योगेंद्र यादव
वेढा पडला आहे, म्हणून काय तटामध्येच राहायचे? संवाद नाही साधला तर आपल्या कालजयी कल्पना पोहोचतील कशा? ‘त्यांच्या’शी बोलू या..
धर्मनिरपेक्षतेच्या राजकारणाला नव्या मित्रांची नितांत गरज असताना, आपण शत्रू निर्माण करायला सुरुवात केली आहे. अलीकडच्या, ऑनलाइन ट्रोलिंगच्या अनुभवाने मला आपल्या सभोवतालच्या निराशेच्या राजकारणाबद्दल नव्याने काही गोष्टी समजल्या. हे ट्रोलिंग माझ्या ‘संडे सत्संग’ या फेसबुक, ट्विटर आणि यूटय़ूबवर असलेल्या साप्ताहिक लाइव्ह व्हिडिओसंदर्भात होते. खलिस्तान, गझवा-ए-हिंदू आणि हिंदूराष्ट्र या तीन गोष्टी म्हणजे ‘भारताच्या संकल्पने’वर (आयडिया ऑफ इंडिया) हल्ला करण्यासाठीचे तीन मुखवटेच, असा मुद्दा मी या वेळी मांडला होता. हिंदूराष्ट्राची मागणी करणारे खलिस्तानींना प्रोत्साहन देण्यासाठी जबाबदार आहेत, या आशयाच्या, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विधानाचा त्याला संदर्भ होता.
खलिस्तान, गझवा-ए-हिंदू वा हिंदूराष्ट्र.. अशा धार्मिक समुदायाच्या वर्चस्वाच्या कल्पनेची कोणतीही अभिव्यक्ती ‘आयडिया ऑफ इंडिया’ या कल्पनेशी विसंगत असली तरी या तिन्हींमध्ये फरक आहे. गझवा-ए-हिंदूला भारतीय मुस्लीम स्वीकारत नाहीत आणि खलिस्तान ही बाहेरची कल्पना असून बहुसंख्य शिखांनी ती नाकारली आहे. तरीही, सुरक्षा यंत्रणा या दोन्हींच्या संभाव्य समर्थकांना शोधून कारवाई करण्यासाठी सज्ज आहेत. याउलट, हिंदूराष्ट्राच्या कल्पनेचे. खरे तर ती कल्पनाही भारतविरोधीच. पण तिला उघड समर्थन व मोठय़ा प्रमाणावर संरक्षण दिले जाते. ‘आयडिया ऑफ इंडिया’ या संकल्पनेला हाच खरा धोका आहे आणि खलिस्तान आणि गझवा-ए-हिंदूचे भूत जिवंत ठेवण्यामागचे हेच कारण असू शकते, असे मला वाटते.
आता, माझे ट्रोलिंग कोणी केले असेल असे तुम्हाला वाटते? भारतीय जनता पक्षाचा (भाजप) आयटी सेल? चूक. हिंदूराष्ट्रप्रेमी नित्यनेमाने शिवीगाळ करतात, पण या वेळी ट्रोलिंग झाले ते ‘धर्मनिरपेक्षां’तील एका लहान पण बोलभांड गटाकडून. गझवा-ए-हिंदू आणि हिंदूराष्ट्र या दोन्हींची बरोबरी केल्याचा आणि आधीच संकटात सापडलेल्या भारतीय मुस्लीम समाजाला कलंकित केल्याचा आरोप माझ्यावर करण्यात आला. या तीन संकल्पनांना समतुल्य मानता कामा नये हा मुद्दा मी व्हिडिओत सातत्याने मांडला होता, पण त्याच्याशी कुणालाच देणेघेणे नव्हते. खरे तर, अल-काइदा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गझवा-ए-हिंदू हा शब्द वापरला आहे. कोणताही मुस्लीम नेता, पक्ष वा संघटना- मुस्लीम जातीय संघटनाही- त्याचे समर्थन करत नाहीत, यावर माझा भर होता. एकदा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही समीक्षकांनी माफी मागण्याइतका उमदेपणा दाखवला, पण बाकी सारे मात्र त्यात मी जे काही म्हटले होते ते मान्य करण्यास तयार नव्हते. एवढेच कशाला शीर्षकातील ‘मुखवटा’ या शब्दाचीदेखील त्यांनी दखल घेतली नाही. विशेष म्हणजे, हे वादळ ट्विटरपुरतेच मर्यादित होते. फेसबुक, यूटय़ूब तसेच रोजच्या जगण्यापर्यंत ते आले नाही.
