माणसाच्या आदिम अवस्थेतले त्याच्या हातामधले दगड हे शस्त्र बदलत जाऊन आता जणू काही मोबाइल हेच त्याच्या हातामधले शस्त्र झाले आहे की काय असे वाटावे, अशी अनेक उदाहरणे आपल्या आसपास घडताना दिसतात. सेल्फीसाठी पृथ्वी शॉ या क्रिकेटपटूला झालेली मारहाण हे त्याचे अगदी ताजे उदाहरण. या प्रकरणात दोन्ही बाजू वेगवेगळी तथ्ये सांगत असल्या तरी क्रिकेटपटू, सिने-टीव्ही कलाकार, गायक, इतरही कलावंत अशा वलयांकित लोकांबरोबर आपली छबी टिपण्यासाठी त्यांचे तथाकथित चाहते ज्या थराला जाताना दिसतात, ते पाहता असे काही घडलेच नसेल असे म्हणता येत नाही. चाहत्यांना भेटणे ही वलयांकित व्यक्तींसाठी आनंदाची बाब असते, हे या व्यक्तींसकट कुणीच नाकारणार नाही. कारण त्यांना वलय लाभलेले असते ते त्यांच्याकडे असलेल्या कला-कौशल्याबरोबरच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या या चाहत्यांमुळेच. चाहत्यांचे त्यांच्या आयुष्यामधले स्थान त्यांना माहीत नसते, असेही नाही. निस्सीम प्रेम करणाऱ्या चाहत्यांपासून ते वेडय़ासारखे प्रेम करणाऱ्या चाहत्यांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी अनुभवलेले असतात. चाहत्यांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे, त्यांच्याबरोबर छायाचित्र काढणे ही गोष्टही वलयांकित व्यक्तींसाठी नवी नसते. थोडक्यात सांगायचे तर वलयांकित व्यक्ती आणि त्यांचे चाहते हा एक प्रकारे परस्परावलंबी नातेसंबंध असतो. पण तरीही कधीकधी पृथ्वी शॉच्या बाबतीत नुकताच घडला तसा प्रकार इतरही वलयांकित व्यक्तींच्या बाबतीत होताना दिसतो. कुणी एखादा कलाकार एखाद्या चाहत्याच्या अंगावर धावून गेला किंवा एखाद्या कलाकाराने आपल्या चाहत्याला मारहाण केली, त्याच्या हातामधला कॅमेरा किंवा मोबाइल हिसकावून घेऊन फेकून दिला अशा बातम्या प्रसिद्ध होतात. आणि अशा प्रत्येक वेळी चर्चा बहुधा संबंधित वलयांकित व्यक्तीच्या ‘माजोरडे’पणाच्याच होतात.

ते तसे नसतात, असे सरसकट विधान कुणी करणार नाही, कारण तसेही अनुभव कधीकधी काही जणांच्या बाबतीत चाहत्यांना आलेलेही असतात. पण प्रत्येक वेळी तसेच असते असे नाही. कधी कधी चाहतेही आपल्या मर्यादा ओलांडतात. खरे तर हे ‘कधी कधी’ आता ‘अनेकदा’मध्ये रूपांतरित होऊ लागले आहे, हेदेखील तितकेच खरे आहे. त्याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत, त्या म्हणजे आपला आवडता खेळाडू, कलाकार जेव्हा केव्हा आणि जिथे कुठे दिसेल तेव्हा त्याच्यावर आपला अधिकारच आहे, असे मानणे म्हणजेच त्याला त्याचा खासगी अवकाश अर्थात स्पेस आहे, हे चाहत्यांच्या गावीही नसणे आणि हातात उपलब्ध असलेला मोबाइल.

खेळाडू, कलाकार यांच्यावर लोक खरोखरच मनापासून प्रेम करत असतात, पण त्याचबरोबर या वलयांकित व्यक्तीदेखील तुमच्याआमच्यासारखी हाडामांसाची माणसेच असतात. चाहते म्हणून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा या वलयांकित व्यक्तींवर अधिकार जरूर असतो, पण त्यांच्या खासगीपणाच्या हक्कावर तो नसतो. आपल्या अधिकाराला, प्रेमाला चाहतेपणाच्या मर्यादा असतात, हे लक्षात घेणे आवश्यक असते. पृथ्वी शॉच नाही, तर कोणताही खेळाडू, कोणताही कलाकार आपल्या मित्रमंडळींबरोबर, नातेवाईकांबरोबर एखाद्या हॉटेलमध्ये गेला असेल, उशिरापर्यंत तिथे थांबून मग तिथून निघाला असेल, तर तो त्याच्या खासगी आयुष्याचा भाग आहे. आपण कुठे तरी असताना योगायोगाने एखादी वलयांकित व्यक्ती तिथे आहे आणि आपल्या हातात मोबाइलचा कॅमेरा आहे, म्हणजे या व्यक्तीशी बोलणे, तिच्याबरोबर छायाचित्र काढून घेणे हा आपला हक्कच नसतो. अशा सार्वजनिक ठिकाणी कुठेही वलयांकित व्यक्ती दिसते, आपल्याला तिच्याशी जोडून घ्यायचे असते, म्हणून ती व्यक्तीही त्याच मानसिकतेमध्ये असेलच असे नाही. ती कदाचित वेगळय़ा परिस्थितीत असू शकते, कदाचित तिच्या जवळचे कुणी आजारी असू शकते, आपली परिस्थितीनुसार वेगवेगळी मानसिकता असते, तशीच तिचीही असू शकते. कधी कधी अचानक कुणी येऊन वलयांकित व्यक्तीसोबत छायाचित्र काढून घेऊन त्याचा गैरवापरही करण्याची शक्यता असते. म्हणूनही संबंधित व्यक्तीचा छायाचित्राला नकार असू शकतो. या गोष्टींची चाहत्यांनीही बूज राखणे आवश्यक आहे. आपल्याला हवे तेव्हा, हवे तिथे आपण मागावे आणि तिने छायाचित्र द्यावे, आपल्याशी बोलावे, अशी अपेक्षा करणे हे बालहट्टासारखेच आहे. लहान मुलांकडून परिपक्व वागण्याची अपेक्षा कुणी करत नाही. पण कुणाच्याही चाहत्यांनी ‘मोठं’ व्हायला हरकत नाही.