घरोघरी एखादं खोडकर, व्रात्य मूल असतं, घरदार त्याच्या खोड्यांनी त्रस्त असतं, पण तरीही त्याच्या बाललीला सगळ्यांनाच हव्याहव्याशा असतात. ‘डेनिस द मेनिस’ मधला डेनिस मिशेल तसा होता. आणि त्याला पूर्ण न्याय दिला होता, ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जेमतेम आठ वर्षांच्या जे नॉर्थने. डेनिसला घरोघरी पोहोचवणाऱ्या जे नॉर्थचं नुकतंच निधन झालं.

आज जगभर सगळीकडेच दूरचित्रवाणीवर मनोरंजनाचा पूर असताना त्याने साकारलेला डेनिस विसरला जात नाही, हे त्याचं वेगळेपण. १९५९ ते १९६३ या काळात अमेरिकन टीव्हीवर ४ सीझन्स (१४६ भाग) सादर झालेली सीबीएस नेटवर्कची ‘डेनिस द मेनिस’ ही मालिका कमालीची लोकप्रिय झाली. ती मुळात घेतली होती हँक केचम यांच्या डेनिस द मेनिस या प्रसिद्ध कॉमिक स्ट्रिपवरून. डेनिस हे त्यातलं मुख्य पात्र. पाच-सहा वर्षांचा डेनिस तसा निष्पाप. त्यातूनच होणाऱ्या गोंधळातून होणारी विनोदनिर्मिती हा या कार्टून स्ट्रिपचा आणि नंतर मालिकेचा विषय होता.

जेच्या अभिनयात अतिशय नैसर्गिकता होती. तो कोणताही संवाद सहजपणे, जणू तोच डेनिस आहे अशा पद्धतीनं बोलायचा. मालिकेच्या प्रत्येक भागामध्ये डेनिस एखादी गडबड करायचा पण त्यामागचे हेतू निरागस असायचे. एका भागात डेनिस शेजारच्या मिस्टर विल्सनच्या बागेतील झाडाची फुलं तोडतो. मिस्टर विल्सन रागावतात, पण नंतर जेव्हा त्यांना समजतं की डेनिसने ती फुलं त्यांच्या वाढदिवसाची सजावट करायची म्हणून तोडलेली असतात, तेव्हा त्यांचा राग पळून जातो. डेनिस या व्यक्तिरेखेमुळे जे इतका लोकप्रिय झाला की त्याला ‘डेनिस’ म्हणूनच ओळखलं जायचं. त्याचे पोस्टर्स, खेळणी बाजारात आली. तो जाईल तिथे त्याला बघायला प्रचंड गर्दी होत असे.

‘डेनिस द मेनिस’नंतर जे नॉर्थने काही चित्रपटांमध्ये काम केलं, पण त्यात त्याला फारसं यश मिळालं नाही. दुसरीकडे बालपणी मिळालेली प्रसिद्धी आणि तिचं दडपण याचा त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. ‘डेनिस द मेनिस’मुळे तो जगभर पोहोचला असला तरी पडद्यामागे त्याचं बालपण हरवत गेलं.

त्यानेच एका मुलाखतीत सांगितले होते की मी खूप लोकप्रिय होतो, पण प्रत्यक्षात खूप एकाकी होतो. जे नॉर्थची मावशीच त्याची व्यवस्थापक होती आणि तिने जेवर अतिशय कडक शिस्त लादली होती. त्यामुळे त्याला वैयक्तिक जीवनात अनेक मानसिक आणि भावनिक अडचणींचा सामना करावा लागला.

‘डेनिस द मेनिस’ ही मालिका १९६३ मध्ये बंद झाली. त्यानंतर जेने ‘झोब्रा इन द किचन’सारख्या काही चित्रपटांमध्ये काम केलं, पण प्रेक्षकांना तो नेहमी ‘डेनिस’च वाटत राहिला. हे त्याचं एकेकाळचं सामर्थ्य हीच त्याची मर्यादा ठरली. पुढे तो नेव्हीमध्ये भरती झाला. तिथून बाहेर पडल्यानंतर त्याने बालकलाकारांच्या हक्कांसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी काम केलं. जे नॉर्थचं जीवन हे बालकलाकाराच्या प्रसिद्धीच्या जगाआड असलेल्या कटू वास्तवाचं उदाहरण आहे.