योगेन्द्र यादव

आणीबाणीत तुरुंगवास भोगलेलेही भारत जोडो यात्रेत भेटतात, जनआंदोलने या यात्रेशी जुळतात, तेव्हा ‘पप्पू’ या प्रतिमेला तडा गेलेला असतोच. पण त्याहीपेक्षा, भीतीची भिंत कशी तुटते आहे हे यात्रेदरम्यान दिसते. ही यात्रा आणि तिचा प्रतिसाद हा वातावरणातल्या निराशेचा भंग करणारा ठरतो..

readers feedback on loksatta editorial
लोकमानस :ही तर भारतासाठी नामुष्कीच!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Description of the stampede scene in Mahakumbh mela Prayagraj
अचानक लोंढा वाढल्याने दुर्घटना! प्रत्यक्षदर्शींकडून चेंगराचेंगरीच्या घटनास्थळाचे हृदयद्रावक वर्णन
Stampede at Maha Kumbh
Mahakumbh 2025 Stampede : कुणाची पत्नी हरवली, कुणी जखमी झालं तर कुणी…, चेंगराचेंगरी अनुभवणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
Satguru Mata Sudiksha
मानवीय गुणांनी युक्त असणे हीच मानवाची खरी ओळख – माता सद्गुरू सुदीक्षाजी महाराज
landslide in left main canal of Tilari Dam
तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या कालव्याला भगदाड; त्यामुळे रस्ता, शेती, बागायतीमध्ये पाणी
young man kills grandmother for greed for money in raigad
पैशाच्या लोभातून नातवानेच आजीचा खून केला

भारत जोडो यात्रा सुरू झाली, त्या साधारण काळात माझे मित्र मला फोन करायचे आणि म्हणायचे, ‘तू कशाला त्या राहुल गांधींच्या यात्रेत सामील होतो आहेस?’ भारत जोडो यात्रेला आता दोन महिने झाले आहेत. आता तेच मित्र मला फोन करतात आणि विचारतात : ‘भारत जोडो यात्रेत आहेस ना? कुठे आहेस सध्या? या यात्रेत कसं सामील व्हायचं असतं?’ हा बदल म्हणजे गेल्या दोन महिन्यांत झालेला भारत जोडो यात्रेचा परिणाम म्हणता येईल. सुमारे ७० दिवस आणि सुमारे १८०० किलोमीटर चालल्यानंतर या प्रवासाने आतापर्यंत अर्धे अंतर कापले आहे. तमिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून जात आता महाराष्ट्र ओलांडून मध्य प्रदेशात पोहोचणार आहे.

काँग्रेस पक्षाने काढलेल्या या यात्रेत काँग्रेस नेते तसेच कार्यकर्ते जोमाने सहभागी होणे साहजिकच आहे. १०० हून अधिक ‘भारत यात्री’ राहुल गांधींसोबत कन्याकुमारी ते काश्मीर हे अंतर चालत आहेत. शेकडो ‘प्रदेश यात्री’ त्या त्या राज्याच्या सुरुवातीपासून त्याच्या दुसऱ्या टोकाच्या सीमेपर्यंत या यात्रेबरोबर प्रवास करतात. याखेरीज दररोज हजारो स्थानिक कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी होतात. प्रत्येक राज्यात एक-दोन ठिकाणी मोठय़ा जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर काँग्रेस संघटनेला निवडणूक लढविण्याव्यतिरिक्त काही सकारात्मक काम मिळाले आहे. बऱ्याच दिवसांनी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर आले आहेत. या नव्या कार्यक्रमातून त्यांच्यामध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आपल्याच नेतृत्वावर त्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. अर्थात या गोष्टींवरून काँग्रेसच्या पुनर्जन्माबद्दल बोलणे घाईचे ठरेल, परंतु या सगळय़ामध्ये काही मूलभूत बदलांची चिन्हे दिसत आहेत.

