‘मॅच ऑफ द सेंच्युरी’ म्हणून गाजलेल्या १९७२ मधील बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीनंतर ‘बोरिस स्पास्की’ म्हणून जगणे अत्यंत अवघड, आव्हानात्मक ठरले असते. बुद्धिबळपटू आणि बुद्धिबळप्रेमींच्या निवडक विश्वाबाहेरील जगताने या सामन्याची दखल घेतली. या बाहेरील बहुतांना बुद्धिबळाच्या पटावरील डावपेचांशी फार सखोल ओळख वगैरे नव्हती. पण ही लढत शीतयुद्धकालीन अमेरिकेचा रॉबर्ट तथा बॉबी फिशर आणि सोव्हिएत महासंघाचा बोरिस स्पास्की यांच्यात झाली आणि तिला पटावरील शीतयुद्धाचे स्वरूप देण्यात आले. मग ‘प्रगत विश्वा’चा बॉबी फिशर ‘सैतानी साम्राज्या’च्या बोरिस स्पास्कीला लीलया हरवून जगज्जेता बनला आणि तोवर सोव्हिएत रशियासमोर अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत (अंतराळ मोहिमा, अण्वस्त्रे) पिछाडीवर पडू लागलेल्या अमेरिकेत तो विजय अमेरिकेचा, म्हणजेच पाश्चिमात्य जगताचा, म्हणजेच प्रगत जगताचा म्हणून दणक्यात साजरा झाला. सोव्हिएत नेत्यांना हा पराभव जिव्हारी लागला. हा सोव्हिएत व्यवस्थेचा पराभव मानला गेला आणि बहिष्कृत ठरवल्या गेलेल्या स्पास्कीला जवळपास दोन वर्षे सोव्हिएत रशियाबाहेर कुठे जाताच आले नाही. ‘बॉबी फिशरसमोर हरलेला हाच तो…’ अशी अवहेलना त्याला पुढे अनेकदा झेलावी लागली. पण खुद्द स्पास्कीला त्या पराभवाविषयी, सामन्याविषयी काय वाटले? नेमक्या शब्दांत सांगायचे झाल्यास, अतीव समाधान आणि सुटकेची जाणीव! ‘त्या’ लढतीनंतर आपण अधिक मोकळे आणि आनंदी झालो असे त्याने पुढे अनेकदा बोलून दाखवले. बॉबी फिशर सर्वार्थाने आपल्यापेक्षा श्रेष्ठ बुद्धिबळपटू होता, ही त्याची मीमांसा अखेरपर्यंत टिकली. त्यामुळे मानहानीकारक पराभवाचे ओझे वागवत त्याला जीवन ओढावे लागले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा