‘तुम्हाला बुटात मोजे घालायला छान सुचतं हो… ’ यासारखं विचित्र वाक्य ऐकल्यावर एखाद्याचा चेहरा कसा झाला पाहिजे, याचंच प्रात्यक्षिक जणू अमिताव घोष यांच्याकडून त्या क्षणी घडलं… हनुवटी मानेलगत आणून, समोरच्याकडे संशयानं क्षणभरच पण रोखून पाहायचं आणि मग नजर दुसरीकडे वळवायची- हे सारं त्यांनी केलं; किंवा त्यांच्याकडून झालं म्हणूया!
अर्थातच, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या त्या पंचतारांकित हॉटेलाच्या कॉफी शॉपमध्ये बसून ‘लोकसत्ता’साठी खास मुलाखत देणारे ‘ज्ञानपीठ’ आणि ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारमंडित साहित्यिक अमिताव घोष यांना, ‘तुम्हाला बुटात मोजे घालायला छान सुचतं… ’ वगैरे कुणीही ऐकवलं नव्हतं. तो तसा संशय- अविश्वासयुक्त चेहरा करण्यापूर्वी त्यांनी ऐकलेलं वाक्य होतं ते, ‘‘तुमच्या अनेक पुस्तकांमध्ये तुम्ही अगदी वैयक्तिक तपशीलही असतात- पुरुष लेखकांपैकी फार कमी जण असं करत असतील, ते तुम्ही करता…’’ – यावर अमिताव घोष यांना काहीही उत्तर द्यायचं नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी हा चेहरा केला आणि म्हणाले, ‘‘पण मला जे सांगायचं असतं त्यासाठी महत्त्वाचेच असतात ते तपशील. तिथं मी हे वैयक्तिक, हे वाचलेल्या इतिहासातलं असा भेद नाही करत… ’’
हे उत्तर मात्र त्या चेहऱ्यापेक्षाही लक्षात राहणारं आहे- असायला हवं. कारण ते घोष यांच्या दहा कादंबऱ्या आणि दहा लेखसंग्रह अशा वीसही पुस्तकांना लागू पडणारं उत्तर आहे आणि त्यातही ‘‘भेद नाही करत…’’ हे शब्द महत्त्वाचे आहेत. अमिताव घोष ‘भेद नाही करत’ म्हणजे कुठेकुठे नाही करत, याची यादी मोठी होईल. वर्तमानकाळ आणि इतिहास, पर्यावरण आणि विकास, नियतकालिकांमधलं लिखाण आणि एखाद्या परिसंवादातलं किंवा चर्चासत्रातलं भाषण… अशा अनेक भेदांपेक्षाही ‘काय सांगितलं पाहिजे’ याला ते महत्त्व देतात.
त्यांच्या मते लेखकाचं/ साहित्यिकांचं काम समाजाला काहीतरी सांगणं हेच आहे. त्यांना जे सांगायचंय, ते फक्त ‘पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल’ नसून या ऱ्हासाची मानवी इतिहासातली कारणंही त्यांना शोधायची आहेत, इतरांना सांगायची आहेत. तसं करत असताना त्यांच्या लक्षात येतं की आपण तर भांडवलशाहीच्या किंवा वसाहतवादाच्या इतिहासाबद्दल बोलू लागलो आहोत. मानवी लोभाच्या या दोन रूपांनी- भांडवलशाहीनं आणि तिच्या गरजांसाठी औद्याोगिक क्रांतीच्या आधी आणि नंतरच्याही काळातल्या वसाहतवादानं जग कसं बदललं हे सांगू लागलो आहोत. त्याचाही संबंध पर्यावरणाच्या ऱ्हासाशी आहेच. किंवा या सगळ्याशी कुणाकुणाच्या वैयक्तिक, कौटुंबिक गोष्टींचाही संबंध आहे. उदाहरणार्थ बंगाली कुटुंबांची स्थलांतरं. अमिताव घोष यांच्या घराण्याचं मूळ गाव आताच्या बांगलादेशात. पण हे कुटुंब फाळणीच्या बरंच आधी कोलकातामार्गे बिहारला येऊन राहू लागलं. बंगाली भाषकांची अशीच स्थलांतरं आसामातही झालीत. कारण काय, तर नदीचे पूर. पुरानं सारं उद्ध्वस्त केल्यानंतर देशोधडीला लागायचं किंवा पुराचा धोका वेळीच ओळखून, चंबूगवाळं चीजवस्तू किडुकमिडुक ट्रंकावळकट्या सारं घेऊन ‘जगायला’ बाहेर पडायचं. ‘हे पर्यावरणीय निर्वासितच नाहीत का?’ असा प्रश्न अमिताव घोष उपस्थित करतात आणि पुढली गोष्ट सांगू लागतात. ती आणखी कुणाची तरी असते…
