एक वेडा माणूस दिवसा सूर्यप्रकाशात कंदील पेटवून रहदारीच्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना विचारतो, ‘मी ईश्वर शोधतोय. तुम्ही त्याला पाहिलं का?’ कंदिलाच्या प्रकाशात भर दिवसा ईश्वराचा शोध घेणाऱ्या वेड्या माणसाची ही बोधकथा जर्मन विचारवंत फ्रेडरिक नीत्शेच्या ‘The Gay Science’ या पुस्तकातली आहे. या बोधकथेतला वेडा माणूस नंतर वैतागून कंदील आपटून विझवतो आणि ईश्वराला मृत घोषित करतो. खरंतर, या बोधकथेतल्या ‘वेड्या माणसा’नं ईश्वर या संकल्पनेचे पारंपरिक आधार कसे उद्ध्वस्त झालेले आहेत हे निदर्शनास आणून दिलं आहे. पण परंपरेच्या दहशतीत जगणाऱ्यांना असह्य गोष्टी मांडणं शक्य नसतं. मात्र ‘वेडा माणूस’ समाजाच्या नजरेत स्वत:चा मृत्यू पत्करून कटु सत्य मांडण्याचं धाडस करत असतो. त्यामुळे पाश्चात्य परंपरेत ‘वेडा माणूस’ हा सत्याचं ज्ञापक समजला जातो.

सॉक्रेटिसपासून मिशेल फुकोपर्यंत अनेक तत्त्वज्ञांनी ‘खऱ्या अर्थान’ वेड लागलेल्या माणसांमध्ये तत्त्वज्ञानात्मक शक्यता शोधल्या आहेत. रेनेसाँ काळातला मानवतावादी विचारवंत इरास्मुस यानं ‘In Praise of Madness’ (१५११) या पुस्तकात मॅडनेसच्या आधारानं प्रस्थापित धार्मिक, राजकीय, सामाजिक परंपरांची कठोर चिकित्सा केली आहे. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाला निर्णायक वळण देणाऱ्या सॉक्रेटिसमध्येही प्रस्थापित मूल्यांना हादरा देणारं वेड असल्यानं त्याला जगावेगळा म्हणजे वेडा समजण्यात आलं होतं.

प्रस्तुत लेखांकात अशाच एका जगावेगळ्या तत्त्ववेत्त्याची अर्थात डायोजनिसची चर्चा केली जाईल, ज्यानं समाजाच्या नजरेत स्वत:चा मृत्यू स्वीकारून ‘सिनिसिझम’ नावाचं तत्त्वज्ञान मांडलं आहे. त्याच्या जहाल विचारांमुळे प्लेटोनं डायोजनिसचा उल्लेख ‘वेड लागलेला सॉक्रेटिस’ असा केला आहे. खरंतर, सत्तारूढ चौकटीला हादरा देणाऱ्याला वेडा घोषित करणं वैश्विक बाब आहे. सिनिसिझम या प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानाचा प्रणेता डायोजनिस हा प्लेटोचा bête noire समजला जात असल्याने प्लेटोनं त्याला वेडा म्हणणं म्हणजे चिद्वादी परंपरेचा सिनिसिझमला पूर्णपणे बाद करण्याचा प्रयत्न होय.

