‘’ Death is nothing to us. When we exist, death is not; and when death exists, we are not. All sensation and consciousness ends with death and therefore in death there is neither pleasure nor pain.’’— Epicurus
भौतिकवादाची कोनशिला समजला जाणारा प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता एपिक्युरस म्हणतो की प्राप्त क्षणात अनंताचं सुख असतं. मिशेल फुकोच्या भाषेत सांगायचं झालं तर एपिक्युरसने या विधानात वर्तमानाचं सत्ताशास्त्र (ontology of the present) अभिव्यक्त केलं आहे. याचा अर्थ वर्तमानकाळ सत्-तत्त्व आहे. पण अनावश्यक इच्छांचा पाठलाग आणि मृत्यूचं भय माणसाला वर्तमानाच्या या सत्-वास्तवाचं (reality) आकलन होऊ देत नाही. अतृप्त आणि भयभीत मनोवस्थेमुळे माणूस प्राप्त क्षणात राहण्यास असमर्थ ठरतो. प्राप्त क्षण ‘पास्कालची भयावह खोली’ ठरते; जिच्याबाहेर पडण्यासाठी तो सतत निरर्थक मनोरंजनाच्या शोधात असतो. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर दोन मिनिटं स्वत:च्या सानिध्यात राहण्याऐवजी तासनतास निरर्थकपणे मोबाईलचा स्क्रीन स्क्रोल करत बसतो.
भयमुक्त होऊन प्राप्त क्षणाचा आनंद कसा घ्यावा हा मूलभूत विचार एपिक्युरसच्या सुखवादी तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. त्याचं सुखवादी नीतिशास्त्र आजच्या भांडवलवादी भोगवादाचं द्याोतक नसून त्याला छेद देणारं आहे. आजचा बाजारू भोगवाद प्राप्त क्षणापासून पळ काढायला मदत करतो- तर एपिक्युरसचा सुखवाद प्राप्त क्षणात ( carpe diem) अनंताचं सुख शोधायला सहाय्यभूत ठरतो. एपिक्युरसच्या सुखवादाचा आंतरिक संबंध त्याच्या भौतिकवादाशी, अनुभववादाशी, निसर्गवादाशी आणि ईहवादाशी आहे. मात्र मागील लेखांकात नमूद केल्याप्रमाणे विरोधी छावणीकडून एपिक्युरसच्या तत्त्वज्ञानाचा विपर्यास फक्त ‘खा, प्या, मजा करा’ अशा उथळ भोगवादात केला गेला.
आधुनिकपूर्व काळात चिद्वाद विरूद्ध भौतिकवाद या ऐतिहासिक द्वंद्वात धार्मिक चिद्वादाची सरशी होऊन जवळपास हजार वर्षे धार्मिक चिद्वादाचं एकछत्री अधिपत्य होतं. ख्रिास्ती धर्मसत्तेनं ‘डुकरांचं तत्त्वज्ञान’ म्हणून एपिक्युरसच्या तत्त्वज्ञानाला त्याज्य ठरवलं. मध्ययुगात साहित्य, कला, तत्त्वज्ञान ही क्षेत्रं स्वायत्त नसून कॅथोलिक चर्चची मांडलिक होती. त्यांचा वापर ख्रिास्ती धर्माच्या चौकटीचा प्रचार, प्रसार आणि दृढीकरण करण्यासाठी झाला आहे. उदा.- १४ व्या शतकातल्या इटालियन भाषेचा जनक दान्ते या देवभीरू शब्दप्रभूने आपली लेखणी कॅथोलिक चर्चसाठी झिजवली. त्याच्या ‘डिव्हाइन कॅामेडी’मध्ये एपिक्युरसचे अनुयायी नरकात दाखवले आहेत. मध्ययुगात एपिक्युरसच्या तत्त्वज्ञानाची इतकी हिणकस प्रतिमा निर्माण झाली होती की आधुनिकतेच्या सुरुवातीला इरास्मुस, फ्रॅान्स्वा राब्ले, मिशेल द मोंत्येन्य आणि पिएर गॅसन्डी यांसारख्या मानवतावादी विचारवंतांनी एपिक्युरियन तत्त्वज्ञानाच्या ठराविक पैलूंचं पुनरुज्जीवन करण्याचं धाडस केलं.
