पॅरिसमध्ये लवकरच ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा होत असून, या स्पर्धामधील भारतीयांच्या कामगिरीविषयी देशभर रास्त उत्सुकता आहे. याचे कारण अलीकडच्या काळात ऑलिम्पिक, आशियाई, राष्ट्रकुल स्पर्धामध्ये भारतीय खेळाडू जिंकत असलेल्या पदकांची संख्या आणि पदक मिळणाऱ्या क्रीडाप्रकारांची संख्या वाढू लागली आहे. तसे पाहता लोकसंख्येच्या आणि देशाच्या अवाढव्य आकाराच्या तुलनेत पदकांचे हे प्रमाण नगण्य असले, तरी प्रदीर्घ दुष्काळानंतर तुरळक पावसाचे हंगामही समाधानकारक वाटू लागतात, तसे हे. शिवाय क्रीडा क्षेत्रातही ‘गेल्या दहा वर्षांतच’ नेत्रदीपक यश मिळू लागल्याचा साक्षात्कार झालेल्यांची संख्या आपल्याकडे वाढू लागली आहे. अशा उत्सवी वातावरणात एका महत्त्वाच्या आकडेवारीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आपले, जागतिक क्रीडा परिप्रेक्ष्यातील माफक यशही डागाळले जाऊ शकते. त्याविषयी खबरदारी घेण्याची वेळ हीच आहे, असे ही आकडेवारी बजावते. ‘वल्र्ड अँटी डोपिंग एजन्सी’ अर्थात ‘वाडा’ ही क्रीडा क्षेत्रातील उत्तेजकप्रतिबंधक नियमावली आणि दंडसंहिता आखणारी जागतिक संघटना. या संघटनेने नुकत्याच प्रसृत केलेल्या अहवालानुसार, २०२२ या वर्षांत उत्तेजक चाचणीनंतर दोषी आढळलेल्या नमुन्यांची सर्वाधिक संख्या भारतात आढळून आली. या वर्षांत भारताच्या नॅशनल अँटी डोपिंग लॅबोरेटरीने (एनएडीएल) घेतलेल्या ४०६४ नमुन्यांपैकी १२७ नमुने दोषी म्हणजे बंदी घातलेल्या उत्तेजकांनी युक्त आढळून आले. दोषी नमुन्यांचे प्रमाण ३.२६ टक्के इतके आढळून आले. ही संख्या व प्रमाण हे दोन्ही सर्वाधिक आहे. दोन महिन्यांपूर्वी आणखी एक आकडेवारी प्रसृत करण्यात आली. अल्पवयीन क्रीडापटूंमधील उत्तेजक सेवनाच्या गेल्या दहा वर्षांतील अहवालांचा लेखाजोखा ‘वाडा’नेच मांडला. या यादीमध्ये रशियापाठोपाठ भारत दुसऱ्या स्थानावर होता. म्हणजे केवळ प्रौढ क्रीडापटूच नव्हे, तर अल्पवयीन क्रीडापटूंमध्येही कामगिरी उंचावण्यासाठी उत्तेजकांचा वापर करण्याची प्रवृत्ती फोफावलेली दिसून येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> लालकिल्ला : खरगे विरुद्ध मोदी लढाईचे काय झाले? 

तिला वेळीच आवर घातला नाही, तर आपलीदेखील रशियासारखी गत होईल. रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी आणि त्यामुळे अनेक क्रीडा स्पर्धामध्ये बंधने येण्यापूर्वी रशियन क्रीडापटू ऑलिम्पिक संघटनेच्या ध्वजाखाली खेळत होते. या क्रीडापटूंना रशियन ध्वजाखाली खेळण्याची संमती नव्हती. कारण उत्तेजकांचा वापर तेथील क्रीडा परिसंस्थेत विलक्षण फोफावला आणि यातून जवळपास प्रत्येक खेळाडूकडे संशयाने पाहिले जाऊ लागले. हे खेळाडू पदके जिंकतात तरी ती रशियाच्या खात्यात जमा होत नाहीत. उत्तेजकांच्या वापरसंहितेचे अनुपालन करण्यात विलक्षण हेळसांड केल्यामुळेच रशियावर ही वेळ आली. तशी ती भारतावर येऊ द्यायची नसेल, तर क्रीडा संघटना, पदाधिकारी आणि यांचा मक्ता आग्रहाने घेऊ इच्छिणाऱ्या सरकारला कार्यपद्धती आणि कार्यसंस्कृतीमध्ये मूलभूत बदल करावेच लागतील. ही संस्कृती कशा प्रकारची आहे याची चुणूक दाखवणारी घटना गतवर्षी नवी दिल्लीत घडली होती. त्यावेळी कुमारांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीसाठी आलेल्या आठपैकी सात स्पर्धकांनी स्पर्धेपूर्वीच पळ काढला! कारण भारताच्या नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीचे (नाडा) वैद्यक आणि पदाधिकारी या शर्यतीस हजेरी लावणार असल्याची कुणकुण स्पर्धकांना लागली. क्रीडा क्षेत्रात उत्तेजक चाचण्या यादृच्छिक (रँडम) पद्धतीने घेतल्या जातात. या चाचण्यांची पूर्वकल्पना दिली जात नाही. अशा प्रकारे चाचण्या केल्यानंतर संबंधित खेळाडू, संघटना आणि एकंदरीत देशात उत्तेजक न वापरण्यासंबंधी जागृती, इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा किती आहे याचा अंदाज येतो. त्या घटनेला पार्श्वभूमी गतवर्षी ‘वाडा’ने जारी केलेल्या दोषी नमुन्यांच्या यादीची होती. त्या यादीमध्ये भारत रशियापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर होता. यंदा तो अव्वल स्थानावर सरकला आहे! पूर्वाश्रमीचे सोव्हिएत महासंघ आणि पूर्व जर्मनी, अमेरिकी, चीन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका या देशांमध्येही वलयांकित आणि दिग्विजयी क्रीडापटूंनी उत्तेजकांचा वापर केल्याचे आढळून आले. भारत आता कुठे क्रीडाक्षेत्रामध्ये दबदबा निर्माण करण्याच्या वाटेवर निघाला आहे. या वाटेवर उत्तेजक वापराच्या गैरप्रवृत्तीमुळे भारतावरही दीर्घकालीन बंदी आणली गेली, तर माफक यश मिरवण्याची संधीही सरकारला मिळणार नाही. शिवाय देशाच्या कानाकोपऱ्यातील असंख्य होतकरू क्रीडापटूंच्या आशा-आकांक्षा धुळीस मिळतील.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity about indians performance in olympic and paralympic in paris zws