दोन प्रश्न. पहिला असा, की दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंदाजपत्रकात केंद्र सरकारने समाजातील सर्वांत वरच्या स्तरातील दोन टक्के लोकांना मोठी आर्थिक सवलत दिली. भाजपला दिल्लीत सत्ता मिळाली, पण हे धोरण असंघटित क्षेत्रावर, गरीब जनतेवर अन्याय करणारे आहे अशी टीका सरकारवर का नाही झाली? विरोधी पक्षदेखील यावर गप्प का राहिले?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरा प्रश्न : हातकड्या आणि साखळदंड बांधून अमेरिकेतून आलेल्या भारतीयांमुळे अमेरिकेविरुद्ध असंतोष का नाही निर्माण झाला? अमेरिकेवर टीका ही केंद्र सरकारच्या अपयशावरील टीका आहे असे मानून भाजपसमर्थक गप्प राहिले असे म्हणता येईल, पण अमेरिकेविरुद्ध जेवढा हवा तेवढा जोरदार निषेध जनमानसात का नाही उमटला?

या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरात एक समान सूत्र आहे. ते सूत्र म्हणजे अभिजनवाद. आज आपण अभिजनवादाच्या प्रभावाखाली आहोत. हा अभिजनवाद देशाच्या अंदाजपत्रकात स्पष्टपणे दिसला. अर्थमंत्र्यांनी कररदात्यांना मोठ्या सवलतीची घोषणा केली. सबंध सभागृहात टाळ्यांचा प्रचंड गजर झाला. तो बराच वेळ सुरू होता. देशात फक्त दोन टक्के लोक आयकर भरतात. या संख्येत जास्त वाढ करून सरकारचा महसूल वाढवून समाजातील शेतकरी, शेतमजूर आणि असंघटित लोकांसाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी जास्तीत जास्त खर्च होणे गरजेचे असताना समाजातील सर्वांत वरच्या थरातील दोन टक्के लोकांना दिलेल्या भरघोस सवलतींवर या गरीब देशाची संसद अर्थमंत्र्यांवर अभिनंदनाचा वर्षाव करत होती. मध्यम वर्गाची काटेकोर व्याख्या नसली तरी समाजातील सर्वांत वरच्या दहा टक्के आर्थिक उत्पन्न गटातील लोक स्वत:ला मध्यमवर्ग म्हणवून सरकारकडून मोठी आर्थिक सवलत मिळवत असतील तर यातील विसंगती आपल्याला दिसत का नाही? ही सवलत वर्षाला फक्त १२ लाख रुपये मिळवणाऱ्या लोकांसाठी नाही. तर त्यावरच्या श्रीमंत लोकांनादेखील सरकारने सवलत दिली आहे. सरकार यापुढे दरवर्षी एक लाख कोटी रुपयांवर पाणी सोडणार आहे. याला दिलेले तार्किक समर्थन असे की हा वर्ग जास्त खर्च करेल आणि म्हणून रोजगारनिर्मिती होईल. अर्थव्यवस्थेतील मागणी वाढवणे हा उद्देश असता तर पैसा समाजातील गरीब घटकाकडे जाणे गरजेचे होते. आपल्या उत्पन्नाचा जवळजवळ सर्व भाग हा वर्ग खर्च करतो आणि अकुशल क्षेत्रातील वस्तू आणि सेवांची मागणी वाढवतो. आज किसान सन्मान निधीचा खर्च आहे ६० हजार कोटी रुपये आणि समाजातील सर्वांत वरच्या दोन टक्के लोकांना सरकारने दिले आहेत एक लाख कोटी रुपये. किसान सन्मान निधीतील वाढीने अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाली असती. दिल्ली निवडणुकीत भाजपला यश मिळाले. कारण करदात्यांची संख्या दिल्लीत खूप जास्त आहे. पण या एक लाख कोटींचा फटका देशातील गरिबांना बसला. हा अभिजनवादाचा विजय आहे आणि या अभिजनवादाचे रूपांतर ‘अभिजनवादी राष्ट्रवादात’देखील झाले आहे.