जर्मन विचारविश्वात तर १९व्या शतकापर्यंत विद्यापीठीय क्षेत्रात एपिक्युरसच्या भौतिकवादाला प्रतिष्ठा नव्हती. उदा.- कार्ल मार्क्सने त्याची पीएचडी डिमॉक्रिटस आणि एपिक्युरसच्या तौलनिक भौतिकवादावर केली. एपिक्युरसला ‘क्रांतिकारक तत्त्वज्ञानाचा आद्या प्रवर्तक’ मानल्यामुळे मार्क्सला विद्यापीठीय करिअरवर पाणी सोडावं लागलं.
सोबतच, याआधी नमूद केल्याप्रमाणे भौतिकवादी परंपरेचं साहित्य मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात आलं आहे. एपिक्युरसनं जवळपास तीनशे पुस्तकं लिहिली होती. प्राचीन काळी तत्त्वज्ञानाचा प्रवर्तक आणि अनुयायांच्या एकत्रित कामाला प्रवर्तकाच्या नावाने ओळख मिळत असे. मात्र एपिक्युरसचं जवळपास सगळं लिखाण नष्ट झालेलं आहे. त्याची फक्त तीन पत्रं शिल्लक आहेत. लुक्रेशिअस नावाच्या त्याच्या लॅटिन भाषिक शिष्याची दीर्घ कविता एपिक्युरियन तत्वज्ञानावरचा महत्त्वाचा दस्तावेज समजला जातो. एपिक्युरसचा उल्लेख त्याच्या विरोधकांच्या मांडणीत सोयीनं पूर्वपक्ष म्हणून केलेला आढळतो. जिथं प्लेटोचं जवळपास दोन हजार पानांचं लिखाण जतन केलं जातं ; तिथं एपिक्युरसच्या ३०० पुस्तकांपैकी तीनच पत्रं उरतात!
एपिक्युरसचा भौतिकवादी सुखवाद
भौतिकवाद म्हणजे भौतिक तत्त्वाला आधारभूत आणि सत्-तत्त्व मानणारा तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोन असल्यामुळे चेतना, जाणीव, विचार, भावना, कल्पना इत्यादी गोष्टींचं अस्तित्व ‘स्वतंत्र/ स्वयंभू’ नसून ‘आधारित’ आहे, असं स्वीकारलं जातं. अर्थात भौतिकवादांतर्गत अनेक छटा आहेत. डिमॉक्रिटसचा भौतिकवाद पूर्णत: कार्यकारणभावानं संचलित आहे. त्यामुळे त्यात मानवी स्वातंत्र्य शक्य नाही. स्वातंत्र्य म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या एकाच वेळी दोन वा अनेक शक्यता असणं. त्यामुळे चॉइस असतो. उलट, कार्यकारणभाव म्हणजे नो चॉइस! मात्र एपिक्युरसच्या तत्त्वज्ञानातलं अनिश्चिततेचं तत्त्व (principle of contingency) भौतिकवादासह मानवी स्वातंत्र्यालासुद्धा वाचवतं.
त्यामुळे कार्ल मार्क्सला एपिक्युरसचा भौतिकवाद महत्त्वाचा वाटतो. कारण मार्क्सनुसार, भौतिकतेचा आधार नसलेली चिद्वादी परंपरेतली क्रांतींची भाषा पोकळ,भ्रामक ठरते; तर मेकॅनिस्टिक म्हणजे यांत्रिक भौतिकवादात क्रांती अर्थात मानवी हस्तक्षेप शक्य नसतो. मार्क्सवाद म्हणजे क्रांतीची शक्यता मानणारा भौतिकवाद! त्यामुळे मार्क्सला एपिक्युरसमध्ये त्याच्या गतिशील ऐतिहासिक भौतिकवादाचा पूर्वसुरी दिसतो.
