असंख्य वानसांपैकी अगदी नगण्य म्हणाव्यात एवढय़ा प्रकारांचा मानवाला अन्न म्हणून उपयोग होतो. अशा मोजक्या वानसांना पाळीवपण देणे हे मानवाच्या तगण्याचे मोठे इंगित आहे. त्यालाच कृषिसंस्कृती म्हणतात!

प्रदीप रावत

Fossilized dinosaur dung revealing Jurassic era secrets
Fossilized Dinosaur Dung: डायनासोरची विष्टा आणि उलटी सांगतेय त्याच्या अस्तित्त्वाची कथा; नवीन संशोधनाने ज्युरासिक कालखंडाचे कोणते रहस्य उलगडले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
In Khambhadi Koturli village Bhandara district sighting of tiger in broad daylight has created excitement among the villagers
भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…
Citizens of Gondia and state experienced thrill of tigers in Navegaon Nagjira forest
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीच्या छाव्यांचा खेळ
attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
Dinosaur, India Dinosaur, Dinosaur Extinction,
भारतातील डायनासोर नामशेष का झाले? समोर आलं महत्त्वाचं संशोधन…

वानसे (म्हणजे वनस्पती) ही प्राणीसृष्टी इतकीच प्राचीन आणि वैविध्याने गजबजलेली सृष्टी आहे. ज्यांना आपण पाहिलेदेखील नाही अशी असंख्य वानसे आहेत. फक्त जमिनीवर नव्हे तर सर्वप्रकारच्या पाण्याखालील सुद्धा! प्राचीन काळी प्राणी कसे होते कसे तगले किंवा नष्ट झाले याची नोंदवही बरीच समृद्ध आहे. तुलनेने वानस सृष्टीची नोंद फार तोकडी आहे. अपघातवशाने जे अश्मीभूत झाले असे काही वानस प्रकार आणि अवयव मिळतात. तेही प्राणी सृष्टीच्या तुलनेने तुरळकच. वानस साम्राज्यात अनेक विभाग आणि वर्ग आहेत. त्यातला सपुष्पवर्ग माणसाच्या उत्क्रांतीमध्ये मोठा महत्त्वाचा आहे. एकूण वानसांची संख्या फार मोठी आहे. त्यातल्या अगदी नगण्य म्हणाव्यात एवढय़ा प्रकारांचा मनुष्यप्राण्याला अन्न म्हणून उपयोग आहे. अशा मोजक्या अन्नदायी वानसांना पाळीवपण देणे हे मनुष्यप्राण्याच्या तगण्याचे एक मोठे इंगित आहे. त्यालाच कृषिसंस्कृती म्हणतात!

बहुसंख्य वनस्पती निश्चल असतात. झाडांना पादप म्हणतात. पण ते मूळ-खोड रूपी पाद निव्वळ दिखाव्याचे. त्या पायांना अंथरूण (खडक माती पाणी इ.) पाहून खोलवर आणि अवतीभवती पसरण्याची कुवत आहे, पण चालता मात्र येत नाही. हा निश्चलतेचा शाप किंवा वसा असलेली झाडे-झुडपे त्यामुळे एका वैशिष्टय़ाने ओळखली जातात. त्यांना स्वयंवृद्धी स्वयंआहारी जीव म्हणतात. क्लोरोफिल नावाच्या या हरितरंगी रेणूंमुळे उभ्याउभ्या पडल्यापडल्या स्वत:च्या गरजेचे अन्न तयार करण्याची क्लृप्ती वानसांकडे जात्याच असते. आपल्या वाढीसाठी लागणारे बरेचसे अन्न वानसे स्वत:च तयार करतात. जगण्याची आणि अन्न तयार करण्याची काही सामुग्री उदा. पाणी, काही खनिजे, काही रोगप्रतिकाराला उपयुक्त जीवाणू यांचा साठा खूपसा मातीतून मिळतो. हवेतून प्राणवायू आणि कर्बवायू मिळतो. या भोवतालच्या आसमंतातून मिळणाऱ्या द्रव्यांतून एक प्रकारची साखर वानसे स्वत:च तयार करतात. प्राणी आणि वानससृष्टी यांच्यामध्ये परस्पर अवलंबन आहे. तेदेखील वैर आणि सहयोगाच्या छटांनी मढलेले आहे. काही कीटक, प्राणी, पक्षी वनस्पतींच्या आश्रयाने विशेष फोफावतात. परस्पर तगण्याला मदत करतात. एरवी एका जागी ठाकलेल्या वनस्पतींचा प्रसार होतो तो वारा, पाणी, पक्षी आणि माणसांसह प्राण्यांमार्फत. हेच त्यांच्या परागीभवनाचे, फलनाचे आणि संभाव्य संकराचे मार्ग आहेत.