सिनिसिझम: माणसांपेक्षा कुत्रा श्रेष्ठ

सिनिसिझम या प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानाचा प्रणेता डायोजनिसचा जन्म सिनोप या शहरात इसवीसनपूर्व ४१३ मध्ये झाला असं अनुमान आहे. नव्वद वर्षं आयुष्य लाभलेल्या या तत्त्ववेत्त्याचा मृत्यू इसवीसनपूर्व ३२३ मध्ये झाला, असं मानलं जातं. प्लूटार्कच्या आख्यायिकेनुसार डायोजनिस आणि अलेक्झांडरचा मृत्यू एकाच दिवशी झाला आहे. पण या आख्यायिकेला ऐतिहासिक आधारापेक्षा काव्यात्मक मूल्य अधिक दिसतं. श्रीमंत कुटुंबात जन्मलेला डायोजनिस ९० वर्षाच्या दीर्घ आयुष्यात आर्थिक सल्लागार, गुलाम, कैदी, निर्वासित, तत्त्वज्ञ असं बहुविध आणि टोकाचं जीवन जगला. विविध ग्रीक शहरांमध्ये भटकंतीचं जीवन जगताना तो अशा निष्कर्षापर्यंत पोहोचला की संकीर्ण भौगोलिक आणि सामाजिक ओळखींमध्ये स्वत:ला बंदिस्त करणं माणूसपणाला कमीपणा आणणारी बाब आहे. विश्व (cosmos) हेच माझं शहर (polis) आहे असं मानणारा डायोजनिस हा आद्या कॉझ्मोपॉलिटन (cosmopolitan) समजला जातो.

खरंतर, सिनिसिझम हा विचारप्रवाह सॉक्रेटिसचा शिष्य अॅन्टिस्थेनिजमुळे प्रेरित झाला असून डायोजनिसमुळे प्रसिद्धीस आला आहे. सिनिसिझम हा शब्द ‘kynikos’ म्हणजे ‘ श्वान-सदृश’ या शब्दापासून तयार झाला आहे. सिनिसिझम प्रस्थापित चौकटींना नाकारून नैसर्गिक, प्रामाणिक, धीरोदात्त सद्वर्तनाला सर्वोच्च मानणारा अत्यंत आदर्शवादी विचारप्रवाह आहे. डायोजनिसनुसार तत्कालीन ग्रीक मूल्यव्यवस्थेचं पतन होऊन ती गतार्थ झाली होती. अशा पतित, कालबाह्य मूल्यव्यवस्थेनुसार वागणारी माणसं त्याला अज्ञानी, भित्री, स्वार्थी, ढोंगी आणि दांभिक वाटत असत. डायोजनिसनं माणसांमधलं माणूसपण हरवलेल्या तत्कालीन परिस्थितीचं इतकं विदारक आणि निराशावादी चित्र रेखाटलेलं आहे की, त्यात माणसांपेक्षा कुत्र्यांना श्रेष्ठ समजण्यात आलं आहे.

थोडक्यात, नीत्शेच्या बोधकथेतला कंदिलानं मूलभूत गोष्टी शोधणारा माणूस पाश्चात्य तत्त्वज्ञानातला पहिला वेडा माणूस नाही. इ. स. पूर्व चौथ्या शतकात डायोजनिससुद्धा भरदिवसा सूर्यप्रकाशात कंदिलाच्या मदतीनं, येणाऱ्या- जाणाऱ्यांना विचारत असे, ‘मी माणूस शोधतोय. माणसाला पाहिलं का?’ डायोजनिसच्या दृष्टीनं ‘माणूस’ हे अतिशय दुर्मीळ मूल्य आहे जे त्याला आजूबाजूला वावरणाऱ्या सस्तन द्विपाद प्राण्यांमध्ये दिसत नसे.

परंपरेच्या आणि समाजाच्या दहशतीत जगणाऱ्या सर्वसामान्यांनाकडे प्राप्त मानवी अवस्थेची ही विदारक परिस्थिती अधोरेखित करण्याचं धाडस नसतं. तसं करणं व्यवहारवादाला धरून नसतं. पण व्यवहारवादाला झुगारून अशी अप्रिय कामं शेक्सपियरच्या ‘ As You Like It’ या नाटकातल्या जॅकसारखी- समाजापासून फारकत घेतलेली- सिनिक माणसं करतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नाटकातील ड्यूकला इतर दरबारींपेक्षा सतत कटु बोलणाऱ्या जॅकचा सहवास आवडतो.

