‘राहू, केतू डोक्यात आल्यामुळेच डॉक्टरांनी दहा लाख रुपये अनामत भरा असे रुग्ण तपासणीच्या कागदावर लिहिले’ या क्रांतिकारी वक्तव्याबद्दल पुण्यातील आम्ही तमाम ज्योतिषशास्त्रविद दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वैद्याकीय संचालकांचे जाहीर अभिनंदन करतो. हे शब्द अनवधानाने नाही तर या शास्त्राचा आदर मनात रुजलेला असल्यामुळेच त्यांच्या तोंडून बाहेर पडले, अशी आमची धारणा आहे. एका निष्णात शल्यकानेच या शास्त्राचे महत्त्व अधोरेखित केल्याने आता ज्योतिषाला मरण नाही असेही आमचे मत झाले आहे. एखाद्या वैद्याकाच्या हातून काही वाईट घडले तर त्याची जबाबदारी कायम ‘वक्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोन ग्रहांवर टाकून नामानिराळे होता येते हेच यातून दिसले.
या शास्त्राचे तज्ज्ञ म्हणून आम्ही हेच आजवर करत आलो पण आम्हाला हिणवले गेले. विज्ञानवादी शल्यकानेच त्यावर शिक्कामोर्तब केल्याने आम्हाला कमालीचा आनंद झाला आहे. त्यानिमित्त आम्ही वेताळ टेकडीवर एक कार्यक्रम आयोजित केला असून यात दीनानाथचे संचालक व संबंधित डॉक्टरांचा सत्कार करण्याचे ठरवले आहे. यावेळी या दोघांवरच नाही तर संपूर्ण रुग्णालयावर असलेली या ग्रहांची वक्रदृष्टी दूर करण्यासाठी विशेष पूजेचे आयोजन सुद्धा केले आहे. त्यात या शास्त्रावर भरवसा असलेले समस्त पुणेकर सहभागी होतील, असा विश्वास आम्हाला आहे. भविष्यात असले प्रसंग दीनानाथमध्ये घडू नयेत यासाठी काही उपाययोजना सुचवण्याचा मोह आम्हाला होतो आहे. यासाठी लागेल ती मदत करण्याची आमची तयारी आहे. या रुग्णालयातील समुपदेशकाचे पद रद्द करून त्याजागी आम्ही सुचवलेला एक ज्योतिषी नेमण्यात यावा. तो येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची ग्रहदशा नेमकी कशी याची माहिती त्याला पाहताक्षणी देईल व त्या दशेला अनुकूल डॉक्टर कोणता हे सुचवेल. हे एकप्रकारचे समुपदेशनच असेल. त्यामुळे वाद होणार नाही. एखाद्या रुग्णाची व डॉक्टरची ग्रहदशा त्या दिवशी खूपच वाईट काळातून संक्रमण करत असेल तर त्याने श्रेष्ठतम ‘गुरू’ या ग्रहाचे नामस्मरण एक हजार एक वेळा करावे. रुग्ण अत्यवस्थ व बोलण्याच्या स्थितीत नसेल तर त्याच्या नातेवाईकांनी हा विधी पार पाडला तरी चालेल. डॉक्टरांनी मात्र एका विशिष्ट खोलीत हा जप करावा. ती खोली सदैव ‘भारावलेली’ असेल याची काळजी आम्ही नेमलेला माणूस घेईल. अनिष्ट ग्रहांची शांती हा कोणत्याही संकटावर मात करण्याचा एकमेव उपाय आहे. भविष्यात असे संकट उद्भवू नये यासाठी रुग्णालयाच्या मागील बाजूला एक होमकुंड कायम धगधगत असेल. त्यात समिधा टाकण्यासाठी आमच्याकडून नियुक्त करण्यात आलेले दोन सहाय्यक २४ तास हजर असतील. एकदा ही तजवीज केली की डॉक्टरांनी तपासणीच्या कागदावर कितीही रक्कम नमूद केली तरी कोणताही रुग्ण वा त्याचा नातेवाईक ओरडणार अथवा तक्रार करणार नाही याची हमी आम्ही देतो.
२०१४ पासूनच सत्ताधाऱ्यांनी ज्योतिषशास्त्राला चांगले दिवस यावेत यासाठी प्रयत्न सुरू केले पण शैक्षणिक वर्तुळ वगळता त्यात म्हणावे तसे यश मिळत नव्हते. आता दीनानाथवर आलेल्या संकटाने या शास्त्राच्या सार्वत्रिक यशाची चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. एकदा का वैद्याकशास्त्राने ज्योतिषाचा स्वीकार केला की देश वेगाने विश्वगुरूपदाकडे वाटचाल करेल यावर आमचा ठाम विश्वास आहे. दोन शास्त्रांच्या या मैत्रीची सुरुवात विद्योचे माहेरघर असलेल्या पुण्यातून व्हावी ही अतीव समाधान देणारी बाब आहे.
– समस्त ज्योतिषशास्त्रविद, पुणे</p>