पण पुढच्या पिढीची पैदास करणारा एक प्रबळ प्रकार म्हणजे बीज! यातली अनेक बीजे आपले अन्न असते तर अनेक बीजांकडे आपण तुच्छतेने दुर्लक्ष करून ती फेकून देखील देतो. उदा. अनेक फळांच्या बिया. बीज हे पुनरुत्पादनाचे मूळ गुरुकिल्ली रूप आहे. अवघे वानस त्याच्या अंकुरण्यामधून उभे ठाकते. या अंकुरण्यामध्ये एक विशेष आहे. अंकुरण्यातून वानसाचे विविध अवयव उपजतात (उदा. मूळ, खोड, फुटणारे, वाढणारे शेंडे, पाने इ.). त्या प्रत्येकाची पेशीरचना निराळी आणि कामकाजाला अनुरूप असते.

अनेक वानसांमध्ये एका बीजापोटी अनेक बीजे पैदासण्याचा गुणाकारी झपाटा असतो. ही खासियत हेरून मनुष्यप्राण्याने वानसांना पाळीवपणाचा लळा लावला. अधिक हुकुमीपणे अधिक खाण्याजोगती बिया देणारी गवते बुद्धय़ा जोपासली. त्यांच्याशी वाढीसाठी स्पर्धा करणारी अन्य वानसे ऊर्फ तण काढून टाकण्याचे शहाणपण अंगीकारले. अनेक शिंबी ऊर्फ शेंगवर्गीय वानसे आहेत. त्यातली माणसाने खावीत अशी फार मोजकी आहेत. एके काळी त्यांच्यापैकी काहींच्या शेंगांमध्ये अनाहूत जनुकी बदल झाले. बऱ्याच वानसांच्या शेंगा वाळून तडकतात आणि उकलून आतल्या बिया उधळल्या जातात. काही लगत जमिनीतल्या मातीत पडतात. काही अन्य बियांसारख्या पक्षांची विष्ठा, वारा, पाणी यांच्या सोबत अन्यत्र जाऊन पडतात. त्यातल्या काही रुजतात काही रुजत नाहीत. काही कुजतात. अशी ही पुनरुत्पादनातील निवडीची चाळणी आणि ठिकठिकाणाचा प्रसार वानसांमध्ये हजारो वर्षे सुरू आहे. अनाहूत जनुकी बदलांमुळे काही शेंगांची पेटी उघडेनाशी झाली. उधळलेल्या बिया वेचण्याचे माणसाचे कष्ट एकदम कमी झाले. त्याऐवजी न उकललेल्या शेंगा फोडण्याचा सोपा प्रकार लाभला. माणसाने या कमी कष्टाच्या सहजी आणि लवकर न उकलणाऱ्या शिंबी वानसांची निवड आणखी जोपासली. गवतांमध्ये देखील ज्यांचे वरचे कवच आणि तूस पातळ ज्यांच्या बियांचे नुसते दगडावर झोडपून आतले दाणे मिळतात अशी दाणेदार खाद्ये जोपासली. ही वानसक्रमांत घडलेली मोठी पाळीव क्रांती. काही वेळा तर अनाहूत जनुकी बदल आणि संकरांनी आणखी झेप बळावली.

