करोनाकाळातील टाळेबंदीच्या कालावधीत शिलाई मशीनची विक्री वाढली. तो कल पुढे दोन-तीन वर्षे कायम राहिला. शहरांच्या भोवतालच्या वस्त्यांमध्ये महिलांनी बचत गट करून सामूहिक कपडे शिवण्याचे प्रकल्प हाती घेतले. शिवलेल्या नऊवारी साडीची विक्री करणाऱ्या महिला आता वस्त्यांमध्ये भेटतात. गावागावांत आंतरजालाचा वापर कसा करायचा याचा नवा अनुभव घेणारी ग्रामीण भागातील महिला नवी आस घेऊन पुढे जाऊ पाहत आहे. जेव्हा संकट मोठे असते तेव्हा संस्कृती वाचविणारा घटक समाजाने दुबळा नाहकच ठरवलेला असतो. प्रस्थापित, धनदांडगा समाज आपण संस्कृती वाचवत आहोत असा समज निर्माण करून देत असला तरी त्यापाठीमागचे हात हे कष्टकरी झोपड्यांमधील असतात. अगदीच किरकोळ वाटणारी बाब सगळा प्रवाह बदलण्याची ताकद ठेवते. आपली वस्त्रप्रावरणे याच श्रेणीतील. आता अगदी तालुका पातळीवरच्या मुलीही फॅशन डिझाईनचा अभ्यास करू लागल्या आहेत. खूप नवे बदल घडत असताना आपल्याला खरंच गुंडी सापडली का?

इतिहास मोठा रंजक असतो. पुरुषाच्या एकच एक लांब, भडक रंगाच्या अंगरख्यास मौर्यपूर्व काळात ‘अल्क’ असे म्हटले जायचे. स्वच्छ फरशीवर अंथरायच्या अस्तरणाला ‘चिलिमिका’ असा शब्दप्रयोग होता. वैदिक काळात म्हणे ‘नीवी’ नावाचे वस्त्र स्त्री आणि पुरुष कमरेला कलात्मक गाठी बांधून वापरू लागले होते, कमरेच्या वर आणि खाली वेगवेगळे. तिसरे वस्त्र अंगावर पांघरायला. आपला सगळा वस्त्र व्यवहार अनेक वर्षे गाठी आणि निरगाठीचा. एखादी गाठ आतून बांधावी लागे. ती दिसत नसे त्यामुळेच आतल्या गाठीचा शब्दप्रयोग निघाला असेल, मनातले न सांगणाऱ्यांसाठी! पैठणीसाठी लागणारी तार ओढणारा एक समाज मोठा होता. जर आणि तार ओढून ती अगदी बारीक करायची. मग ती पैठणीमध्ये विणकर विणत. तर अशी तार कसणारी मंडळी तरकसे आडनावाची. वस्त्र व्यवहारातील अनेक कारागिरांची अशी मोठी गमतीदार आडनावे. कापसे, पैठणे हे त्याच पठडीतले. लोकसंस्कृती ही अशी पुढे सरकत जाते. पण आपला सारा वस्त्र व्यवहार हा अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत बंद आणि नाड्यावर अवलंबून होता. बाराबंदी हा अंगरखा इतिहासाच्या पुस्तकांमध्ये कधी तरी वाचलेला असेलच. ज्याला बारा बंद ती बाराबंदी. तत्पूर्वी आपण कपडे नेसायचो किंवा गुंडाळायचो. बौद्ध भिक्खू पिवळ्या रंगाचे वस्त्र वापरतात. चिवर म्हणतात त्याला. कमरेच्या खाली गुंडाळायची संघाटी, कमरेपासून वरचा भाग अंतरवासक आणि तिसरे उत्तरीय. अलीकडे आपल्याकडे शिल्पकलेतून दिसणारे कपडे अगदी फॅशन शोमध्येही दिसतात. घट्ट तुमान अंगरखा, कुडता, पायजमा, धोतर, अंगावरचा शेला, लुगडी, साड्या, चिरडी, पातळे, पीतांबर, शालू , पैठण्या ही सारी वस्त्रदालनाची संस्कृती आपण टिकवली असा दावा करणारे भले कितीही असतील. पण संस्कृती वगैरे बदलण्याची ताकद अगदी लहान घटकांमध्ये असते. वस्त्रप्रावरणांमध्ये बदल घडले ते बटणांमुळे आणि सुईमुळे. ते वापरणारे हात नेहमीच पिचलेल्या अवस्थेत असतात. आजही खादीतून तिरंगा करणाऱ्या नांदेडच्या महिलांची अवस्था पाहवत नाही. पैठणी विणणारे हातही तसे कृश, थकलेलेच.