हे नेहमी याच क्रमानं जाईल, असंही नाही. सरळ गोष्ट सांगायचं ते नाकारतातच, बहुतेकदा. कादंबरी असो की लेख- निवेदनाचं तंत्र असं असायला हवं की वाचकाची उत्कंठा कायम राहील, एवढं घोष यांना समजतं; वाचकाला विश्वासात घेऊन काहीतरी सांगायचंय, हे तर त्यांच्या लिखाणाचं अस्तित्वकारण असतं. पण म्हणून त्यांची भाषा वाचकस्नेही असतेच, असंही नाही. उदाहरणार्थ वाक्यं. ती छोटीबिटी नसतात. मोठीही असू शकतात. पल्लेदारच. शिवाय कधीकधी, शब्दांची संज्ञाप्रवाही निवडही असते त्या पल्लेदार वाक्यांत. काही वेळा तर, एखाद्याच वाक्यात आपण अनेकपरींचे, एरवी निरनिराळ्या परिच्छेदांत शोभणारे शब्द कोंबतो आहोत आणि वाक्य जरी ओघवतं असलं तरी इसवीसन १६०५ ते १६९० या कालखंडातल्या ढाका/कोलकाता या ‘राजधान्यां’चं बदलतं महत्त्व आणि ‘बंदूकद्वीपा’बद्दल लेखकाचं कुतूहल जागं करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा बोस यांनी- म्हणजे लेखकाला लहानपणापासून माहीत असलेल्या नीलिमापिशीनं- १९७० साली ऐकलेल्या लोककाव्याचा एक बडबडगीतवजा तुकडा यांचा नेमका संबंध कसा लावायचा, याबद्दल वाचकांचा गोंधळ उडू शकतो अशी शंकासुद्धा घोष यांना जणू येतच नसावी. कारण, पुढल्या काही वाक्यांमध्ये उलगडा नक्की होणार असतो. ‘गन आयलंड’ या त्यांच्या कादंबरीत नीलिमा बोस हे पात्र पहिल्या प्रकरणात येतं. कथानायक/ निवेदक असलेल्या दीनानाथ ऊर्फ ‘डीन’ला सुंदरबनातल्या एका गूढ मंदिराची माहिती देतं. पुढे जे काही होतं, ते ‘‘दा विंची कोड’च्या तोडीसतोड उत्कंठावर्धक’ असल्याचा निर्वाळा या कादंबरीच्या अनेक परीक्षणांतून वाचायला मिळतो!
पण हे झालं जरा आधीचं पुस्तक. २०१९ सालचं. घोष यांचं ताजं ‘वाइल्ड फिक्शन्स’ हे पुस्तक म्हणजे एरवी ‘ललितेतर गद्या’ प्रकारात मोडणाऱ्या लेखांचा संग्रह आहे. बहुतेक सारे लेख पूर्वप्रकाशित- नियतकालिकांतून वेळोवेळी लिहिलेले. एका विभागात तर लेखांऐवजी, घोष यांच्या मुलाखतीच. शिवाय याच विभागात इतिहासकार दीप (ईमेलद्वारे झालेला) पत्रसंवादही आहे. काही लेखांमधून घोष स्वत:च्या पुस्तकांची कूळकथा सांगतात, पण ब्रिटिशांकडून भरपाई हवी या शशी थरूर यांच्या विचाराला दिलेला प्रतिसाद, प्रिया सतिया यांच्या पुस्तकाचं ‘स्क्रोल’साठी केलेलं परीक्षण, अशाही स्वरूपाचे लेख इथं आहेत. एक प्रकारे, लेखक म्हणून घोष यांना काय सांगावंसं वाटतं, काय महत्त्वाचं वाटतं, हे उलगडून दाखवणाऱ्या या संकीर्ण नोंदी आहेत. अशा प्रकारची पुस्तकं लेखकाच्या हयातीतच प्रकाशित होणं महत्त्वाचं असतं. अर्थात घोष नवी कादंबरीही लिहिणार आहेतच आणि ती येत्या डिसेंबरात प्रकाशित होणार आहे.