निराशेचे वाढते राजकारण
मला आपल्या देशातील सार्वजनिक वाद-चर्चाच्या दर्जाबद्दल तक्रार करायची नाही. ‘आपण भारतीय असेच आहोत’ असे म्हटले जातेच. आणि ‘अर्णबोत्तर युगा’त पुरावे, तथ्ये वा सभ्यतेची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. तुम्ही सार्वजनिक जीवनात असाल, तर तुम्ही मूर्खपणा करायला शिकावे हेच बरे.
मला ज्याची चिंता वाटते तो मुद्दा अधिक गंभीर आहे. या छोटय़ाशा घटनेतून मोदीविरोधी गटातील ज्या प्रवृत्तीचे दर्शन होते, त्याचे वर्णन ‘निराशावादाचे राजकारण’ असे करता येईल. गेल्या नऊ वर्षांत सार्वजनिक जीवनाच्या कानाकोपऱ्यावर मोदी सरकारने ताबा मिळवल्यामुळे, आपले सार्वजनिक क्षेत्र कलुषित झाले आहे. संविधानावर ज्यांची भिस्त आहे, ते त्यांच्या संस्थात्मक अवकाशात आणि सामाजिक क्षेत्रात अडचणीत आले आहेत. मुस्लिमांवर शारीरिक आणि प्रतीकात्मक असे अथक हल्ले होत आहेत. आपल्याला घेरले गेले आहे, असे त्यांना वाटत असेल तर खरोखर तसे आहेच.
यातून तटबंदी मानसिकतेची काही लक्षणे लक्षात येतात. ‘इतरां’शी, ‘त्यांच्या’शी संभाषण त्रासदायक होते तेव्हा ते टाळण्याकडे आपली प्रवृत्ती असते. आपल्या समविचारी लोकांचे छोटे गट आपण तयार करतो आणि ते गट आपल्या पूर्व-विश्वासांना बळकटी देतात. आपल्याच विचारांचे प्रतिध्वनी ऐकण्याची इच्छा असण्याच्या या नैसर्गिक प्रवृत्तीला समाजमाध्यमे खतपाणीच घालतात. आपण एकमेकांच्या जितके जवळ येऊ, तितकेच आपण ‘इतरांशी’ म्हणजेच इथे रा. स्व. संघ/ भाजपच्या सहानुभूतीदारांशी संभाषण करण्याच्या शक्यतेपासून दूर जाऊ.
धर्माधतेचे ‘प्रति’-बिंब
ही तटबंदी मानसिकता सरसकटीकरणाला प्रोत्साहन देते, ती कोणतेही बारकावे बघत नाही. मग,भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्माची पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दलची टिप्पणी तुम्हाला योग्य वाटली नसेल, पण त्या टिप्पणीबद्दल इस्लामी देशांतून झालेल्या भाजपविरोधी टीकेचाही तुम्हाला फारसा आनंद झाला नसेल तर तुम्ही नक्कीच इस्लामविरोधी ठरता. एखाद्या वादग्रस्त मुद्दय़ावर कोणी तत्त्वत: भूमिका घेत असेल – समजा कुणी म्हणाले की, ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर बंदी घाला – तर आपण त्यांच्यावर मूर्खपणाचा आरोप करतो. या सगळ्यातून समतोलपणा हा दुर्गुण ठरतो. आपण सगळेजण सामूहिकपणे समतोल राखण्याचे भान गमावतो. ‘इतरां’च्या नजरेत हास्यास्पद ठरतो.