खरे तर मोहेंजेदाडो आणि हडप्पामधील उत्खननात पहिली गुंडी सापडल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. पण १६व्या शतकापर्यंत आपला सारा भार बंद आणि नाड्यावरच. लोकसंख्येला पुरेल एवढ्या गुंड्यांचे उत्पादन काही होत नव्हते. गुंडीने आपला वस्त्र व्यवहार बदलला. त्याची सध्याची व्याप्ती किती? – विकसनशील शहरात बटणांची दिवसाची उलाढाल लाखो रुपयांची आहे. एखादा घाऊक व्यापारी मुंबईशी जोडलेला असतो. तोच बटणांचे वितरण करतो. कोटाची बटणे वेगळी. बाहीची गुंडी वेगळी. जेवढी फॅशन आकर्षक तेवढे आपले चीनवरचे अवलंबित्व वाढते, हे आता प्रमेय ठरावे अशी आपली ‘आत्मनिर्भरता’. आजही खास गुंड्या चीनवरून येतात. अर्थात आपल्या अर्थशास्त्राच्या बऱ्याच गुंड्या चीनने त्यांच्या हातात ठेवल्या आहेत, हे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे इथे पटते. देशांतर्गत बटणनिर्मितीचे सारे काम सध्या चालते ते गुजरातेतून. तिथे दिवसाला सात दशलक्ष बटण उत्पादन करणारे कारखाने आहेत. पण वितरणाचा सारा कारभार मात्र मुंबईतून. मध्यंतरी जळगावमध्ये एक बटणाचा कारखाना झाला, पण तो उत्पादन वितरणातील अडचणींमुळे बंद करावा लागला. केवळ बटण नाही तर सुई आणि गुंडी नसती तर आपण कपडे घालू शकलो असतो? आपला अजूनही भर आहे तो गाठींवर. धोतराचा सोगा खोवताना तो कसा असावा, पुरुषी वस्त्राचा निऱ्या वेगळ्या. काहीशा रुंद. अगदी हस्तीशैडिंग नामक धोतर नेसण्याचा एक प्रकार होता. म्हणजे काय, तर धोतराचा सोगा हत्तीच्या सोंडेप्रमाणे लटकत असे. कपडे बनण्यापूर्वी चमड्याच्या पट्ट्यांच्या आधारे अंग झाकण्याची पद्धत होती. जगण्याच्या कोणत्या टप्प्यावर आपल्याला सूत सापडले याचा इतिहास सांगणारी मंडळी आहेत. पण ज्याने सूत बनविले, सुईचा शोध लावला त्यांची नावे काही सांगता येत नाहीत. सुई-बटण या खरे तर सांस्कृतिक बदल करणाऱ्या मोठ्या बाबी. फाटलेले कातडे शिवण्यासाठी लहान हाडापासून सुई बनवली गेली असावी.