या दोन महिन्यांत जर काही मोठा बदल झालाच असेल तर तो राहुल गांधी यांच्या प्रतिमेत झालेला आहे. यात्रा सुरू झाली तेव्हा माझ्या अनेक हितचिंतकांनी मला सावधगिरीचा इशारा दिला होता. त्यांचे असे म्हणणे होते की, ‘बघा बरं, तुम्ही रस्त्यावरून चालत राहाल, आणि काही दिवसांनी राहुल गांधी गाडीत बसतील आणि परदेशात निघून जातील!’ राहुल गांधी यांचे व्यक्तिमत्त्व ‘पप्पू’ या प्रतिमेने पूर्णपणे झाकोळले गेले होते. गेली १५ वर्षे मी ज्या राहुल गांधी या व्यक्तीला ओळखत होतो, ती एक दयाळू, गंभीर, प्रामाणिक आणि जिज्ञासू व्यक्ती होती. ना त्यांच्यात कसला कपटीपणा होता, ना कसली फसवणूक करण्याची वृत्ती होती. ना कसला बनावटीपणा होता. त्यांचे वागणे, बोलणे अगदी नैसर्गिक होते. घटनादत्त मूल्यांशी ते बांधील होते. रस्त्यावरच्या शेवटच्या माणसाचा विचार त्यांच्या डोक्यात असायचा. मला माहीत असलेला राहुल गांधी हा माणूस संधिसाधू राजकारण टाळणारा होता. एके काळी मी काँग्रेसवर कठोर टीका केलेली होती, रस्त्यावर उतरून काँग्रेस सरकारला विरोधदेखील केलेला होता, पण तेव्हाही राहुल गांधींच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलची माझी धारणा हीच होती.

पण त्यांना ‘पप्पू’ बनवण्याच्या प्रसारमाध्यमांच्या आणि राजकारण्यांच्या मोहिमेने सर्वसामान्यांसमोर राहुल गांधींबाबतचे वेगळेच चित्र मांडले. त्यामुळे त्यांना न ओळखणाऱ्या, अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाचेदेखील त्यांच्याबद्दलचे मत असेच होते की राहुल गांधी हे कोणत्याही मोठमोठय़ा घराण्यामधली दुसऱ्या तिसऱ्या पिढीमधली मुले असतात तसेच बेफिकीर, देशातील वास्तवापासून तुटलेले, राजकारण-समाजकारणाची फारशी समज नसलेले आणि घमेंडखोर आहेत. या देशातली धूळ- माती ते दोन दिवसही सहन करू शकणार नाहीत, असेही लोकांना वाटायचे. पण आता दोन महिन्यांपासून तेच राहुल गांधी या देशातील खडबडीत रस्त्यावरून चालत ‘राजकीय तपश्चर्ये’चा संकल्प पूर्ण करत असलेले देशातील जनतेला दिसत आहेत. एका बाजूला फ्लायओव्हरवर २० मिनिटे अडकल्यावर आपल्याच पक्षाच्या समर्थकांसाठी खिडकीच्या काचाही खाली न सरकवणारे पंतप्रधान आहेत, तर दुसऱ्या बाजूला लहान-थोर लहान-मोठय़ा प्रत्येकाला मिठी मारणारे राहुल गांधी आहेत. अनोळखी व्यक्तीचा हात धरून चालत, धावत आहेत. लहान मुलांशी खेळकरपणे वागत आहेत. हे राहुल गांधी दररोज संध्याकाळी देशवासीयांना उद्देशून भाषण करत आहेत. महागाई, बेरोजगारी आणि गरीब-श्रीमंत यांच्यामधल्या दरीबद्दल देशाला जाणीव करून देत आहेत. आपली पायरी न उतरता, संतुलित भाषेत द्वेषाच्या राजकारणावर हल्ला करत आहेत. या सगळय़ामधून देशाला एका नव्याच राहुल गांधींचे दर्शन होत आहे.