खरंतर, या स्वातंत्र्यतत्त्वाखेरीज एपिक्युरसच्या भौतिकवादात कुठल्याही प्रकारची वजाबाकी (Eliminism) दिसत नाही. एपिक्युरस ईश्वर, आत्मा, आध्यात्मिकता आणि ‘इतर-जगा’चं (heterotopia) सहअस्तित्व मान्य करतो. पण हे सगळं भौतिकतेतून उत्क्रांत होऊन भौतिकतेतच विलीन होत असतं. एपिक्युरसप्रणित असंख्य जगाच्या सहअस्तित्वाचा पुरस्कार म्हणजे प्लेटोच्या अतिकेंद्रित विषमतावादी राज्यसंस्थेच्या तसंच ऑगस्टिनच्या पारलौकिकवादी जुलूमशाहीला नकार ठरतो.
एपिक्युरसच्या सुखवादी नीतिशास्त्राविषयी सांगायचं झालं तर त्याचा सुखवाद त्याच्या भौतिकवादी आणि अनुभववादी तर्कशास्त्राचं नैसर्गिक अपत्य आहे. भौतिक जग इतर सगळ्या गोष्टींचं आधारभूत तत्त्व असल्यानं भौतिक जगाचा आणि त्यातील स्थित शरीराचा द्वेष एपिक्युरसच्या दृष्टीनं आत्मवंचना ठरते. त्यामुळे शरीर एकाचवेळी साधन आणि साध्य ठरतं. मन, बुद्धी, चित, वेदना, सुख इत्यादी गोष्टींना शरीरेतर स्वतंत्र अस्तित्व नसून त्या शरीराच्या कृती आहेत. शरीरासोबत या शरीराधारित कृतींचासुद्धा शेवट होत असतो.
एपिक्युरसनुसार वेदना टाळणं आणि सुखाचा शोध घेणं हा मानवी स्वभाव आहे. त्यादृष्टीनं तो जेरेमी बेंथम या आधुनिक सुखवादी विचारवंताचा पूर्वसुरी ठरतो. मात्र एपिक्युरसचा सुखवाद हा भांडवलवादी भोगवादाशी संबंधित नसून त्याला छेद देणारा आहे. एपिक्युरसचा सुखवाद समजून घेण्यासाठी त्यानं केलेलं मानवी इच्छांचं वर्गीकरण लक्षात घेतलं पाहिजे. एपिक्युरसनुसार इच्छा तीन प्रकारच्या असतात. (अ) नैसर्गिक आणि आवश्यक, (ब) नैसर्गिक आणि अनावश्यक, (क) अनैसर्गिक आणि अनावश्यक.
नैसर्गिक आणि आवश्यक इच्छांच्या पूर्तीतच खरं सुख आहे असं एपिक्युरस मानतो. तहान लागलेल्या माणसाला पाणी अमृततुल्य वाटतं. श्रमानंतर केलेला आराम सुखदायी ठरतो. थोडक्यात, काम्यू म्हणतो तसं खरं सुख सगळ्यांना परवडणारं असतं. मात्र बेगडी, दिखाऊ आणि तुलनात्मक सुख महाग क्रयवस्तू बनते. एपिक्युरस म्हणतो की अतिरेकी संपत्तीसंचय, सत्ता, बेगडी नावलौकिक सारख्या अनैसर्गिक आणि अनावश्यक इच्छांचा पाठलाग सुखदायी नसून खऱ्या सुखाचा शत्रूच ठरतो. तत्कालीन नागरी जीवन आणि आजचा भांडवलवादी सुखवाद तिसऱ्या वर्गातील इच्छांवर आधारित आहे! एपिक्युरस निरर्थक गरजांनी ग्रस्त नागरी जीवनाचा त्याग करून निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गाशी एकरूप होऊन जगायला सांगतो. त्यामुळे निसर्गवादाच्या बाबतीत तो रूसोचा पूर्वसुरी ठरतो. एपिक्युरसचा भौतिकवाद जीवनद्वेष्टा आणि शरीराचं दमन करणारा नसून ऐहिक जीवनावरील प्रेमाचा पुरस्कार करतो. त्यामुळे इरास्मुस, राब्ले, नित्शे, फुको सारख्या ‘लाफिंग फिलॉसफर्स’चा तो पूर्वज समजला जातो.