त्याचा इतिहास अगदी ३५-४० हजार वर्षे मागे जातो म्हणे. पण उत्खननामध्ये पुराविज्ञ शास्त्रज्ञांना सुया सापडल्या- त्या हाडांच्या. पाषाण युगात, ताम्रपाषाण युगापेक्षा लोह युगात खऱ्या अर्थाने सुईला आकार येत गेला. तत्पूर्वी कंचूक हेच स्त्रियांचे वरच्या भागाचे वस्त्र होते. गाठ बांधायची चोळी अगदी अलीकडच्या काळापर्यंत घालणाऱ्या महिला अनेक समाजांत होत्या. खरे तर इ. स.च्या पहिल्या शतकात उत्तम कापूस पिकवला जाऊ लागला होता. गंधार आणि मथुरा येथील मूर्ती व अर्धचित्रांतून त्या काळातील वेशभूषेची माहिती मिळते. जांघ्या, पायजमा, पूर्ण बूट, कवच टोपी असा पूर्ण पोशाख तेव्हा विकसित झाल्याच्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. उत्तर भारतातील वस्त्रे आणि दक्षिण भारतील वस्त्रे यात मोठाच फरक आहे. उत्तरेत किती वार कापड वापरून ते बनविले आहे किंवा तो नेसतो की ती नेसते यावरून संबंधितांचे सामाजिक वजन किती हे मोजले जात असे, तर दक्षिणेत केरळसारख्या प्रांतात पांढरी लुंगी घालणारी मंडळी आजही आहे. त्याला मंडू असे नाव आहे. महिलाही कमरेभोवती पांढरे वस्त्र गुंडाळतात. याचे कारण तापमानात दडले आहे. समुद्रामुळे अधिक उष्ण प्रदेशात पांढरेच आणि मोकळेढाकळेच कपडे घातले जात. आजही दक्षिण भारतात गुंडी फक्त शर्ट आणि आता ब्लाऊजपुरतीच. ब्रिटिश आल्यानंतर आपल्या पेहरावात खूप सारे बदल झाले. साहेबी रुबाब असणारे कपडे आपल्याकडे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कसे आणि कधी स्वीकारले गेले, अशा नोंदींचे दस्तऐवजीकरण करणे हा गुण आपला मुळातच नाही. त्यामुळे सुई, दोरा आणि गुंडी याचेही नक्की पुरावे आपल्याला सापडत नाहीत. इतिहासातल्या मराठी पोशाखावरील पगडीची उपयुक्तता नाही, असे सांगणारा अग्रलेख आगरकरांनी लिहिला होता. टिळकांची पगडी आणि फुल्यांची पगडी असे वाद आजही आपण जातीय अंगानेच बघतो. पण वस्त्रप्रावरणातील अनेक बदल अगदीच झपाट्याने घडत आहेत. हा वेग गुप्त काळात अधिक होता. गुप्त काळात म्हणजे चौथ्या शतकात कपड्यावर छपाईचे तंत्र विकसित झाले होते. आजची भारतातील फॅशन इंडस्ट्री आता ट्रिलियनमध्ये मोजली जाते म्हणतात. अर्थात हा सारा इतिहास कपडे शिवणाऱ्या महिलेला माहीत नसतोच, पण तिच्याच हातात खरे तर सुई-दोरा असतो.

कोणते कपडे घालावेत याची बंधने मात्र अनेक धर्मांत आजही पाळली जातात. धार्मिक कार्यातील वस्त्रे बाजूला ठेवली की आपण आता एकसारखे दिसतो. म्हणजे खाली जीनची पॅन्ट आणि वर एक शर्ट. कधी पॅॅन्ट आखूड तर कधी लांब. पण हे सगळे घडत असताना अनेक लहान बाबींनी आपले जीवन सुकर केले आहे. पॅन्ट, ब्लाऊज किंवा एखाद्या कुर्त्याला लावलेले हुक. यामुळे आपली दुनिया बदलली. त्यात आता नव्याने झिपची भर पडली आहे. या झिपचा सारा कारभार पुन्हा उत्तर भारतातून होणारा. महाराष्ट्रात अशा वस्तू फारशा तयार होत नाहीत. झाल्याही नाहीत. कदाचित एवढ्या लहान वस्तूंमध्ये व्यापार असतो, त्यातून पैसे मिळू शकतात, याचा विचारच मराठी मनाला शिवत नसावा.

Story img Loader