अहंकारी, आत्मकेंद्री नेतृत्वाचा पराभव

‘‘आप’ले मरण पाहिले…’ हे संपादकीय (१० फेब्रुवारी) वाचले. माहिती अधिकार लढ्याच्या आरंभापासून सामान्य जनतेच्या मनात सामाजिक न्याय, समानता, मूलभूत हक्क देणारा कुणी तरी तारणकर्ता उदयास येईल या आशेला अंकुर फुटले होते. ससाण्याच्या तीक्ष्ण नजरेने निवडणुका या एकमेव विषयावर ध्यानस्थ बसलेल्या भाजपला निवडणुका जिंकण्यासाठी दिव्य शक्ती प्राप्त झाली असावी असे वाटते. सत्तेचा फायदा घेऊन केंद्र सरकारच्या बहुतेक यंत्रणा आपल्या पंखाखाली घेणाऱ्या भाजपच्या दशभुजांच्या ताकदीचा अंदाज आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाला आला नसेल यावर अबोध पोराचासुद्धा विश्वास बसणार नाही. विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी रेवड्या उधळण्याची व्यवहारशून्य चतुराई भाजप सत्तेच्या जोरावर आपपेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापरू शकतो याचा अंदाज प्राप्तिकर खात्यात कर्तव्य बजावलेल्या आम आदमी पक्षाच्या नेत्याला आला नाही याचे आश्चर्य वाटते. सत्तेसाठी वर्षानुवर्षे संघर्ष केलेल्या भाजपच्या पोतडीत आता निवडणुका जिंकण्यासाठी क्लृप्त्यांची कमतरता नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणुका जिंकण्यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणारे विद्यापीठ स्थापन करण्याची क्षमता सध्या भाजपकडे आहे असेच म्हणावे लागत आहे. भाजपला हरवण्यासाठी अहंकारी, आढ्यतेची नव्हे तर मुत्सद्दी ताकदवान विरोधकांच्या एकजुटीची गरज होती. भाजपच्या विरोधात असलेल्या प्रत्येक नेत्याचा पाय स्वत:च्या घमेंडीच्या गाळात अडकलेला आहे. त्यामुळे साम, दाम, दंड अशा सर्व गोष्टींचा कौशल्याने वापर करणारा भाजप सध्याच्या घडीला तरी दशभुज योद्ध्याच्या अजिंक्य आवेशात वावरत आहे असे वाटते. लोकसभेच्या पराभवानंतर यापुढे पराभव नाहीच अशा दृढनिश्चयाने सरसावलेल्या भाजपची ताकद समजूनही न उमजलेल्या आप आणि काँग्रेसनेसुद्धा आपले मरण ओढवून घेतल्यासारखे वाटत आहे. सामान्यांचा खरोखरच पुळका असता तर आप आणि काँग्रेसने एकजुटीने भाजपला शह दिला असता. मात्र आप आणि काँग्रेसच्या अहंकारी, आत्मकेंद्री नेतृत्वाने आपल्या हाताने आपला पराभव ओढावून घेतला.

● प्रशांत कुळकर्णी, कांदिवली (मुंबई)

टक्केवारी पाहता पराभव दारुण नाही

‘‘आप’ले मरण पाहिले…’ हे संपादकीय (१० फेब्रुवारी) वाचले. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील निवडून आलेल्या जागांची तुलना करता आपचा पराभव दारुण वाटत असला तरी मिळालेल्या मतांची टक्केवारी पाहता, याला दारुण पराभव म्हणता येणार नाही. या निवडणुकीत आप ला ४३.५७ टक्के मते मिळाली, तर भाजपला ४५.५६ टक्के मते मिळाली. म्हणजे भाजपला जेमतेम दोन टक्के मते जास्त मिळाली आहेत. २०२०च्या निवडणुकीत भाजपला ३८.७ टक्के मते होती, केंद्र सरकारची सर्व संसाधने सोबत असताना सात टक्के मते वाढणे ही भाजपची खूप मोठी कामगिरी आहे, असे म्हणता येणार नाही.

● डॉ. विनोद देशमुख, भंडारा

‘आप’ला हरविणे, हेच काँग्रेसचे उद्दिष्ट?

दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकही जागा न मिळूनसुद्धा काँग्रेस पक्ष खूश आहे, याचे कारण या निवडणुकीत आपचा झालेला सफाया. काँग्रेसच्या अवशेषावर केजरीवाल यांनी ‘आप’ हा पक्ष स्थापन केला आणि दिल्लीतील सत्तेवरून काँग्रेसला हटवले. भाजपला १५ वर्षे जमले नव्हते ते आपने करून दाखविले. त्यानंतर अल्पकाळात आपने सहा राज्यांत आपले अस्तित्व सिद्ध करून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवला. काँग्रेसला हे जाणवू लागले होते की जर दिल्लीमध्ये ‘आप’चा पुन्हा विजय झाला तर काँग्रेसला कोणीही विचारणार नाही आणि केजरीवाल मोदींना थेट आव्हान देतील. काँग्रेसचे उद्दिष्ट दिल्लीची निवडणूक जिंकणे हे नसून आपला नामोहरम करणे, हे होते, असेच दिसते.

