एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
सर्वसामान्य माणसाचा आमच्यावर असलेला विश्वास हीच आमची खरी कमाई! प्रगतीची हीच गती यापुढेही सुरू राहील…
२०१९ साली जनमत पायदळी तुडवून निर्माण झालेल्या अनैसर्गिक आघाडीच्या विरोधात आम्ही केलेल्या ऐतिहासिक उठावानंतर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले. राज्यात जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले, त्याला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. विकसित राज्याचे स्वप्न डोळ्यात घेऊन हाती घेतलेल्या कारभाराच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस असला पाहिजे, हा ध्यास होता. राज्याने आर्थिक आणि औद्याोगिक क्षेत्रात घोडदौड केली पाहिजे, अशी आस होती. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचावा, अशी धडपड होती. शेतकरी, महिला, युवक यांच्या चेहऱ्यावर समाधान, आनंद दिसावा, अशी इच्छा होती. दोन वर्षांत या सर्वच आघाड्यांवर सरकारने लक्षणीय कामगिरी केली आहे. शिवसेनेचा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आम्ही जिवापाड जपला आहे. विकासासाठी अहोरात्र काम केले. त्यातूनच जनतेचा विश्वास आम्ही कमावला याचा आनंद आणि समाधान हे माझे संचित आहे.
दोन वर्षे हा काही तसा फार मोठा काळ नाही, परंतु महायुतीच्या दृष्टीने गेल्या दोन वर्षांचा काळ हा मोठ्या कसोटीचा होता. महायुती या कसोटीत १०० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे, हे आज लक्षात येते. सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरील समाधान हेच महायुतीच्या दोन वर्षांच्या परिश्रमाचे फलित आहे. देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तसेच कणखर केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांचे मार्गदर्शन आणि त्यांचे पाठबळ आम्हाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महायुतीच्या सर्वच सहकाऱ्यांची साथ आहे. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांत राज्याने उत्तुंग भरारी घेतली आहे. आपण सर्व या प्रगतीचे केवळ साक्षीदार नाही तर साथीदार आहात. लोकशाहीत लोकांच्या वतीने लोकप्रतिनिधी राज्य चालवीत असतात. गेल्या दोन वर्षांत आम्ही एक क्षणही हे भान सुटू दिले नाही.
कामगिरीचा सर्वोच्चबिंदू
नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला, त्यात अनेक महत्त्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजना आपण जाहीर केल्या. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तून राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना दरमहा दीड हजार याप्रमाणे वर्षाला १८ हजार रु. सरकार देणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून तीन गॅस सिलिंडर विनामूल्य मिळतील. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेतून जवळपास ४४ लाख शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना विनामूल्य वीजपुरवठा केला जाणार आहे. युवकांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक मदत देणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतून जवळपास १० लाख तरुणांना प्रत्येकी १० हजार रु.पर्यंतचा स्टायपेंड दिला जाणार आहे. ज्येष्ठांना धार्मिक स्थळांचे दर्शन घडविणारी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनाही सुरू होत आहे. या सर्व योजनांतून दोन वर्षांच्या कामगिरीचा सर्वोच्चबिंदू गाठला आहे.
आजवर अमलात आणलेल्या योजना आणि आता जाहीर करण्यात आलेल्या योजनांवर लाखो कोटी रुपये खर्च होणार आहेत. मात्र, या योजनांचे स्वागत करण्याऐवजी विरोधक ‘यासाठी पैसा कुठून आणणार?’ असा प्रश्न विचारत आहेत. अशा शंकासुरांना सरकारचे एकच उत्तर आहे- इच्छा तिथे मार्ग! जनकल्याणाच्या या योजना राबविण्याची इच्छाशक्ती आणि निर्धार सरकारकडे आहे, त्यामुळे आर्थिक व्यवस्थाही सरकारने केली आहे. हे सरकार दिलेला शब्द पाळणारे आहे. जनतेचाही आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे विरोधकांनी काळजी करण्याची मुळीच गरज नाही.
केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असले तर अनेक गोष्टी सहज-सोप्या होतात, अनेक कामे मार्गी लागतात. संवादातून समस्यांचे निराकरण करणे सोपे होते. केंद्राच्या योजना राज्यात प्रभावीपणे राबवणेही शक्य होते. याचे अनेक दाखले गेल्या दोन वर्षांच्या संदर्भात देता येतील. अनेकांच्या आयुष्याला कलाटणी देणारा, रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणारा समृद्धी महामार्ग, अटल सेतू, शहरी मेट्रोचे जाळे, किनारा मार्ग अशा सर्व प्रकल्पांना केंद्राने संपूर्ण सहकार्य केले. लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपस्थित राहिले. राज्याच्या विकासासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवले आणि त्यांनी त्या प्रस्तावांना नकार दिला असे कधीही झाले नाही.
राज्यात महायुतीचे स्थिर सरकार आल्यावर मी व माझ्या सहकाऱ्यांनी एक क्षणही न दवडता अहोरात्र स्वत:ला राज्याच्या कामात झोकून दिले. केवळ दोन वर्षांच्या काळात राज्याने केलेली कामे, सुरू केलेले प्रकल्प, परदेशातून आणलेली गुंतवणूक पाहता अनेक सरकारांनी पाच वर्षांतही एवढी कामे केली नसतील हे लक्षात येते. राज्याने गेल्या दोन वर्षांत विविध क्षेत्रांसाठी घेतलेले निर्णय आणि केलेली कामे एकत्र पाहिली तर त्याचा आवाका आपल्या लक्षात येतो.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान योजना यशस्वी केली. या योजनेतून जवळपास ३८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना १५ हजार कोटींची मदत आपण दिली आहे. कृषी, पशुसंवर्धन, सहकार, पणन, अन्न व नागरी पुरवठा आदी विभागांमार्फत ४४ हजार कोटींपेक्षा जास्त निधीची कामे सुरू आहेत. १ रुपयात पीक विमा योजनेचा लाभ होऊन १ कोटी १३ लाख हेक्टर जमीन संरक्षित झाली आहे. १४४ सिंचन प्रकल्पांना आपण सुधारित मान्यता दिली आहे. त्यातून लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
पाच लाखांचा आरोग्य विमा देणारी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, सर्वसामान्यांना मोफत आरोग्यसेवा पुरविण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना जनतेसाठी लाभदायी ठरत आहेत. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २५० कोटींची मदत गरजू रुग्णांना करण्यात आली आहे. महिलांना आत्मबळ देणाऱ्या बचतगटांची वाढवलेली संख्या, लाखमोलाची लेक लाडकी लखपती योजना अशा शेकडो योजना आम्ही राबवल्या. महायुती सरकारने राबवलेल्या काही उपक्रमांकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले आणि इतर राज्यांकडून या योजनांचा तपशील मागवला गेला. त्यात सर्वाधिक चर्चा झाली ती ‘शासन आपल्या दारी’ या कल्पक योजनेची. योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत नेण्याचे आमचे हे व्रत होते. सामान्य माणसांचे कष्ट आणि धावपळ वाचवण्यासाठी महायुतीने थेट सरकारलाच लोकांच्या दारापर्यंत नेले. नागरिकांना दिलासा आणि योजनाधार मिळाला.
केंद्र सरकारच्या साहाय्याने राज्यात पायाभूत सुविधांबाबतची ८ लाख ५० हजार कोटींची ५४ कामे वेगाने सुरू आहेत. रेल्वेची जवळपास सव्वा लाख कोटी रुपये खर्चाची कामे प्रगतिपथावर आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा ‘अटलसेतू’ हा देशातील सर्वाधिक लांबीचा पहिला सागरी पूल सुरू झाला. मुंबईच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडचे लोकार्पण झाले. मुंबई महानगर क्षेत्रासह (एमएमआर), पुणे, नागपूर शहरांतील मेट्रो प्रकल्पांच्या कामांना वेग आला असून मुंबई मेट्रो तीन लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे काम वेगात सुरू असून लवकरच तो मार्गही सुरू होईल.