प्रत्यही होणारा वैचारिक हल्ला परतवण्यासाठी खरे तर सांस्कृतिक संसाधने आपल्याकडे आहेत, पण ती न वापरण्याकडे आपला कल ‘तटबंदी’मुळे वाढतो. संघ- भाजप नेहमीच राष्ट्रवाद, भारतीय परंपरा आदींचा उदोउदो करत, राष्ट्रवादाची शक्तिशाली प्रतीके आणि आपल्या परंपरेतील समृद्ध संसाधने वापरण्याचा इतरांचा प्रयत्न हाणून पाडू पाहात नाहीत ना आणि त्यापायी आपणही आपल्याकडले संचित विसरून, चाललेलो आहोत का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
‘तटबंदी’ मानसिकतेमुळे निष्ठा ही गोष्ट अतिमहत्त्वाची होऊन जाते. सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा राजकीय खेळ असा आहे की, प्रत्येक नवीन घटना, प्रत्येक नवीन वाद ही निष्ठेची नवी परीक्षा असते. धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने आणि द्वेष पसरवणाऱ्यांच्या विरोधात उभे राहणे, अल्पसंख्याक समुदाय आणि त्यांच्या प्रवक्त्यांच्या बाजूने उभे राहणे, काहीही असो. नकळतपणे आपण ज्याला विरोध करतो त्या धर्माधतेच्या राजकारणाचे प्रति-बिंब आपण पुन्हा निर्माण करू लागतो. आपण आतून शत्रूही शोधू लागतो. आपण सत्य आणि निष्पक्षतेच्या प्राथमिक शिष्टाचाराचादेखील त्याग करतो. धर्मनिरपेक्षतेच्या राजकारणाला नव्या मित्रांची नितांत गरज असताना, आपण ‘शत्रू बनवण्याची कला’ जोपासू लागतो.
ही राजकीय आपत्ती आहे. आपले प्रजासत्ताक पुन्हा उभे करण्यासाठी आज गरज आहे ती, ते नष्ट करण्याच्या प्रकल्पात ज्यांना सामील केले गेले आहे त्यांच्याशी – मुख्यत: हिंदूंशी – सखोल, अर्थपूर्ण संभाषण करणे आवश्यक आहे. परंतु आपलीच समूहवादी ‘तटबंदी’ मानसिकता आपल्याला अशा संभाषणापासून रोखते. संवाद नसणे हाच एक गुण ठरवला जातो. सर्वात वाईट म्हणजे, ज्याला हे कठीण संभाषण करायचे असते, त्यालाही विरोध केला जातो. यातून पराभवाचे राजकारण सुरू होते. पुढे काय होणार आहे हे आपल्याला माहीत नसल्याने, प्रतिकूल परिस्थितीसाठी तयार होणे ही जणू स्वत:च्या भविष्यासाठीची गरज ठरते.
मग, करायचे काय?
ही तटबंदीची मानसिकता कशी टाळता येईल, या प्रश्नाला सोपी उत्तरे नाहीत. आपल्या प्रजासत्ताकाच्या संरक्षणासाठी बहुसंख्य समुदायातील मोठय़ा वर्गाशी संभाषण सुरू करणे आवश्यक आहे. ते कदाचित द्वेष आणि धर्माधतेने तात्पुरते प्रभावित झाले असतील. या संभाषणासाठी आपल्या विद्यमान सांस्कृतिक संसाधनांचे नूतनीकरण करणे, भारतीय राष्ट्रवादाच्या भाषेचे पुनरुज्जीवन करणे, आपल्या राज्यघटनेची दृष्टी पुन्हा समजावून सांगणे आणि सत्य, तर्क, निष्पक्षता आणि समतोल यांचा पुरेपूर वापर करत राहणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे, आपण हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की तटबंदी दिसते तितकी अभेद्य नाही, आपणही तटातच बरे इतके स्वसंरक्षणासाठी असुरक्षित नाही.ही निराशा आपल्यावर एक जबाबदारी टाकते आहे. ती आहे आजच्या खऱ्याखुऱ्या आव्हानांपासून आपले लक्ष विचलित करण्याचा सत्ताधारी डाव यशस्वी ठरू न देण्याची!