संस्कृती म्हणजे नक्की काय? भाषा, पोषाख, आहार-विहार की अभिरुची वृद्धिंगत करणारी प्रत्येक गोष्ट. माणूस आणि निसर्गाचं नातं की, उत्पत्ती, क्षती आणि लय याची साक्ष देणाऱ्या पाऊलखुणा. ज्ञानेश्वरांची ओवी, तुकारामांचा अभंग की इरसाल शिवी? भीमबेटकासारख्या ठिकाणी खुणा करून चित्र काढणारी माणसं संस्कृतीचे वाहक, पुढं त्यातील कोणी अनामिकांनी अजिंठ्यामधील सुबक-मोहक चित्रं काढली असतील. हिनयान, वज्रयान, महायानातील बोधिसत्त्वाची लांबसडक बोटं आणि कमळाच्या पाकळ्यांच्या आकाराच्या डोळ्यांतील जिवंतपणा चित्रात साकारणारे हात संस्कृतीचाच हिस्सा. शिव आणि शक्तीचा अनोखा मिलाफ म्हणजेही संस्कृतीच. आपलं जगणं उन्नत, प्रगत आणि अधिक सुलभ करणाऱ्या नाना प्रकारच्या टिकाऊपणाची लड किंवा साखळी म्हणता येईल फार तर संस्कृतीला. गळ्यात कवड्यांची माळ मिरविणारे छत्रपती शिवाजी महाराज नक्की कोणत्या संस्कृतीचे वाहक होते? आई तुळजाभवानीच्या गळ्यातील कवडी हे जर सर्जनाचे प्रतीक असेल तर नवनिर्माणाच्या सर्जनशीलतेचा वाहकच म्हणून छत्रपतींच्या गळ्यातील कवड्यांच्या माळेकडे पाहावे लागेल. तेर, भोकरदनमध्ये सापडणाऱ्या लज्जागौरीच्या मूर्ती आणि रोमपर्यंतचा व्यापार करून भूमध्य समुद्राभोवतीच्या देशांतील निळ्या डोळ्यांच्या, तरतरीत नाकाच्या, बांधेसूद मूर्ती आपल्या संग्रही ठेवणारेही एक संस्कृतीच घडवत असतात, संग्राहकाची. इथे अनेक परंपरा, अनेक देवता, त्यांच्या उपासना पद्धती नानाविध. प्रत्येकाचा देव निराळा, सिद्धांत निराळे. लोककला आणि उपासकांनी जपलेल्या श्रद्धा- अंधश्रद्धांचा एक मोठा खेळ मांडलेला असतो आपणच आपल्या भोवती. रिंगणात उभे असतो आपण. काही परंपरा कळतात काही नुसत्याच पाळल्या जातात. का? असे विचारायची हिंमत होत नाही वर्षानुवर्षे.
पण एक पिढी पुढच्या पिढीला सांगते. काळानुरूप त्यात बदल घडतात. हे बदल मग बघू आपण उजव्या- डाव्या अंगाने. खरेतर उजव्यांनी प्रश्नाची उत्तरे द्यायची सवय लावून घ्यावी. म्हणजे असं की, वेरुळच्या कैलाश लेणीमध्ये रंगमंचाच्या भोवती कामशिल्पं का बरे कोरली असतील. जन्म आणि मृत्यू यात आपण कोठून आलो आणि कुठे जाणार या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रवास म्हणजे संस्कृती. विहारात एकचित्त ध्यानमुद्रेतील बुद्धांचे शिल्प साकारणाऱ्या शिल्पकाराने बाहेरच्या बाजूला उन्नत उरोजाच्या ललना का साकारल्या असतील? बाह्य जग हे आकर्षणाचे केंद्र असते. आतमध्ये डोकावून पाहणे, चित्त एकाग्र करण्याची योग क्रिया म्हणजे संस्कृती की, सिद्ध पुरुषाबरोबर समागम करण्याची याचना करणारी योगिनी बहुडीची शिष्या कामाख्या आणि तिच्या त्रासाला कंटाळून देहत्याग करणारे चांगदेव राऊळ हेही संस्कृतीचाच भाग. शाक्त, कपालिक आणि बौद्ध काळातही तंत्र साधनेतून ईश्वरापर्यंत जाता येतं असं मानणारा भोगी समाज एका बाजूला आणि सर्वसंग परित्याग करून ब्रह्मचर्य पाळणारे नाथ संप्रदायी दुसऱ्या बाजूला. याच नाथ संप्रदायातील कानात डूल घालणाऱ्यांचा एक स्वतंत्र संप्रदाय होता. कानफाट्या म्हणायचे त्यांना. पुढे हा शब्द अगदीच तिरस्काराने वापरला जाऊ लागला.
हेही वाचा : लोकमानस : ही नेहरूंचे धोरण पुढे नेण्याची वेळ
अनेक कथा आहेत अशा शब्दांच्या. आपल्या वागण्या-बोलण्याचे अनेक अर्थ. तत्त्वज्ञानाच्या पातळीवर काही वेगळेच आणि आचरण निराळेच, अशी मोठी दरी म्हणजेही संस्कृतीच. राकट देशा – खडकांच्या देशात काही भाग गाडले गेलेले. काही भिंतींना तडे गेलेले. काहींच्या भिंतीतून ओल झिरपत राहते. पण मूळ टिकवून ठेवायचे असेल तर मदमस्त नशाही लागते. जसे अजिंठ्याची चित्रे काढताना त्याच्या गिलाव्यात गांजा मिसळल्याचे पुरावे अलीकडेच पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांना सापडले. गांजा पाणी शोषून घेतो. त्यामुळे ओल शोषून घेतली जाते. चित्र अनेक वर्षे टिकते, हे असं कळत जाणं म्हणजे संस्कृतीच्या पाऊलखुणा शोधणं.