आर्थिक-औद्याोगिक विकासाची गतीही सरकारने राखली आहे. महाराष्ट्र आज पुन्हा उद्याोगस्नेही राज्य झाले आहे. आधीच्या सरकारची कुलूप संस्कृती मोडून काढत विकास, गुंतवणुकीला वेग आला आहे. ५०० अब्ज जीडीपीचा टप्पा पार करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य आहे. देशातले सर्वाधिक म्हणजे १९ टक्के स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. थेट विदेशी गुंतवणुकीत (एफडीआय) महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. दावोस येथील दोन परिषदांमध्ये पाच लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. अनेक उद्याोगांची पायाभरणी राज्यात झाली आहे. त्यातून लाखो रोजगार निर्माण होणार आहेत. त्याचवेळी पर्यावरण रक्षण, हरित ऊर्जा निर्मिती, अपारंपरिक ऊर्जा स्राोताला प्रोत्साहन यातून सरकारने भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे.
राज्याचा समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसाही आपले सरकार जपत आहे. पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेल्या दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे साहाय्य करून सरकारने विठ्ठलभक्तांना दिलासा दिला आहे. तीर्थक्षेत्र विकास योजनांसाठी ३००० कोटी रु. अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला आहे. ग्रामीण भागात तीर्थक्षेत्र विकासासाठी ५ कोटींचा निधी दिला जाणार आहे. पालखी मार्गावर सहा क्षेत्रात मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कामे सुरू झाली आहेत. श्रीनगर आणि अयोध्या येथे महाराष्ट्र भवन उभारले जात आहे. छत्रपती शिवराजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाने ठोस प्रयत्न सुरू केले आहेत. प्राधिकरणांची स्थापना करून गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यास सरकार कटिबद्ध आहे.
शिवसेनेचा वाद निकाली
निर्धाराचे व निश्चयाचे बळ असेल तर केवळ दोन वर्षांत काय होऊ शकते हे या सर्व कामांमधून सिद्ध होते. प्रगतीची हीच गती यापुढेही सुरू राहणार आहे. शिवसेनेच्या भगव्याचे, बाळासाहेबांच्या विचारांचे पावित्र्य राखण्याचे शिवधनुष्य आम्ही यशस्वीरीत्या पेलले आहे, याचा आज सर्वाधिक अभिमान आणि आनंद आहे. ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण हा बाळासाहेबांचा, धर्मवीर आनंद दिघेसाहेबांचा मंत्र जपत लोकहिताचा ध्यास घेतल्याचे समाधान आहे. राजकीय वारसा हा केवळ रक्ताने नाही तर कर्तृत्वाने सिद्ध करावा लागतो हे मी आणि शिवसेनेच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षांत दाखवून दिले. शिवसेनेच्या सर्व पाठीराख्यांनी, मतदारांनी आम्ही घेतलेल्या या भूमिकेला आणि निर्णयाला भक्कम पाठिंबा दिल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी सिद्ध झाले आहे. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची हा गेले दोन वर्षे सुरू असलेला वादही निकाली निघाला आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेचा हा पाठिंबा अधिक भक्कम होईल आणि पुन्हा एकदा महायुती राज्यात दिमाखात सत्तेवर येईल, असा मला विश्वास आहे. सर्वसामान्य माणसाचा आमच्यावर असलेला विश्वास हीच आमची खरी कमाई आहे. या विश्वासाचे ऋण फेडण्यासाठी आणि हा विश्वास जपण्यासाठी मी, माझे सरकार आणि शिवसेना पक्षातील माझे सर्व सहकारी सदैव सज्ज असतील. तत्पर असतील, ही ग्वाही देतो.
महाराष्ट्रातील जनतेच्या कायम ऋणात राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.