अभिनेत्री म्हणून अधिक परिचित असलेल्या दीप्ती नवल यांच्या आत्मचरित्रातील अपरिचित भागाविषयी..

अमृतसरमध्ये आधीच खूप शर्मा होते. दीप्तीच्या वडिलांना त्यात स्वत:ची भर घालायची नव्हती. त्यांनी स्वत:चं आडनावच बदललं- नवल. बाबांना गोष्टी सांगण्याची कला अवगत होती. दीप्ती नवल यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं ‘अ कंट्री कॉल्ड चाइल्डहूड’ हे पुस्तक वाचताना वडिलांचे हे गुण दीप्तीमध्येही आल्याचं जाणवतं. दीप्ती सांगतात, ‘मला माझं बालपण चित्रपटासारखं आठवतं. मला वाचकांना तो चित्रपट केवळ दाखवायचा नव्हता, तर त्यांना माझ्या त्या आयुष्यात प्रवेश मिळवून द्यायचा होता..’ या पुस्तकाच्या निमित्ताने ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या तनुश्री घोष यांनी दीप्ती नवल यांच्याशी बातचीत केली, त्यापैकी ही निवडक प्रश्नोत्तरे..

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

तुमचं ‘चंद्रावली’ हे घर खैरुद्दीन मशिदीला लागूनच होतं. अजान आणि हवनाचे सूर शांतपणे एकत्र नांदत. त्या अनुभवाविषयी..

आमच्या गच्चीतून मला मशिदीच्या आतला भाग दिसत असे. घर आणि मशिदीच्या मध्ये फक्त एक छोटीशी गल्ली होती. त्या काळात मशीद पांढरी शुभ्र होती. आता सुशोभीकरण झालं आहे. त्यात हिरवा रंगही आला आहे. हवन अतिशय शांतपणे केलं जात असे. कुटुंबातली चार-पाच माणसं एकत्र बसून हवन करत. अजान लाउडस्पीकरवर होत असे, पण तिचा कधी ‘गोंगाट’ वाटला नाही. फाळणीनंतर १० वर्ष मशीद अशीच पडीक होती. रंग उडालेला होता आणि घुमटावर कबुतरांची फडफड सुरू असे. मग १९५७ मध्ये पहिली अजान झाली. दिवसातून पाच वेळा होणारी अजान हळूहळू अंगवळणी पडली आणि आमच्या आयुष्याचा भागच होऊन गेली.

मुलं परीकथा किंवा पुराणकथा ऐकत मोठी होतात, पण तुमचं बालपण मात्र कुटुंबाच्या इतिहासातल्या कथांनीच व्यापलेलं होतं. त्यातले आणखी काही किस्से ऐकायला आवडेल..

माझ्या आईने सांगितलेल्या ब्रह्मदेशातल्या कथाच माझ्यासाठी पुराणकथा होत्या. मी साधारण दोन-तीन वर्षांची असल्यापासूनच माझी आई मला त्यांच्या ब्रह्मदेश ते इम्फाळ या पायी प्रवासाविषयी सांगत असे. पिती (पिताजी) मात्र त्यांच्या भूतकाळाविषयी फार उशिरा व्यक्त होऊ लागले. जलालाबादचा म्हणजे आमच्या आजोबांच्या गावाचा कप्पा मात्र लहानपणी आमच्यासाठी बंदच ठेवण्यात आला होता. आमच्या मनात त्याविषयीची नकारात्मक प्रतिमा निर्माण होऊ नये, म्हणून नेहमीच काळजी घेण्यात आली.

अमेरिकेत असताना बाबा म्हणाले, ‘बेटा, फाळणी हा अंधारलेला काळ होता. त्याविषयी कोणीच काही बोलत नाही, कारण त्याबद्दल सांगण्यासाठी कोणी जिवंतच राहिलं नाही.’ (मुस्लिमांनी बियास नदीच्या किनारी सर्व हिंदूंचं हत्याकांड केल्याचं सांगितलं जातं.) पण त्या रात्री त्यांचा एक चुलत भाऊ त्याच्या मुलाला घेऊन बाहेरगावी गेला होता. आणखीही काही जण असतील, जे अन्यत्र लपले असतील. त्यानंतर खूप वर्षांनी मी अनेकदा जलालाबादला जाऊ लागले. कोणीतरी भेटेल, अशी आशा होती. पण माझं पुस्तक त्या रक्तरंजित इतिहासाविषयी नाही. एवढं सारं झाल्यानंतरही आशा बाकी होती, एवढंच मला सांगायचंय. एक मुस्लीम टांगेवाला होता. त्याने तीन हिंदू मुलींना या हिंसाचारातून वाचवलं होतं. माझी आई, त्यापैकीच एक होती. त्याने त्या मुलींना लाहोरच्या त्या दंगलग्रस्त मोहोल्ल्यातून वाचवून विस्थापितांच्या शिबिरात नेऊन सुरक्षित सोडलं होतं.