फक्त आपणच संस्कृतीचे वाहक आहोत असा दावा करणारे काही असतात. पण असा दावा न करता आपलं जगणं समद्ध करणारी असंख्य माणसं असतात भोवताली. त्यांचं जगणं कष्टाचं असतं. पोत खेळणारे, भोपे म्हणून कवनं म्हणणारे किंवा विवाहानंतर जागरण गोंधळात गाणी म्हणणारे गोंधळी, वाघ्या- मुरळी होणं हे तसं अवघड काम. श्रद्धा कधी तरी माणसांच्या मानगुटी बसतात असंच हे जगणं. त्याचं कधी दु:ख वाटू नये याचीही सोय असते संस्कृती या शब्दात. आपल्या जगण्याच्या नैतिक चौकटीला आधार देताना, जुनी चौकट मोडून नव्याने मांडताना सांस्कृती या शब्दाचा आधार घेतला जातो. वामाचारी मार्गाचे चित्र रेखाटताना रामदास स्वामींचे शिष्य दिनकर स्वामींनी ‘स्वानुभवदिनकर’ मध्ये केलेले वर्णन आपल्याच सांस्कृतिक जीवनाचा भाग होते.
हेही वाचा : व्यक्तिवेध : के. एस. मणिलाल
कवळार्णव क्रिया अघोर मंत्र ।
शाक्तागम प्रेतसाधन विचित्र।
भगमालिनी पूजा स्वतंत्र। मध्यरात्री समई ।
कुंभपूजा कंचुकीविधान। अघोरीक्रिया मद्यापान।
आणि त्रिपुरसुंदरीपूजन। कामाक्षाविधी।
पंथ अघोरी असतील, नैतिक चौकट ओलांडणारे असतील, समाज म्हणून ‘मागास’ असतील किंवा पश्चिमी खुल्या (?) चौकटीला प्रोत्साहन देणारे असतील म्हणून ती संस्कृतीच नव्हती, असं कसं म्हणता येईल. दहाव्या-अकराव्या शतकात विषय साधनांचं निराळंच रूप उभं ठाकलं होतं. चंडेला साम्राज्यात याच काळात खजुराहोमधील कामशिल्प निर्माण झाली. याला प्रतिआव्हान देणाऱ्या नाथ संप्रदायातील गोरक्षकनाथाला ज्ञानेश्वर माउलींनी ‘विषयविध्वंसैकवीर’ अशी उपाधी दिली होती. हाच बौद्ध धर्माचा ऱ्हासकाळही होता. हे विरुद्ध ते आणि ते विरुद्ध हे किती जुने, हे कळेल प्रत्येकाला. अर्थात याची जाणीव प्रत्येकात असलीच पाहिजे असा आग्रह नाही. पण प्रत्येक गोष्टीचे अनेक पैलू असतात. या पैलूंचा शोध म्हणजे संस्कृती. पण आपल्याकडे संस्कृती आणि धर्म एकच आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही सांगतो त्याच दृष्टीने बघा, असं सांगणारे खूप अधिक. म्हणजे बोटांच्या अग्रांवर आहे त्यांचे विद्यापीठ, भ्रमणध्वनीमध्ये! किती तरी जुने आणि अंगवळणी पडलेले अनेक शब्द अर्थहीन होऊन जात असतात. शिवीसारखं म्हणा ना. म्हणजे खूपदा एकच शिवी दिली, की त्यातील अश्लीलता गळून पडते. निंदाव्यंजक अपशब्द वापरताना आपण रूढ लैंगिक नैतिक चौकट ओलांडत असतो आणि ही चौकट हा आपल्या अनियंत्रित रागाचा आविष्कार असतो, हेही आपल्याला कळत नाही. शब्दागणिक शिवी देणारी माणसं आणि ती भाषाही संस्कृतीचाच भाग आहे. मुळात अभिव्यक्तीची कोंडी झाली की विकृती जन्माला येते. त्यामुळे सर्व पातळ्यांवर व्यक्त व्हायला हवं. त्याज्य असं काही संस्कृतीत नसतंच, पण याच सूत्रात खरी गोम आहे.
हेही वाचा : तर्कतीर्थ विचार : ‘गुरुकुल’चे दिवस
बुद्धीच्या आधारे भावनिक निर्णय घ्यायचे की, भावनिक होऊन बुद्धीला दूर लोटायचे. सध्या भावनिक निर्णयांची अंमलबजावणी करताना बुद्धी वापरली जाते आणि बुद्धिप्रामाण्यवाद आत दडवून ठेवला जातो. सांस्कृतिक शब्दाची खरी गडबड इथे होते. ती होऊ द्यायची नसेल तर खूप सजग राहावं लागेल. इतिहासातील प्रत्येक गोष्ट, कथा, पुराणकथा यातून नक्की काय घ्यायचं हे ठरवता आलं पाहिजे. बदल हे नेहमी चांगले किंवा वाईट असेच असतात, की काही ‘ ग्रे-एरिया’ ही असतात मेंदूत? बघू काय निघतं संस्कृती दर्शनातून? कदाचित काही काळं, काही शुभ्र, उजळून टाकणारं. जगणं समृद्ध करणारं की, लोचा आहे आपल्याच मेंदूत?
suhas.sardeshmukh@expressindia.com