प्लेटोच्या मते डायोजनिसनं नैसर्गिक आणि प्रामाणिक राहणीमानाचा पुरस्कार करताना अथेन्सच्या रूढीपरंपराची सॉक्रेटिसप्रणित चिकित्सा टोकाला नेऊन अंतिमत: सर्व सामाजिक बंधनांना नकार दिला आहे. त्यामुळे प्लेटो डायोजनिसचं वर्णन ‘वेड लागलेला सॉक्रटिस’ असं करतो. प्लेटोच्या अनुयायांनी ‘reductio ad absurdum’ या प्रचारतंत्राचा वापर करून डायोजनिस म्हणजे नकारात्मक, माणूसघाण्या, अश्लील, गबाळ माणूस अशी प्रतिमा निर्माण केली आहे. त्याच्या विरोधकांनी त्याचा उपमर्द करण्यासाठी त्याला कुत्र्याची उपमा दिली तेव्हा तो म्हणाला ‘होय मी कुत्रा आहे; पण असा कुत्रा जो मित्रांसाठी प्रामाणिकपणे पहारा देतो.’

थोडक्यात, बहुतांश विद्रोही विचारप्रवाहांप्रमाणे ‘सिनिसिझम’ या शब्दाला प्रचलित भाषेत पूर्णपणे नकारात्मक अर्थ प्राप्त झालेला आहे. सिनिसिझम एकेकाळी ईश्वररहित आदर्शवादी सद्वर्तनाला प्राधान्य देणारा आणि कुठल्याही प्रकारची तडजोड न करणारा, पराकोटीचा आग्रही विचारप्रवाह होता. आज मात्र हा शब्द अवगुणांचा द्याोतक झाला आहे. राजकारणात तर कुठल्याही प्रकारची नैतिकता नसणं, चांगलं-वाइट यात भेद न करता केवळ स्वत:च्या स्वार्थाला सर्वोच्च प्राधान्य देणं अशा गोष्टींना पॉलिटिकल सिनिसिझम म्हटलं जातं. उलटपक्षी, प्राचीन ग्रीक परंपरेतल्या डायोजनिसनं तर सत्यानुनयापोटी, सर्वोच्च सत्तेचं प्रतीक असलेल्या अलेक्झांडरला खडे बोल सुनावल. डायोजनिस मानवी स्वातंत्र्याला सर्वोच्च मूल्य मानतो. स्वातंत्र्याला मारक रूढी, सामाजिक संस्था, सत्तानुनय आदींना तो अनावश्यक मानतो. माणसाचं स्वातंत्र्य धोक्यात येईल अशा गोष्टी कटाक्षानं टाळण्यातच खरं शहाणपण आहे, असं मानतो.

स्वातंत्र्याचा सूर्य/अलेक्झांडरची सावली

अलेक्झांडर आणि डायोजनिसच्या भेटीविषयी अनेक अख्यायिका प्रचलित आहेत. इसवी पहिल्या शतकातला लॅटिन लेखक प्लुटार्कच्या ‘The life of Alexander’ मध्ये या भेटीचं वर्णन आहे. आधुनिक काळात तर साहित्य, कला आणि लोककथांमध्ये या भेटीचं रंजक चित्रण करण्यात आलं आहे. विशीतला अलेक्झांडर विजेच्या वेगानं एकामागून एक लढाया जिकंत असतो. त्याचं युद्धभूमीवरचं यश स्तिमित करणारं असतं. त्यादरम्यान अलेक्झांडरचं कोरिन्थ या ग्रीक शहरात आगमन होतं. शहरातील अनेक नामवंत त्याला भेटायला आणि शुभेच्छा द्यायला गर्दी करतात. मात्र कोरिन्थमध्ये वास्तव्यास असणारा डायोजनिस हा जगावेगळा तत्त्ववेत्ता त्याला भेटायला येत नाही.