एपिक्युरसनं मृत्यूविषयी विस्तृत विवेचन केलं आहे. त्याच्या तर्कशास्त्रानुसार मृत्यू निरुपद्रवी आहे. मृत्यू म्हणजे शरीरासोबतच मन, बुद्धी, आत्मा, चेतना, जाणीव, भावना इत्यादी कृतींचा शेवट. चिद्वादी परंपरा मृत्यूनंतर शिल्लक राहणाऱ्या आत्म्याला शरीराचे गुणधर्म चिकटवते. शरीर तर भौतिकतेच्या ‘शून्या’त विलीन होतं. त्यासोबतच शरीराच्या वेदना, संवेदना, सुख दु:खं नष्ट होतात. मग शरीराचे गुण आत्म्याला जोडून परत शरीरसंबंधित भीतीच्या/प्रलोभनाच्या राजकारणाची आवश्यकता नाही, असं एपिक्युरस मानतो. अशा प्रकारे मृत्यूच्या भीतीला अनाठायी ठरवून त्याभोवती निर्माण झालेल्या अंधश्रद्धांसाठी तो कर्दनकाळ ठरतो. खरंतर, सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या चिद्वादापेक्षा समाजाच्या परिघावर उदयाला येणाऱ्या भौतिकवादी परंपरेला नेहमीच धर्मसंस्थांचा कडवा विरोध राहिला आहे. कारण ‘आहे रे’ वर्गाच्या धर्मश्रद्धा आणि ‘नाही रे’ वर्गाच्या धर्मश्रद्धा समान नसतात. ‘नाही रे’ वर्गाच्या धर्मश्रद्धा त्यांना देशोधडीला लावणाऱ्या ठरतात.
थोडक्यात, एपिक्युरसनं राज्यसंस्थेला नकार देऊन मैत्रीभाव आणि सहकारी तत्त्वावर प्रतिपादित केलेलं निसर्गवादी सामूहिक जीवन प्रिमिटिव्ह कम्युनिझमचा प्रकार ठरतो. पण राज्यसंस्थेची ऐतिहासिक अपरिहार्यता आणि इतिहासाच्या शेवटी मार्क्सने कल्पिलेलं राज्यसंस्थेचं विघटन यांत फरक आहे. एपिक्युरसनं राज्यसंस्थेविषयी घेतलेल्या उदासीन भूमिकेमुळे प्लूटार्क आणि सिसेरो सारखे विचारवंत एपिक्युरसच्या अनुयायांना अराजकीय आणि परजीवी समजतात. उच्चभ्रू आणि आर्थिक सुबत्ता असलेले राज्यसंस्थेला चकवा देऊन अराजकीय रीतीने एपिक्युरियन जीवन जगू शकतात. पण गरिबांकडे राज्यसंस्थेला चकवा देण्याची शक्यता/ क्षमता नसते, म्हणून त्याचं अराजकीयत्व त्यांच्या मुक्तीचं साधन ठरत नाही. त्यामुळे समाजाच्या परिघावर उदयाला आलेल्या एपिक्युरसच्या सुखवादी तत्त्वज्ञानाचं सुप्त आकर्षण उच्चभ्रू समाजात नेहमीच राहिलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एपिक्युरसचा निखळ भौतिकवाद आणि मृत्यूविषयीचं विवेचन बौद्धिक आणि कलात्मक क्षेत्रातील एलीट लोकांच्या पचनी पडणारं तत्त्वज्ञान ठरलं आहे. एकूणच एपिक्युरसचा विचार पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात एकाच वेळी निषिद्ध मानलं गेलेलं पण तीव्र आकर्षण निर्माण करणारं फळ आहे