राहुल गांधी आणि काँग्रेसच्या पलीकडचा जाऊन हा प्रवास देशातील जनआंदोलने आणि जनसंघटनांमध्ये देखील एक नवीन ऊर्जा आणि समन्वय निर्माण करतो आहे. काँग्रेसने देशातील सर्व राजकीय पक्ष, जनआंदोलने आणि जनसंघटनांना या यात्रेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. ते स्वीकारून देशातील अनेक मान्यवर आणि जनसंघटना सुरुवातीपासूनच या यात्रेशी जोडल्या गेल्या होत्या. अनेकांच्या मनात शंकाकुशंका होत्या. जुन्या तक्रारी  होत्या. गेल्या दोन महिन्यांत या सगळय़ा गोष्टी हळूहळू नाहीशा होत आहेत. या यात्रेत काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबरच या जनआंदोलनांचा ताफाही चालतो आहे. दररोज राज्याराज्यामधल्या, गावोगावच्या जनसंघटना स्थानिक मुद्दे घेऊन राहुल गांधींना भेटत आहेत. त्यात कधी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कुटुंबे असतात आणि तर कधी विडी कामगारांची. कधी देवदासी प्रथेला बळी पडणाऱ्या स्त्रिया तर कधी आजही विकासाच्या परिघावर उभा असलेला आदिवासी समाज, भटका विमुक्त समाज. कधी दारूबंदी आंदोलनाचे प्रतिनिधी तर कधी पर्यायी शिक्षण, आरोग्य आणि शेतीचे प्रयोग करणारे लोक. हा प्रवास लोकांच्या स्वप्नांना जोडणारा आहे. त्यांच्या वेदनेशी नाते जोडणारा आहे. गेल्या काही दिवसांपासून या नदीत अनेक प्रवाह येऊन मिसळत आहेत, छोटय़ा यात्रा जोडल्या जात आहेत, प्रतिष्ठित नागरिक जोडले जात आहेत. एकेकाळी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसला विरोध करणारे प्रशांत भूषण आणि माजी नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल रामदास राहुल गांधींसोबत प्रवास करत आहेत, तर चित्रपट क्षेत्रातील पूजा भट्ट आणि सुशांत सिंह यांच्यासारखे लोकही या प्रवासात सहभागी होत आहेत. काँग्रेसच्या राजवटीतील आणीबाणीदरम्यान १९ महिने तुरुंगात घालवलेले ‘भारत जोडो’मध्ये आहेत. या सगळय़ाबरोबरच कोणत्याही पक्ष संघटनेशी संबंधित नसलेले तरुण-तरुणीही धावत आहेत. एका छोटय़ाशा प्रवाहाचे आता नदीमध्ये रूपांतर होत चालले आहे.

याचा अर्थ देशाचा मूड बदलला आहे का, द्वेषाचे राजकारण आता थांबेल का, गुजरात आणि हिमाचलच्या निवडणूक निकालांवर याचा परिणाम होणार का अशी कोणतीही तात्कालिक किंवा दीर्घकालीन अपेक्षा करणे सध्या चुकीचे ठरेल. तूर्तास एवढेच म्हणता येईल की, देशापुढे कोणताही पर्याय नाही, असे चित्र होते, एक प्रकारची शांतता होती, एकटेपणाची भावना होती, भीतीची भिंत होती. त्या सगळय़ाबरोबरच देशात पसरलेल्या अंधाराच्या, निराशेच्या आणि नैराश्याच्या वातावरणाला तडा गेला आहे. सर्वत्र पसरलेल्या अंधारात प्रकाशाचा किरण दिसतो आहे. भोपाळमध्ये या यात्रेवर आधारित एका चर्चासत्रात डावे विचारवंत आणि कार्यकर्ते बादल सरोज म्हणाले, ‘भारत जोडो यात्रा ही आपल्या काळातील एक महत्त्वाची घटना आहे’.

या प्रवासातून तुम्हाला काय मिळाले असे मला कोणीतरी विचारले, तेव्हा मी रघुवीर सहाय यांच्या ‘आत्महत्येविरुद्ध.. ’ या प्रसिद्ध हिंदी कवितेतील पुढील ओळी उद्धृत केल्या. त्यांचा मराठी स्वैर अनुवाद असा :

‘माझ्या बोलण्याने काय फरक पडणार, 

हा प्रश्न अगदी मलाही पडतो..

नाही लागणार सत्तेला धक्का,

पण माझ्यातली एक भीती तरी संपून जाईल..’

Story img Loader