रंगसूत्रांमध्ये जनुकांच्या वळकटय़ा आणि गुंडे ठासून बांधलेले असतात. मातेकडून आणि पित्याकडून येणाऱ्या प्रत्येक रंगसूत्राच्या पूर्ण दोन जोडय़ा असतील तर त्याला द्विपुटी म्हणतात इंग्रजीत डायप्लॉईडी म्हणतात. तीन असल्यास त्रिपुटी इंग्रजीत ट्रायप्लॉईडी म्हणतात. अनेक असल्यास बहुपुटी- पॉलि प्लॉईडी म्हणतात. गहू या धान्याचा रानटी पूर्वज ‘ट्रिटिकुम मोनो को क्कुम क्योटिकुम’. हा द्विपुटी होता. त्याचे वानसशास्त्रीय नाव ‘वाईल्ड आईनकॉर्न’. त्याच्या दाण्यांवर चिवट फोलपट असायचे. ज्याची माणसाने निवड केली, त्यात हा फोलपटाचा चिवटपणा थोडा ओसरला होता. या प्रकाराला पैदासी आईनकॉर्न म्हणतात. गव्हाचा आणखी एक वन्य प्रकार होता. त्याचे नाव ‘ट्रिटिकुम युराटु’. या वन्य प्रकाराचा ‘ऐजीलॉपस् स्पेल्टॉईड’ या गवताशी निसर्गत: संकर झाला. त्यातून गव्हाचे चौपुटी प्रकार उपजले. त्यांना ‘ट्रिटिकुम टर्गीडुम’ म्हणतात. ते चार प्रकार म्हणजे फोलपटी ‘एम्मर डय़ुरम’, ‘खोरासान’, पोलिश आणि पर्शिअन. या ‘ट्रिटिकुम टर्गडुम’चा ‘ऐजिलॉप्स टौशी’ या गवताशी संकर झाला. यातून तीन प्रकार उपजले एकाचे नाव ‘ट्रिटिकुम आएस्टिव्हुम आएस्टिव्हुम’ हा प्रकार म्हणजे आता सर्वाधिक प्रचलित असलेला पावासाठी सर्वात योग्य समजला जाणारा गव्हाचा पूर्वज अवतरला. आता या प्रकाराला ब्रेडचा गहू असेच संबोधले जाते. पण त्याचेही अनेकविध प्रकार आहेत. निरनिराळय़ा भूभागांच्या मातीतली पोषक द्रव्ये, तेथील कमी अधिक थंड वा उष्ण हवामान, फुलांवर येण्याचा काळ, जोम वाढीची धाटणी आणि दर रोपामागचे फुटवे अशा अनेकविध पैलूंमुळे त्यांचे सुमारे ३० हजार प्रकार आहेत.

 उत्क्रांतीच्या ओघात साकारलेल्या या अनेक प्रकारांचे खाण्याच्या दृष्टीने दोन मोठे ढोबळ गट पडतात. ज्यांच्यात अन्य प्रथिने पोषणद्रव्ये तेवढीच आणि ग्लुटेन नामक प्रथीन तितपतच शिरजोर! एकास एक म्हणावी इतकी तुल्यबळ. दुसऱ्या प्रकारात ग्लुटेनचे प्रमाण सुमारे दुप्पट! ब्रेडवर्गी गव्हात ग्लुटेनचे प्रमाण मोठे असते. त्याचे पीठ पाण्यात भिजविले की लांबलांब ताणता येईल असा लवचीक रबरासारखा गुण येतो. चिनी भाषेत ग्लुटेनला पिठाचा स्नायू मणतात. ग्लुटेनमुळे

वायू भरलेले पीठ मिळते. भाजक्या ब्रेड, केकची फुगवण त्यामुळे तर शक्य होते! त्याचे शेवया, नूडल्स अनेक आकारांचे पदार्थ घडविता येतात. बल्लवांमध्ये हा प्रकार लोकप्रिय झाला यात नवल नाही! पण याच ग्लुटेनची अनेकांच्या शरीराला घृणा असते. अगदी विषबाधेसारखी! त्यामुळे आता दुसऱ्या कमी ग्लुटेन असलेल्या गव्हाचे भाग्य

पुन्हा उजळू लागले आहे!  गव्हाचे उदाहरण अशाकरिता दिले की एकेकाळी अन्य गवतांसारख्याच असणाऱ्या गवताचे पाळीव निवडीपोटी किती प्रस्थ माजले हे सहजी लक्षात यावे! हेच इतर अन्य खाद्य गवतांबद्दल. म्हणजे तांदूळ, ज्वारी, नाचणी, बाजरी, कांग अशा अठरापगड धान्यांची कथा हीच आहे. मूळ रानटी अवस्थेतील वानसांना अन्य प्राण्यांकरवी विशेषत: मनुष्यप्राण्याकरवी पाळीवपणाचे छत्र लाभले तर त्या वानसांची लोकसंख्या कशी किती बळावते त्यात नैसर्गिक निवडीच्या जोडीने पाळीव हस्तक्षेपाने होणारी निवड कशी फोफावते हाच गेल्या आठ-दहा हजार वर्षांतील शेती नामक इतिहास आहे. वानसांच्या उत्क्रांती गाथेत या आख्यानाची सावली फार लांबलचक पडलेली आहे. त्यांचा प्रवास कसा घडला हे बघायचे तर त्या वानसांचा मूळ रानटी पूर्वज धुंडाळावा लागतो. विशेष म्हणजे अशा आता दुर्मीळ झालेल्या वानसांचे पूर्वज त्यांचे नवे रूप शोधायला आणि घडवायला पुनश्च कामी येतातच! त्या शोधाची गाथा पुढच्या वेळी!

Story img Loader