अमेरिकेत अवैधरीत्या राहणाऱ्या भारतीयांना डोनाल्ड ट्रम्प परत पाठवणार अशी बातमी आली तेव्हा लंडनमधील एका मूळ भारतीयाने समाजमाध्यमावर ट्रम्प यांचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली. त्यात म्हटले होते ‘इंग्लंड अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या भारतीयांनी आम्हाला लाज आणली आहे. ते भारताचे नाव जगात बदनाम करत आहेत.’ अमेरिकेत स्थायिक झालेल्या अनेक भारतीयांना डोनाल्ड ट्रम्प आवडतात हे उघड आहे. बेड्या घालून पाठवले जाणारे भारतीय कायदा मोडून अमेरिकेत गेले असले, तरी त्यामागील त्यांची प्रेरणा आपल्यासारखीच आर्थिक समृद्धीची आहे याची जाणीव या लोकांना का नसावी? आणि या भारतीयांच्या बेड्या आणि साखळदंड त्यांना वेदनादायी का वाटत नसावेत? याचे एक कारण म्हणजे आपण आपल्या देशातून एका श्रीमंत देशात आलो आहोत, आपण काही इथले मूळ लोक नाही. याची काहीशी सल, न्यूनगंड या लोकांमध्ये असावा. अमेरिकेतील संशोधन क्षेत्रात योगदान देणाऱ्या भारतीयांमध्ये हा न्यूनगंड नसतो. पण जास्त पैसे मिळतील म्हणून अमेरिकेत गेलेल्या लोकांमध्ये तो निश्चितच असतो. ही मानसिकता फक्त भारतीयांमध्येच असते, असेही नाही. लॅटिन अमेरिकेतून येऊन अमेरिकेत स्थायिक झालेल्या लोकांमध्येदेखील हीच मानसिकता असते. त्यांना मानसिकदृष्ट्या गोऱ्या अमेरिकी लोकांचा आणि आपला सामाजिक दर्जा एकाच पातळीवर असावा अशी इच्छा असते. याच लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मते दिली असावीत. आपल्याच देशातील लोकांबद्दल अतिशय असभ्य भाषा वापरणाऱ्या एका नेत्याला मते देण्यामागील भावनादेखील या आपल्या देशातील लोकांनी इथे येऊन आपल्याला लाज आणली अशीच असणार. आपल्याच देशातील लोकांना झिडकारून गोऱ्या अमेरिकी लोकांच्या जवळ जाण्याची इच्छा हा अभिजनवाद आहे. न्यूनगंडातून आलेला अभिजनवाद. यात असेही अधोरेखित करण्याचा प्रयत्न असतो- आम्ही अगदी कायदेशीरपणे इथे आलो. ग्रीन कार्ड मिळवले. या देशाने आम्हाला स्वीकारले कारण या देशाच्या संपत्तीत (जीडीपी) आम्ही भर घालत असतो. तसे तुमचे नाही- अशी ही मानसिकता असते. या लबाड मानसिकतेतून डोनाल्ड ट्रम्प यांच्या तितक्याच लबाड राजकारणाला ते सोयीस्करपणे डोळे झाकून मदत करतात. ट्रम्प यांची भूमिका लबाड अशासाठी की समजा अमेरिकेतील सर्व बेकायदा राहणाऱ्या लोकांनी जाहीर केले की आम्ही परत आमच्या देशात जाऊ इच्छितो, तर त्यांना जाऊ देणे अमेरिकेला परवडेल का? याचे उत्तर नाही असे आहे. तसे झाले तर श्रमाचा तुटवडा होऊन महागाईचा मोठा फटका अमेरिकेला बसेल. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची ही भूमिका तात्त्विक नाही. ती सोयीस्कर आहे. तुम्ही बेकायदा आलात हा मुद्दा फक्त सांगायचा मुद्दा आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत बेकायदा राहायला आलेल्या लोकांना सरसकटपणे गुन्हेगार ठरवतात. वेडे ठरवतात. हेदेखील अमेरिकेत ग्रीन कार्ड घेऊन राहणाऱ्या लॅटिन अमेरिकींना आणि भारतीयांना आक्षेपार्ह वाटत नाही, इतका हा न्यूनगंड मोठा असतो.

हे झाले अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांचे. पण हातात बेड्या, पायात साखळ्या घालून परत पाठवलेल्या भारतीयांचे फोटो पाहून भारतात हवा तेवढा जनक्षोभ का नाही उसळला? याचे कारणही हेच आहे. आपल्याला आपण केव्हा एकदा प्रगत देशांच्या पंगतीत जाऊन बसू याची घाई झाली आहे. आपण दरडोई उत्पन्नात जगात १२२व्या स्थानी आहोत हे विदारक सत्य आहे, पण त्याकडे पाहण्याची ते स्वीकारण्याची आपली तयारी नाही. म्हणून आपण भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था आहे, हे आवर्जून सांगतो. म्हणजे देशातील लोकांचे जीवनमान हा आपला विकासाचा निकष न मानता आपण किती मोठी अर्थव्यवस्था आहोत आणि म्हणून प्रगत देशांच्या कसे बरोबरीला पोहोचलेलो आहोत हे सांगणे आपल्याला जास्त सुखकारक वाटते. आपल्या न्यूनगंडातून सुटण्याचा तो एक मार्ग असतो. अशी मानसिकता असताना ‘आमच्या देशातील लोक अमेरिकेत बेकायदा गेले असतील, आणि तुम्हाला ते नको असतील तर त्यांना तुम्ही जरूर परत पाठवा. पण हातात बेड्या घालून अपमानास्पद पद्धतीने पाठवणे आम्ही खपवून घेणार नाही,’ असे सांगण्याची हिंमत आपण गमावून बसलो आहोत. अभिजनवादी राष्ट्रवादाच्या मानसिक बेड्यांमध्ये असलेल्या समाजाला हातातील खऱ्या बेड्या दिसत नाहीत. बोचतही नाहीत.

milind.murugkar@gmail.com