त्या प्रस्तावित कादंबरीविषयी काही विचारलं जाण्याच्या आत त्यांनी विषय बदललाच. ‘माझ्या काही पुस्तकांचे मराठी अनुवादही झालेले आहेत… तुम्ही पाहिलेत का ते?’ हा त्यांचा प्रश्न. मुलाखतकाराचीच मुलाखत? नाही- घोष यांच्या त्या प्रश्नावर ‘एक वाचलाय- द नटमेग्ज कर्स’ – या उत्तराऐवजी अन्य काही बोललो असतो तरी ते पुढं काय म्हणणार हे त्यांनी ठरवलेलं होतं. ‘मी ते एका जाणकार साहित्यिकाला आणि अनुवादही करणाऱ्या एका समीक्षकाला दाखवले… पण सध्या मी ठरवलंय की थोडं थांबावं त्या आघाडीवर’ – असं म्हणून, कोणत्याही पुस्तकाच्या मराठी अनुवादाला तातडीनं परवानगी देणार नसल्याचं त्यांनी सूचित केलं. जणू काही, ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून हे त्यांना सांगायचंच असावं. पण महाराष्ट्रापासून एरवीही अमिताव घोष दूर असतात, असं होतंय का? मुंबईबद्दल त्यांनी लिहिलंय, रघू कर्नाड यांच्या एका पॉडकास्टवरची घोष यांची अख्खी मुलाखत मुंबईबद्दलची आहे. पण महाराष्ट्रातही पर्यावरणाचे प्रश्न आहेत ना… ते माहीत आहेत का अमिताव घोष यांना?
‘होय- महाराष्ट्रानं स्वहस्ते पाण्याचा नाश केलाय. बीटी कापसासारखी पिकं आणि ऊस! विशेषत: ‘जीएम’ पिकं जमिनीलाही मारक ठरू लागली आहेत. पण आश्चर्य याचं वाटतं की एक विश्वास पाटलांची ‘झाडाझडती’ सोडली तर, महाराष्ट्राबद्दल मराठीत लिहिली गेलेली कादंबरी इंग्रजीत नाही आलेली- किमान मला तरी नाही माहीत तसं. आणि झाडाझडतीचा इंग्रजी अनुवाद मी वाचलाय’
पण यांची अपेक्षा काय? पर्यावरणाच्या ऱ्हासाचे परिणाम कोणी ना कोणी साहित्यात आणत राहावं… ते परिणाम रोखू नयेत? पर्यावरणनिष्ठ उपायांचा प्रसार करणं, एवढं तरी लेखकमंडळी करू शकतात की नाही? उदाहरणार्थ ताकारी-म्हैसाळ प्रकल्पाच्या परिसरात के. आर. दाते यांच्या मार्गदर्शनाखाली एक मातीचं धरण बांधण्यात आलं होतं. त्या धरणाचं आयुष्य कमी असणार हे माहीत असूनही, विस्थापनाविना सिंचन आणि पाणलोट विकासाची एक दिशा त्यातून दिसली होती. ही माहिती अमिताव घोष यांना नव्हती पण ‘पर्यावरणनिष्ठ उपायांचा प्रसार हे लेखकाचं काम आहे का?’ यावरचं उत्तर त्यांनी दिलं. ‘‘हे उपाय अनेकदा त्या त्या भागाच्या गरजा ओळखून, तिथल्या निसर्गाचा मान ठेवून आखण्यात आलेले असतात, ते दुसरीकडे चालतीलच असं नाही. आपण सर्रास ज्याला ‘पर्यावरणनिष्ठ’ असं म्हणतो, ते किती फसवं असतं पाहा ना- ‘इको फ्रेंडली एअरपोर्ट’ वगैरे… जरी सौर ऊर्जा वापरली, तरी त्यासाठी दुर्मीळ खनिजं (रेअर अर्थस्) धुंडाळणं, ती जमिनीबाहेर काढणं हे आलंच. यावर इंग्रजीत लिहिलं जातंय, याला ‘ग्रीनवॉशिंग’ असा शब्दही आहे…’’
पण मग त्याहून गंभीर असा उपाय काय?
‘‘डी-ग्रोथ मूव्हमेंटबद्दल तुम्ही ऐकलं असेल- शहरातल्या कुणाही रहिवाशांच्या सर्व गरजा पंधरा मिनिटं चालत जाण्याइतपत अंतराच्या आत भागल्या पाहिजेत, अशा रीतीनं शहरांची आखणी करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. बडेजाव असलेलं, मोठं महानगर ‘डी-ग्रोथ मूव्हमेंट’ नाकारते. उलट, खेड्यांचा पुरस्कार करते. काही प्रमाणात केरळमध्ये, गोव्यामध्ये आहेतही अशी गावं नि खेडी’’
खरंच उरली आहेत का गोव्यामध्ये अशी खेडी? गोव्यात अल्डोना इथं तुमचं घर आहे… मराठी हळदोणे म्हणायचे त्या गावाला… ते गाव तर तुम्हीच गेली काही वर्षं जवळून पाहताहात…
‘‘होय, बदलतंय अल्डोना. तिथं पूर्वीही शाळा होत्याच आणि आता त्या वाढल्या आहेत. मोठं शिक्षणकेंद्र झालंय ते… पण काही प्रमाणात हे सारं आपल्याला सहन करावं लागणार.’’
