धार्मिक विषयाशी निगडित एखादी गोष्ट कुणी वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करण्यास सांगितले, त्यासाठी दबाव आणला, तर नम्रपणे नकार देण्यास धाडस लागते. सीएसआयआर-नीरीचे संचालक डॉ. अतुल वैद्या यांच्यात हे धाडस आहे. असे काम करण्यास नम्रतेने नकार देण्याचे कौशल्य त्यांना अवगत आहे. अशा या व्यक्तिमत्त्वाची नियुक्ती नागपूर येथील लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी करण्यात आली आहे. सीएसआयआर-नीरीच्या संचालकपदाची धुरा त्यांनी हाती घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच या संस्थेतील प्रत्येकाशी त्यांचे ऋणानुबंध जुळले. त्यामुळे कुलगुरूपदाची धुरा ते स्वीकारतील तेव्हाही याचीच पुनरावृत्ती होईल यात शंका नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : शशी रुईया

शिक्षणाबद्दल प्रचंड आस्था असणारा हाडाचा शिक्षक त्यांच्यात दडला आहे. डॉ. वैद्या यांचे वडील लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठात प्राध्यापक होते आणि डॉ. अतुल वैद्या यांनीदेखील याच विद्यापीठातून बी.टेक. केले. उपजत बुद्धिमत्ता असलेले आणि यत्किंचितही गर्व नसलेले डॉ. वैद्या अत्यंत साधे, सुस्वभावी आहेत. एखादा विषय आत्मसात केल्यानंतर त्याच्याशी निगडित इतरही विषयांबाबत तेवढ्याच गांभीर्याने जाणून घेणारे डॉ. अतुल वैद्या विज्ञानच नाही तर इतरही मुद्द्यांवर भरभरून बोलतात.

डॉ. वैद्या यांचा जन्म ४ डिसेंबर १९६४ला झाला. एलआयटी नागपूर येथून त्यांनी रसायनशास्त्र अभियांत्रिकी विषयात बी. टेक. पदवी मिळविली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केली. १९९० पासून त्यांनी ‘सीएसआयआर-नीरी’ येथे कनिष्ठ वैज्ञानिक पदापासून संचालक पदापर्यंत वाटचाल केली. घातक कचरा आणि घनचकरा या विषयांचा सखोल अभ्यास केला. अनेक प्रकल्पांची धुरा स्वत:च्या खांद्यांवर घेऊन त्यांनी ते पूर्णत्वास नेले, नेत आहेत. कामाचा एवढा मोठा व्याप असूनही ते सर्वांसाठी सहज उपलब्ध असतात. डॉ. अतुल वैद्या यांना संशोधन, अध्यापन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या या अनुभवाचा फायदा या विद्यापीठाला नक्कीच होणार आहे. महापालिका घनकचरा वाहतूक प्रणालीची रचना, महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्याचा पुनर्वापर यासंदर्भात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी देशातील विविध उद्याोगांमध्ये घातक कचऱ्याचे पर्यावरणदृष्ट्या योग्य व्यवस्थापन करण्यासाठी प्रभावी तांत्रिक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. मात्र, या सर्व गोष्टींचा त्यांनी कधी अहंकार बाळगला नाही. अतिशय संयमी असे नेतृत्व सीएसआयआर-नीरीला लाभले होते आणि आता लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाची धुराही डॉ. वैद्या तेवढ्याच यशस्वीपणे सांभाळतील यात शंका नाही.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director of neeri atul vaidya appointed as vice chancellor of lit university zws