दिल्लीतले संमेलन संपताच सारे राजकारणी शरदरावांनी बंगल्यावर आयोजित केलेल्या मेजवानीसाठी जमले. सुप्रियाताई जातीने सर्वांचे स्वागत करायला हजर होत्याच. तेवढ्यात एक सहायक धावत येऊन साहेबांच्या कानात कुजबुजला तशी त्यांची मुद्रा त्रासिक झाली. ‘त्या महामंडळवाल्यांना व लेखकांना स्पष्टपणे सांगा की तुमच्यासाठीची मेजवानी पुण्यात आयोजित करू, येथे का बोलावले नाही म्हणून नाराज होऊ नका.’ मग गुलाबी थंडीत जसजशी रात्र चढू लागली तसा मेजवानीला बहर येऊ लागला. सुशीलकुमार म्हणाले ‘संमेलन एकदम झकास झाले. खूपच गर्दी जमली. शरदरावांनी लक्ष घातल्यामुळेच हे होऊ शकले. गेल्या वर्षी त्या अंमळनेरला फारच पचका झाला होता.’ हे ऐकून एकदम उत्साहात येत आशीष व उदय म्हणाले, ‘आपण सारे भेद विसरून एकत्र आलो की यश मिळणारच. आता पुढेही हीच एकी कायम ठेवायची व संमेलनांना ऊर्जितावस्था प्राप्त करून द्यायची.’ त्यावर पवारांना अगदी खेटून बसलेले एकनाथराव म्हणाले. ‘सगळे चांगले झाले पण हे साहित्यिक फारच लुडबुड करतात हो. एकाने तर माझे नाव असूनही व्यासपीठावर चढू का देत नाही म्हणून खूप वाद घातला. अखेर बखोटे धरून त्याला बाहेर काढले. शेवटी सुरक्षा महत्त्वाचीच ना!’

‘बरोबर आहे तुमचे,’ म्हणत दूर बसलेले अजितदादा चर्चेत सहभागी झाले. ‘एक नेतृत्व तयार होण्यासाठी दोन दशके लागतात. त्यामुळे सुरक्षेला प्राधान्य हवेच. लेखक, कवी काय केव्हाही तयार करता येतात. थोडे पैसे फेकले व लिहा म्हटले की अनेक जण तयार होतात.’ हे ऐकताच नागपूरचे विजयबाबू व सातारचे शिवेंद्रराजे एकाच वेळी बोलले. ‘आता साहित्यिकही आपल्या मर्जीतले तयार करायला हवेत.’ हे ऐकताच शरदराव मंद हसले. नेमकी तीच संधी साधून एकनाथरावांच्या अगदी विरुद्ध दिशेला बसलेले देवाभाऊ म्हणाले. ‘मी तर आधीपासून हे सांगत होतो. मर्जीतले लेखक हवेत म्हणून. तेव्हा तुम्ही सारे अभिव्यक्तीच्या गप्पा करत होता. आताही वेळ गेलेली नाही. आपण सर्व मिळून आपापले साहित्यिक निर्माण करू म्हणजे संमेलनात वादच होणार नाहीत. कुणाला कुठे स्थान ते आपसात मिळून ठरवू’ यावर पृथ्वीराजबाबा सोडून सर्वांनी टाळ्या वाजवल्या. शरदराव शांतच होते. मग ज्योतिरादित्य म्हणाले. ‘त्या ताराबाईंचे भाषण किती बोअर होते. अजिबात टाळ्या पडल्या नाहीत. उलट आपल्या सर्वांच्या भाषणाला जोरदार प्रतिसाद मिळाला. लोकसाहित्याचे खरे पाईक आपणच.’

मग उदय व आशीष अचानक उभे राहून बोलू लागले. ‘पुढची पाच वर्षे राज्यात निवडणुका नाहीत. तेव्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन दरवर्षी हे संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी घ्यायची. यात राजकारणी कशाला ही कोल्हेकुई थांबवण्यासाठी महामंडळाला हाताशी धरून संमेलनाचे नाव ‘अखिल भारतीय मराठी राजकीय साहित्य संमेलन’ असे करून घ्यायचे. अध्यक्षपदासाठी पुस्तके लिहून लेखक झालेले शरदराव, सुशीलकुमार यांचाही विचार करायचा. स्वागताध्यक्ष एखाद्या मर्जीतल्या ‘होयबा’ लेखकाला नेमून टाकायचे. तसाही या वेळी सर्वच सत्रांत आपला सहभाग होताच.’ हे ऐकताच मोहोळ व रक्षाताईंनी शंका उपस्थित केली. ‘कविसंमेलनाचे काय?’ यावर उदय म्हणाले ‘आठवलेंना सोबत घेऊन वर्षभर आपलेच कार्यकर्ते कवी म्हणून तयार करू. कशाला हवेत बाहेरचे?’ हे ऐकताच सर्वांनी टाळ्या वाजवल्या. तेवढ्यात सहायकाने शरदरावांना येऊन सांगितले. ‘बाहेर पत्रकार ताटकळत आहेत.’ लगेच साहेब सर्वांना घेऊन माध्यमांना सामोरे जात म्हणाले ‘आजपासून आम्ही सर्वांनी प्रत्येकी ३० टक्के राजकारण व समाजकारण आणि ४० टक्के साहित्यकारण करण्याचा निर्णय घेतला आहे.’ ही ब्रेकिंग न्यूज झळकू लागताच मेजवानी संपल्यावर तरी साहेब बोलावतील या आशेवर बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या नहारांचा फोन वाजू लागला.

Story img Loader