धर्म नाही असा एकही मानवी समाज जगात नाही, असे सांगत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी धर्म सार्वत्रिक, वैश्विक असल्याचे स्पष्ट केले आहे. जगातील प्रत्येक धर्माची स्वत:ची ओळख आराध्य आणि आराधना पद्धती यावर ठरत आली आहे. यातील वैविध्यानेच एक धर्म दुसऱ्या धर्मापासून वेगळा ठरतो. यापूर्वी तर्कतीर्थांनी विविध धर्मसभा, परिषदा आणि संमेलनांमधून वाद-प्रतिवाद केले, ते दुसरे-तिसरे काही नसून तो परंपरा आणि परिवर्तनाचा संघर्ष होता, असे म्हटले पाहिजे. अशा सभा-संमेलनांमधून धर्मनिर्णय केले जातात ते त्या धर्मप्रमुखाच्या निर्णयानुसार. धर्माचे पारंपरिक स्वरूप टिकवून ठेवणे हे धर्मप्रमुखाचे आद्या कर्तव्य असते. ती त्याची जबाबदारीही असते. समाजात स्वतंत्र विचार करणारा एक वर्ग असतो. तो कालसंगत परिवर्तनाचा समर्थक असतो. जे धर्मपंडित, पुरोहित असतात, ते धर्माचे पुरातन स्वरूप प्रमाण मानून धर्म अपरिवर्तनीय असल्याचे सांगत राहतात. त्याचे आधार अर्थातच धर्मग्रंथ असतात. धर्मग्रंथांचे शब्दप्रामाण्य धर्मपंडित शिरोधार्य मानत असल्याने नवमतवादी धर्मसुधारकांचा ते विरोध करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> लोकमानस : ‘केसरी’च्या बातमीबद्दल शंकेस वाव

तर्कतीर्थांनी ‘धर्मनिर्णयाचे साधन’ असे शीर्षक असलेल्या आपल्या एका भाषणात या प्रक्रियेवर प्रकाशझोत टाकला आहे. हे भाषण तर्कतीर्थांनी ११ मार्च, १९३० रोजी राजाराम ग्रंथालय, नागपूर येथे केले होते. १९२० ते १९३० या कालखंडातील धर्मसभांतील विविध वादांनंतर तर्कतीर्थ या निर्णयाला आले होते की, आपण अशा सभा-संमेलनांमधून धर्मसुधारणांचा कितीही आग्रह धरला, तरी तो स्वीकारला जाणे अशक्य. या जाणिवेने ते आपला मोर्चा धर्मसुधारणांकडून स्वातंत्र्य चळवळीकडे वळवितात; पण धर्मसुधारणांसंबंधाने धर्म निर्णय कसे होतात, याची मांडणी करण्यास ते विसरत नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार, समाजात धर्म स्थापन झाल्यानंतर बऱ्याच काळाने समाजव्यवस्था त्याच्या नियंत्रणात येते. बुद्धिमान, श्रीमंत, सत्ताधीश धर्मसंस्थेच्या नेतृत्वाखाली संघटित होतात. पुढे ते समाजावर नियंत्रण ठेवू लागतात. त्यामुळे धर्मग्रंथ, धर्मपीठ, धर्मगुरू, धर्माधिकारी (पुरोहित, पंडित) स्वत: प्रमाण, सर्वाधार व सर्वश्रेष्ठ होतात. धर्मग्रंथ प्रमादरहित आणि त्रिकालाबाधित सत्य बनून अपरिवर्तनीय ठरतात. यातून धर्मास एक प्रकारचे साचलेपण येते; पण दुसरीकडे धर्मावलंबी समाजात मात्र विविध कारणांनी परिवर्तने होत त्याचे स्वरूप बदलत राहते. अपरिवर्तनीय धर्म आणि नित्य परिवर्तनशील समाजात दरी निर्माण होते. काही विचार करणारी मंडळी मग बदलत्या समाजधारणेनुसार धर्मपरिवर्तनाची, सुधारणेची मागणी करतात. यालाच स्थूलमानाने सनातन आणि पुरोगामींमधील वैचारिक संघर्षाचे रूप येते. समाज हा सुधारणाशील असल्याने तो कालपरत्वे परिवर्तन स्वीकारत आधुनिक होत राहतो. धर्म मात्र सनातन होऊन स्थितिशील राहतो. कालपरत्वे धर्मांतर्गत नवे विचारप्रवाह तयार होतात. धर्माचेही प्राचीन व आधुनिक प्रवाह वा रूप तयार होते. हिंदू धर्म-नवा हिंदू धर्म, ख्रिाश्चन धर्मात कॅथलिक आणि प्रोटेस्टंट, बौद्ध धर्मात महायान-हीनयान ही त्याची उदाहरणे होत.

तर्कतीर्थांचे म्हणणे असे की, धार्मिकांच्या ठिकाणी दंभ आणि आलस्य निर्माण होते. त्यामुळे नित्याभ्यास, विवेचकता व शोधकता नाहीशी होते. धर्मज्ञानाचा विकास होत नाही. ज्ञान हे नित्य विकासी असते. ज्ञानाचा विकास अनंत असतो. ग्रंथबद्ध धर्म या बदलांपुढे काळाच्या प्रगतीतील धोंड ठरतो. युरोपमध्ये विज्ञान विकसित झाले. समाज आधुनिक झाला. परिणामी, धर्माचा समाजावरील पूर्वप्रभाव घटला. हिंदू धर्माचा विचार करता लक्षात येते की, धर्मशास्त्र विरुद्ध बुद्धिवाद या झगड्यात धर्मशास्त्र विरुद्ध समाजसुधारणाशास्त्र यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. यंत्र आणि विज्ञानाच्या समाजावरील वाढत्या प्रभावाने येथेही श्रद्धांना धक्के बसत आहेत. त्यामुळे समाजात श्रद्धाशील आणि बुद्धिवादी असे दोन वर्ग तयार झाले आहेत. ग्रंथप्रामाण्यवादी आणि बुद्धिवादी यांचा समन्वय होऊ शकेल, अशा पद्धतीने पुढे गेल्यास विकासाचे अनंत मार्ग निर्वेध होत राहतात. अशा धर्मनिर्णय पद्धतीतच समाजाचे हित सामावलेले असते.

drsklawate@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decision making process in religious and social welfare zws