जवळपास ऐंशीतील डायोजनिस कोरिन्थ शहराबाहेर जंगलात, गरिबीत जीवन कंठत असल्याचं अलेक्झांडरला सांगण्यात येतं. इतरांसारखा हा तत्त्वज्ञ आपल्याला भेटायला आला नाही ही गोष्ट अलेक्झांडरला आश्चर्यचकित करते. अलेक्झांडर स्वत: त्या जगावेगळ्या तत्त्ववेत्त्याला भेटायची इच्छा व्यक्त करतो. दरबारी लवाजम्यासह तो डायोजनिसला भेटायला निघतो. त्याला कळविण्यात आलेलं असतं की डायोजनिस हा जगावेगळा तत्त्वज्ञ आहे; पण कुणी व्यवस्थित नमूद केलं नसतं की किती जगावेगळा आहे. विद्वान माणसं आपल्या आसपास वावरायला पाहिजेत. त्यामुळे स्वत:ची आणि साम्राज्याची शोभा वाढते, असं महत्त्वाकांक्षी सत्ताधाऱ्यांना वाटणं साहजिकच. संपूर्ण ग्रीक जगाला नमवणाऱ्या अलेक्झांडरलाही वाटतं की माझ्याच साम्राज्यातला माणूस माझ्या इच्छेपलीकडे कसा जाऊ शकतो.

सकाळची वेळ असते. कोरिन्थ शहराबाहेरच्या जंगलात एका टेकडीच्या कडेला डायोजनिस आपल्या झोपडीबाहेर आरामात ऊन खात बसलेला असतो. अलेक्झांडर त्याच्या दरबारी लोकांसोबत तिथं पोहोचतो. अचानक गर्दीचा आवाज ऐकून सकाळचं कोवळं उन खात बसलेला डायोजनिस डोळे उघडून पाहतो. समोर अलेक्झांडर आणि त्याचे दरबारी उभे. डायोजनिसच्या दरिद्री परिस्थितीकडे पाहून अलेक्झांडर त्याला विचारतो, ‘मला सांग, मी तुझ्यासाठी काय करू शकतो?’ ‘तू माझा सूर्य अडवतोयस… बाजूला हो!’ डायोजनिस उत्तरतो. हा उद्धटपणा पाहून अलेक्झांडरच्या दरबारी लोकांना डायोजनिसचा राग येतो. नंतर ते डायोजनिसच्या वेडेपणाची टिंगलही करतात. मात्र अलेक्झांडरला डायोजनिसच्या उत्तराचं वाईट वाटत नाही. प्लूटार्कच्या कथेनुसार अलेक्झांडर म्हणतो की, मी अलेक्झांडर नसतो, तर डायोजनिस झालो असतो!

खरंतर, अर्थसत्ता किंवा राजसत्ता मिळालेल्या अनेकांमध्ये हा ‘अलेक्झांडर सिंड्रोम’ आढळून येतो. पण त्यांच्यात अलेक्झांडरची डायोजनिस होण्याची इच्छा दुर्मीळ असते. दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याच्या सूर्याचं महत्त्व पटलेल्यांमध्ये देखील डायोजनिसचं तत्त्व कमीअधिक प्रमाणात आढळतं. समाजात अनेक छोटेमोठे अलेक्झांडर वावरताना दिसतात ज्यांना आपल्या सत्तेच्या बळावर दरबारी लेखक, कवी, विचारवंत यांच्याबरोबर मिरवायला आवडतं. पण बहुधा आश्रय देणारी अलेक्झांडरची सावली स्वातंत्र्याच्या सूर्याला गिळंकृत करत असते. डायोजनिसचा कठोर ‘सिनिसिझम’ दैनंदिन व्यवहारात अशक्य वाटत असला तरी त्यातली, किमान बौद्धिक क्षेत्रात स्वातंत्र्याला प्राणपणानं जपण्यासाठी लागणाऱ्या सावधानतेची प्रस्तुतता सार्वकालिक आहे.

sharadcrosshuma@gmail.com