जलालाबाद वा ब्रह्मदेशातून झालेल्या पलायनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे तुम्हीही त्या विस्मृतीत गेलेल्या काळाच्या, इतिहासाच्या नोंदीं ठेवताय..

काही वर्षांपूर्वी अमृतसरमधल्या फाळणी संग्रहालयात गेले होते. तिथे जलालाबाद हत्याकांडाविषयी काहीच माहिती नव्हती. ज्या ‘आर्ट्स अँड कल्चर हेरिटेज ट्रस्ट’ने हे संग्रहालय विकसित केलं आहे, त्याचे अध्यक्ष किश्वर देसाईंना मी त्याचं कारण विचारलं. त्यांनी त्याविषयी काहीच माहिती उपलब्ध नसल्याचं सांगितलं. मग मी स्वत:च या नोंदी ठेवायचा निर्णय घेतला.

 तुमचं शहर अमृतसर, तुमच्या शाळेतल्या ननच्या उच्चारानुसार अम्बरशायर, कसं बदलत गेलं, विशेषत: जालियनवाला बाग..

हा मात्र निराशाजनक अनुभव आहे. सुवर्ण मंदिराच्या परिसरात जे काम केलं आहे, ते मला आवडतं, ते सुंदरच आहे. पण जालियनवाला बाग.. त्याचं सुशोभीकरण हा बालिशपणा आहे, ते व्हायला नको होतं. त्या परिसराचं जसंच्या तसंच जतन करायला हवं होतं. असो, पण आता ते झालं आहे.

१९६५मध्ये तुमच्या दारातच भारत-पाक युद्ध सुरू झालं, पण तुम्हाला त्या वयात त्याची गंमत वाटत होती. त्यामुळे तुमच्या बाबांनी तुम्हा बहिणींना खेमकरण सीमेवर नेलं, त्याविषयी..

आम्हाला युद्धाचं अजिबात गांभीर्य नाही, हे आमच्या बाबांच्या लक्षात आलं असावं. आम्हाला काहीतरी गंमत सुरू आहे किंवा खेळ सुरू आहे, असंच वाटत होतं. त्यामुळे त्यांनी आम्हाला त्या भीषण वास्तवाची झलक दाखवण्याचं ठरवलं. आम्ही अगदी लहानपणापासून ब्रह्मदेशातून पलायन करून लाहोरमध्ये पोहोचणं, मग पुन्हा पलायन अशा कथा ऐकत वाढलो होतो. आपल्या आई-वडिलांचं आयुष्य किती थरारक होतं आणि आपलं किती एकसुरी, निरस आहे, असं नेहमी वाटे. मला तर या सगळय़ा नाटय़ाचं अक्षरश: व्यसन लागलं होतं. त्यामुळे पहिला बॉम्बस्फोट ऐकून आमच्यात उत्साह संचारला होता. कदाचित मनातून आम्ही घाबरलोही असू. अचानक सायरन वाजू लागत, ब्लॅकआऊट होत. आम्ही खिडक्यांना काळे कागद किंवा कार्डपेपर लावून घरातला प्रकाश बाहेर जाण्यापासून रोखत असू. पण भीतीपेक्षा गंमतच जास्त वाटत होती, किमान काही तरी घडतंय तरी..

युद्धाच्या काळात तिथल्या लोकांमध्ये द्वेषभावना होती का?

माझा जन्म १९५२चा आणि युद्ध १९६५ला झालं. अमृतसरमध्ये आमच्या ओळखीत एकही ‘मुस्लीम’ नव्हता. फक्त ‘पठाण’ होते. तेव्हा तर आम्ही मुल्ला हा शब्दही ऐकला नव्हता. त्यांच्याशी आमचा संवाद कधीच होत नसे. ते फक्त दिसत. छोटीशी टोपी घालत, नमाज सुरू करण्यापूर्वी सलवार वर करून तलावात पाय धूत. त्या वयात एवढंच कळत असे. त्यांचा गोरा रंग पाहून मी आईला म्हणत असे, हे नक्की काश्मिरी असणार.

 साठचं दशक पाहिल्यानंतर आज आपला देश कोणत्या दिशेने चाललाय असं वाटतं? काय सांगणार, दु:ख होतं.. विनाकारण विष पेरलं जात आहे. फाळणी होऊनही आपण कायमच एकत्र नांदलो आहोत. लोकांनी काही क्षण थांबून विचार केला पाहिजे, आपण कुठे चाललो आहोत, हे सारं आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? जगा आणि जगू द्या, एवढंच!

Story img Loader