धर्मकोशाचे संपादन करताना धर्मवाङ्मयाची कालसंगत मांडणी करत धर्मेतिहासाचे बदलते स्वरूप अधोरेखित करण्याचा तर्कतीर्थांचा प्रयत्न होता. यातून त्यांना हिंदुधर्म परिवर्तनशील असल्याचे सिद्ध करावयाचे होते. देशकाल परिस्थितीनुसार युगपरत्वे धर्माचे स्वरूप बदलते. धर्माची मूलभूत तत्त्वे बदलत नसली, तरी आचार, नियम, संस्कार इत्यादींमध्ये परिस्थितीसापेक्ष बदल होत असतात. धर्माविषयीचा हा ऐतिहासिक दृष्टिकोन स्वीकारला की, धर्मातील परिवर्तनाचा मागोवा तुलनात्मक अभ्यासाने घेता येतो. आचारभ्रष्टांचे शुद्धीकरण ऐतिहासिक काळात होत आले आहे, हेही यातून स्पष्ट होत राहते. ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण अस्तित्वात आहेत, असे म्हणणे बरोबर नसून, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र चारही वर्ण गुणकर्म विभागाने अस्तित्वात आहेत, हे स्वीकारणे वस्तुस्थितीनिदर्शक ठरते, अशी भूमिका घेऊन धर्मकोश रचला गेल्याने त्याचे असाधारण महत्त्व आहे.

या कोशाच्या खंड- २, भाग -१ ला तर्कतीर्थांची ‘मंत्रब्राह्मणोपनिषद्’ शीर्षक विस्तृत प्रस्तावना संस्कृत आणि इंग्रजीत देण्यात आली आहे. मराठी भाषिक वाचकांसाठी या प्रस्तावनेचे मराठी भाषांतर करून घेऊन ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’च्या ‘प्रस्तावना’ खंडात (खंड क्र. १०) प्रकाशित केले आहे. ते वाचत असताना लक्षात येते की, सदरची प्रस्तावना तर्कतीर्थांच्या वेदवाङ्मयविषयक दीर्घकालीन चिंतनाची फलश्रुती होती. उपनिषद तत्त्वज्ञानात पुरुष, प्राण, आत्मा (ब्रह्म) या तीन संकल्पनांचे विवेचन आहे.

तर्कतीर्थांनी या संकल्पनांच्या उगम व विकासाचा आढावा यात घेतला आहे. आत्म्यापासून आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नीची क्रमागत उत्पत्ती विशद करून अन्नापासून पुरुष निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. ऋग्वेदातील यज्ञप्रधान संस्कृतीचा केंद्रबिंदू अग्नी होय. त्या अग्निदेवतेपासून प्रारंभ करून तिची परिणती उपनिषदात उपरोक्त पुरुषात झाल्याचे मार्मिक विवेचन तर्कतीर्थांनी या प्रस्तावनेत केले आहे. प्राण तत्त्व अथर्ववेद काळात विकसित झाले, तर आत्मा (आत्मन्) शतपथब्राह्मणात. ब्रह्म अंतिम सत्यरूपात वर्णिले गेले आहे. यातून वैदिक वाङ्मयातील अनेक विषयांची कालानुक्रमे माहिती मिळते.

‘मंत्रब्राह्मणोपनिषद्’मध्ये जे अध्यात्मदर्शन अथवा ब्रह्मदर्शन घडते, त्यासंबंधीचा जेवढा भाग उपनिषदपूर्व काळातील वाङ्मयात ब्राह्मण ग्रंथ, आरण्यकांत आढळतो, त्यांचा सारसंग्रह तर्कतीर्थांनी या प्रस्तावनेत केला आहे. असा प्रयत्न पहिल्यांदाच झाल्याने त्याचे ऐतिहासिक योगदानात्मक महत्त्व आहे, त्यामुळे संशोधकांना साऱ्या वचनांचा एकत्रित संग्रह उपलब्ध झाला आहे. यात १) अग्नी, इंद्र, सोमदेवता, २) परमात्मा, ३) सृष्टी, ४) शारीर, ५) जीवगती, ६) धर्मतत्त्व, ७) श्रेयस, ८) प्रणव अशी विषयवार वचनांची विभागणी केली आहे.

व्यापक संग्रहण धोरण अंगीकारले आहे. मात्र, ऋत विवेचनात सारसंक्षेप शैली वापरल्याचे दिसते. वेदांची अक्षरे म्हणजे सर्व देव जिथे निवास करतात, असा उत्तम स्वर्ग होय. जो ही अक्षरे जाणील तो सुखी होईल, असा संदेश देण्याचा या लेखनाचा उद्देश स्पष्ट दिसतो. ऋचाक्षरांना ‘परम् व्योम’ संबोधून तेच सर्व देवांचे आश्रयस्थान निर्देशिले आहे. वेदशब्दात्मक ब्रह्म सूक्ष्म कल्पनेने, विश्वचैतन्य शक्तीच्या रूपाने उपनिषदपूर्वकाळात वर्णिले आहे. यात विचार विकास आहे. अथर्ववेदातील ब्रह्मपर सूक्ते, ही उपनिषदातील ब्रह्मविचारांच्या प्रस्तावनेसारखी असल्याचे सांगून तर्कतीर्थ ‘आत्मा’ शब्द ‘ब्रह्म’चा समानार्थी शब्द असल्याचे स्पष्ट करतात. ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकत्वामुळे वेदांतांनी परब्रह्माच्या दास्यात अडकून पडलेल्या पुरुषास स्वातंत्र्याच्या परिसीमेवर पोहोचविले आहे, असे ते सांगतात.

धर्मकोशाच्या ‘मंत्रब्राह्मणोपनिषद्’ प्रस्तावनेवर अभिप्राय देत म. अ. मेहेंदळे यांनी स्पष्ट केले आहे की, ‘अतिव्याप्तीचा दोष मान्य करूनही शास्त्रीबुवांचा ग्रंथ (धर्मकोश) अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत स्वागतार्ह आहे, हे कबूल करायला हवे. उपनिषदातील तत्त्वज्ञानाला आधारभूत ठरू शकतील अशा सर्व आम्नायवचनांचा (पवित्रवचन) संग्रह करावा ही कल्पनाच उदात्त आहे. शास्त्रीबुवांनी ती कृतीत उतरवून वैदिक वाङ्मयात येणाऱ्या नानाविध विषयांची माहिती कालानुक्रमे अभ्यासण्याचे साधन संशोधकांना उपलब्ध करून दिले, ही त्यांनी वेदाभ्यासकांना दिलेली मोठी देणगी आहे.’ drsklawate@gmail.com

Story img Loader