल, असं मैदान संविधानाने तयार केलं आहे. असे हे संविधान नियमांचे आणि कायद्याचे पुस्तक आहे. संविधान सम्यक दस्तावेज आहे. या सम्यक दस्तावेजाने सर्वाना समान वागणूक मिळेल, अशी समतेची भूमी तयार केली आहे.

डॉ. श्रीरंजन आवटे 

poetshriranjan@gmail. Com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Constitution proper documentation initial meetings of the constituent assembly amy
Show comments