मॅच ऑफ द सेंच्युरी’ म्हणून गाजलेल्या १९७२ मधील बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीनंतर ‘बोरिस स्पास्की’ म्हणून जगणे अत्यंत अवघड, आव्हानात्मक ठरले असते. बुद्धिबळपटू आणि बुद्धिबळप्रेमींच्या निवडक विश्वाबाहेरील जगताने या सामन्याची दखल घेतली. या बाहेरील बहुतांना बुद्धिबळाच्या पटावरील डावपेचांशी फार सखोल ओळख वगैरे नव्हती. पण ही लढत शीतयुद्धकालीन अमेरिकेचा रॉबर्ट तथा बॉबी फिशर आणि सोव्हिएत महासंघाचा बोरिस स्पास्की यांच्यात झाली आणि तिला पटावरील शीतयुद्धाचे स्वरूप देण्यात आले. मग ‘प्रगत विश्वा’चा बॉबी फिशर ‘सैतानी साम्राज्या’च्या बोरिस स्पास्कीला लीलया हरवून जगज्जेता बनला आणि तोवर सोव्हिएत रशियासमोर अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत (अंतराळ मोहिमा, अण्वस्त्रे) पिछाडीवर पडू लागलेल्या अमेरिकेत तो विजय अमेरिकेचा, म्हणजेच पाश्चिमात्य जगताचा, म्हणजेच प्रगत जगताचा म्हणून दणक्यात साजरा झाला. सोव्हिएत नेत्यांना हा पराभव जिव्हारी लागला. हा सोव्हिएत व्यवस्थेचा पराभव मानला गेला आणि बहिष्कृत ठरवल्या गेलेल्या स्पास्कीला जवळपास दोन वर्षे सोव्हिएत रशियाबाहेर कुठे जाताच आले नाही. ‘बॉबी फिशरसमोर हरलेला हाच तो…’ अशी अवहेलना त्याला पुढे अनेकदा झेलावी लागली. पण खुद्द स्पास्कीला त्या पराभवाविषयी, सामन्याविषयी काय वाटले? नेमक्या शब्दांत सांगायचे झाल्यास, अतीव समाधान आणि सुटकेची जाणीव! ‘त्या’ लढतीनंतर आपण अधिक मोकळे आणि आनंदी झालो असे त्याने पुढे अनेकदा बोलून दाखवले. बॉबी फिशर सर्वार्थाने आपल्यापेक्षा श्रेष्ठ बुद्धिबळपटू होता, ही त्याची मीमांसा अखेरपर्यंत टिकली. त्यामुळे मानहानीकारक पराभवाचे ओझे वागवत त्याला जीवन ओढावे लागले नाही.

तसे पाहिल्यास बुद्धिबळपटूंच्या विक्षिप्तपणाविषयी प्रचलित समजुतींना ‘न्याय’ देऊ शकेल असा या दोहोंमध्ये बॉबी फिशरच होता. असामान्य बौद्धिक कुवतीचा असा हा बुद्धिबळपटू तितकाच हेकेखोर, तिरसट आणि संशयी वृत्तीचा होता. आइसलँडची राजधानी रिक्येविक येथे ही लढत सुरू व्हायच्या आधी फिशरने अनेक जाचक अटी मांडल्या आणि त्यांची पूर्तता होईपर्यंत स्वारी अडूनच बसली. पहिल्या डावात फिशर पराभूत झाला नि दुसऱ्या डावात खेळायला गेलाच नाही. त्यामुळे तो डाव स्पास्कीला बहाल झाला. तिसऱ्या डावाच्या आधी फिशरने हा सामना मुख्य स्टेजवरून पडद्याआड नेण्याची अभूतपूर्व अट मांडली आणि ती मान्य करण्यावाचून गत्यंतर नव्हते. या संपूर्ण काळात स्पास्की विलक्षण शांत आणि सहकार्यशील होता. त्याने फिशरच्या अटी अमान्य कराव्यात, किमान निषेध तरी व्यक्त करावा यासाठी त्याच्यावर सोव्हिएत सरकारकडून दडपण यायचे. पण स्पास्कीने यांतले काहीही केले नाही. याचे कारण दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये परस्पर मैत्री आणि आदरभावच होता. सहाव्या डावात फिशरने नेत्रदीपक विजय साकारला त्या वेळी स्पास्कीने डावाअखेरीस उभे राहून टाळ्या वाजवत फिशरला दिलखुलास दादही दिली. असा रसरशीतपणा हे स्पास्कीचे ठळक स्वभाववैशिष्ट्य होते.

सध्याच्या कर्कश विजयोत्सवी संस्कृतीत असा कुणी सापडणे दुर्मीळच. स्पास्कीच्या घरात कुणालाच बुद्धिबळ ठाऊक नव्हते. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी लेनिनग्राडच्या वेढ्यातून निसटून तो आणि त्याचा भाऊ रेल्वेने दूर सुरक्षित स्थळी निघाले, त्या प्रवासात स्पास्कीची बुद्धिबळाशी ओळख झाली. तो हुशार होता आणि बुद्धिबळाखेरीज इतरही खेळांमध्ये प्रवीण होता. मात्र बुद्धिबळातच कारकीर्द करण्याचे त्याने लहान वयातच निश्चित केले. त्या वेळच्या सोव्हिएत बुद्धिबळ प्रशिक्षण सुविधांचा फायदा त्याला झाला. पण तरीही त्याला सोव्हिएत साम्यवाद मात्र मान्य नव्हता. लेनिनग्राडला तो पेट्रोग्राड या जुन्या नावानेच संबोधायचा. सोव्हिएत व्यवस्थेने आणि अमेरिकेनेही या लढतीला शीतयुद्धाचे परिमाण दिले हेही त्याला पसंत नव्हते. तो साठच्या दशकात जगातील एक उत्कृष्ट बुद्धिबळपटू होता. टायग्रिन पेट्रोशियानसारख्या निष्णात जगज्जेत्याला १९६८ मध्ये हरवून स्पास्की बुद्धिबळ विश्वातला दहावा जगज्जेता बनला. पण फिशरशी पराभूत झाल्यानंतर सोव्हिएत व्यवस्थेने त्याला हातचे राखूनच पाठिंबा दिला. त्यामुळे कंटाळून तो फ्रान्समध्ये स्थायिक झाला. पराभवाचे शल्य न वागवता तो पुढेही काही काळ खेळत राहिला. त्यामुळेच त्याच्याविषयी जगभर आदर आणि प्रेम सदैव वाढतच गेले. आयुष्याच्या पटावरील बोरिस स्पास्कीचा डाव ८८ ‘चालींनंतर’ संपुष्टात आला, तरी जगज्जेता ही त्याची ओळख अमीट राहील.

Story img Loader