हेही शब्द महत्त्वाचेच – ‘काही प्रमाणात हे सारं सहन करावं लागणार’! हे सारं म्हणजे अर्थातच विनाशक विकास. तो किती प्रमाणात सहन करायचा, हे त्या त्या ठिकाणचे स्थानिकच ठरवणार का? पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदराला विरोध करताहेत तिथले लोक. त्याबद्दल का नाही काही लिहीत? … अमिताव घोष यांनी लिहिलं तर बळ मिळेल त्या लोकांना… किंवा किमान इतरांना तरी कळेल की, विरोध नेमका कशासाठी आणि कोणत्या मुद्द्यांवर होतो आहे…. बरं, याच अमिताव घोष यांनी सुंदरबनात २०१२ च्या आधी ‘सहारा इंडिया’ समूहाचा पर्यटन-प्रकल्प येणार होता त्याला विरोध का, हे लिहिलंय; ग्रेट निकोबार प्रकल्पाला विरोध करण्याचे मुद्दे काय आहेत, हेही मांडलंय… विशेष म्हणजे, हे दोन्ही लेख पुस्तकात समाविष्ट आहेत. वाढवणवरचा लेख कधी?
‘‘असे लेख लिहून काही फरक पडत नाही हे एकतर कळू लागलंय, इतक्या वर्षांनी. पण होय, सुंदरबनातला प्रकल्प मात्र रद्द झाला होता. मुंबईजवळचं जे म्हणताहात त्याबद्दल माहिती घेतो… राहुल श्रीवास्तवसारखे काहीजण नेहमीच याकामी मदत करत असतात…’
यातले राहुल श्रीवास्तव हे शहरतज्ज्ञ आहेत, त्यांचं नाव अनेकांना ‘पुकार’ आणि आता ‘अर्ब्ज’ या संस्थांमुळे माहीत असेल. पण एकंदरीत अमिताव घोष हे उदाहरणार्थ ‘तिसरी मुंबई’ किंवा ‘वाढवण’ यांसारख्या विषयांवर यापुढे लिहितील, अशी शक्यता कमी वाटते, याचं कारण मुलाखतीच्या सुरुवातीचा एक साधासा संवाद. जरा मोकळेपणा वाढवण्यासाठी त्यांना विचारलं होतं, तुम्ही ‘इंडियन एक्स्प्रेस’चे पत्रकार म्हणून सुरुवात केलीत ना लिखाणाची? कशावर रिपोर्टिंग करायचात तेव्हा? – ‘‘मी नुकता पदवीधर झालो होतो, मला महाविद्यालयं आणि विद्यापीठ हे ‘बीट’ देण्यात आलं. अर्थात दिल्लीच्या विद्यापीठ निवडणुका हा देशाचं लक्ष वेधणाऱ्या बातमीचा ऐवज असतो आणि त्या वेळी तर अरुण जेटलींसारखे लोक या विद्यापीठीय राजकारणात होते… ’’ पुढे… ‘‘ पण आणीबाणीचे दिवस होते ते… छापे पडायचे, इंडियन एक्स्प्रेसच्या कार्यालयावर तर खासच. आणीबाणीविरुद्ध लिहिण्याची धमक दाखवणारा एकमेव वृत्तपत्र-समूह होता तो!’’ हेही सांगून झाल्यावर घोष म्हणाले, ‘‘लिहू लागलो तेव्हा वाटलं, पत्रकार आणि साहित्यिक या दोघांकडेही समाजाबद्दल सहानुभाव (एम्पथी) हवाच’’ – पण पुढे पत्रकारितेकडे वळण्याचे प्रसंग कमी होत गेले, हेही घोष यांनी नमूद केलं!
मग साहित्यिक म्हणून नेमकं काय करताहेत, करणार आहेत ते? साहित्यिकांनी लोकांना नैतिक बळ द्यावं ही अपेक्षा भाबडी, आदर्शवादी वाटेल; पण अमिताव घोष यांच्या लिखाणातून या अपेक्षेला खतपाणी मिळतंय हे घोष यांना माहीत आहे का? काय कार्य आहे, अमिताव घोष यांच्यापुढे?
‘‘यासाठी मी ग्राम्शीचे शब्द व्यापक अर्थानं उधार घेतलेत. मुसोलिनीच्या काळात इटालियन तुरुंगात डांबला गेलेला ग्राम्शी, फॅसिझमच्या संदर्भात ‘दैत्य ओळखा’ असं म्हणाला होता… आपल्या काळात आपण विविध प्रकारचे दैत्य ओळखले पाहिजेत, ओळखत राहिलं पाहिजे… हे बळ लोकांनाही मिळालं पाहिजे’’!
abhijeet.tamhane@expressindia.com