● बकुल बोरकर, विलेपार्ले (मुंबई)

निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची

‘भाजपसाठी वर्ग ठरला ‘धर्म’!’ हा ‘लाल किल्ला’ सदरातील महेश सरलष्कर यांचा लेख (१० फेब्रुवारी) वाचला. दिल्ली निवडणूक जिंकण्यासाठी आप आणि भाजपमध्ये रेवड्यांची शर्यत लागली होती आणि भाजपने अर्थसंकल्पात मास्टरस्ट्रोक मारत १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून दिल्लीतील मध्यमवर्गाला भाजपला मतदान करण्यास भाग पाडत दिल्ली काबीज केली. केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला मांडला जातो, हे जरी खरे असले तरी त्याचा दिल्लीतील मतदारांवर प्रभाव पडणार असेल तर अर्थसंकल्पाची तारीख बदलता आली नसती का? केंद्रीय निवडणूक आयोगाने यात महत्त्वाची भूमिका बजावली नाही? निवडणुकीची तारीख अलीकडे आणता आली नसती का? यापूर्वी महाराष्ट्राच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेची रेवडी उधळली गेली. आता त्यातील पाच लाख बहिणी योजनेस अपात्र ठरल्या आहेत. ज्यांनी योजनेकडे पाहून महायुतीला मते दिली असतील, त्यांची मते रद्द होणार का? पाच लाखांतील १ लाख १० हजार महिलांची वयोमर्यादा छाननीत ६५ वर्षांपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा घोळ कोणी घातला? टी. एन. शेषन यांच्यासारखे कठोर शिस्तीचे निवडणूक आयुक्त असते, तर या रेवड्यांचा काय परिणाम झाला असता? एकंदरीत साम, दाम, दंड, भेद ही रणनीती वापरून भाजपने २७ वर्षे दूर असलेली दिल्ली काबीज केली हे मात्र खरं!

● शुभदा गोवर्धन, ठाणे

किमान स्वच्छता तरी राखा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीचे आगार विमानतळाप्रमाणे पंचतारांकित करण्याचा मनोदय व्यक्त केल्याचे वृत्त (लोकसत्ता- १० फेब्रुवारी) वाचले. वाचून खूप आनंद झाला, पण या संदर्भात शिंदे यांना एक विनंती करावीशी वाटते. त्यांनी परिवहन सेवा पंचतारांकित करण्याआधी एसटीच्या आगारांतील अस्वच्छ स्वच्छतागृहे, कळकट उपाहारगृहे स्वच्छ कशी राहतील व तेथे मिळणाऱ्या पदार्थांचा दर्जा कसा सुधारेल, याचा विचार करावा. वातानुकूलित विश्रांतीगृहे निर्माण करण्याआधी सध्या अस्तित्वात असलेली विश्रामगृहे स्वच्छ आणि टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करावा. आगार खड्डेमुक्त कसे राहतील, एसटी गाड्यांमधील आसनव्यवस्था कशी सुधारेल, याकडे कृपया लक्ष द्यावे.

● झेवियर डिसोजा, वासळई (वसई)

मंत्र्यांनी एसटीतून प्रवास करावा

‘एसटी आगार विमानतळाप्रमाणे करणार’ ही बातमी (लोकसत्ता- १० फेब्रुवारी) वाचून हसू आले. परिवहन मंत्र्यांचा पदभार स्वीकारल्यापासूनचा उत्साह पाहता, ते बदल घडवतील आणि मतदारांशी प्रतारणा करणार नाहीत, याची खात्री वाटते. नवनव्या योजना आणून एसटी महामंडळाला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्यांनी एक प्रयोग करून पाहावा. त्यांनी स्वत: अन्य मंत्र्यांसह एसटीने प्रवास करावा.

● अरुण बधान, डोंबिवली

पंडितजी आकाशवाणीच्या नोकरीत कधी होते?

‘काँग्रेसमुळे देशाची बदनामी’ झाल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे वृत्त (लोकसत्ता- ७ फेब्रुवारी) वाचले. पंतप्रधान म्हणाले, ‘हृदयनाथ मंगेशकर यांना वीर सावरकरांवर कविता प्रसारित करायची होती म्हणून त्यांना आकाशवाणीतून बडतर्फ केले.’ काही वर्षांपूर्वी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनीही यासंदर्भात वक्तव्य केले होते. पंडितजी जे काही बोलून गेले ते तथ्यहीन असण्याची शक्यताच जास्त आहे. पंडितजींनी कोणत्या वर्षी आकाशवाणीची कोणती परीक्षा दिली होती आणि त्यांची निवड कोणत्या पदावर झाली होती; हे त्यांनी सांगणे अपेक्षित आहे. शिवाय त्यांना ज्या अधिकाऱ्याने बडतर्फ केले त्याचे नाव सांगण्यास काय हरकत आहे? पंडितजींचा जन्म २६ ऑक्टोबर १९३७चा आणि त्यांनी संगीतकार म्हणून त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात केली १९५५ साली आलेल्या ‘आकाशगंगा’ या चित्रपटापासून, तेव्हा त्यांचे वय अवघे १८ होते. याचा अर्थ पंडितजी आकाशवाणीच्या नोकरीत १८ वर्षे पूर्ण होण्याआधी लागले असतील, असे गृहीत धरून चालू. १८ वर्षांखालील कलाकारांची कायमस्वरूपी नेमणूक करण्याची तरतूद ब्रिटिश काळात किंवा स्वातंत्र्योत्तर काळात करण्यात आली असेल काय? आकाशवाणीत स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक साहित्यिकांनी काम केले आहे. त्यांपैकी कोणीही ‘पंडितजींना बडतर्फ करण्यात आले होते,’ असे सांगितले नव्हते. त्यामुळे आता पंडितजींनीच पुढे येऊन यासंदर्भात खुलासा करणे गरजेचे आहे. संसदेच्या इतिहासात किमान चुकीची नोंद होऊ नये; यासाठी तरी त्यांनी पुढाकार घ्यावा.

● शाहू पाटोळे, खामगाव (धाराशीव)

सविस्तर loksatta.com वर विचारमंच विभागात.